देशाची राजधानी असलेल्या नवी दिल्लीमध्ये ‘इंडिया एआय इम्पॅक्ट’ नावाच्या परिषदेचे आयोजन करण्यात आले असल्यामुळे सध्या कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयाचा बोलबाला सुरू झाला आहे. अर्थात, गेल्या काही वर्षांपासून हा विषय सातत्याने चर्चेत असला, तरी राजधानी दिल्लीमध्ये सुरू झालेल्या या परिषदेच्या निमित्ताने पुन्हा एकदा या विषयाला नव्या स्वरूपात चर्चेला चालना मिळाली आहे. या परिषदेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. विद्यार्थी, संशोधक, तंत्रज्ञ, गुंतवणूकदार या सर्वांनीच या इंडिया एआय इम्पॅक्ट परिषदेबाबत उत्सुकता दाखवली आहे. आगामी कालावधीमध्ये या क्षेत्रासाठी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करण्याचे संकेतही अनेक संबंधितांनी दिले आहेत. एकीकडे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरामुळे बेरोजगारीत वाढ होण्याची भीती व्यक्त होत असतानाच या प्रकारच्या इम्पॅक्ट परिषदेचे आयोजन करून आगामी कालावधीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचे तत्त्वज्ञान सकारात्मक पद्धतीने वापरण्याचे संकेत देण्यात आले असले, तरी अद्यापही या तंत्रज्ञानाबाबत संभ्रम आणि संशय कायम आहे हे विसरून चालणार नाही. एकीकडे राजधानीत हे प्रदर्शन भरले असतानाच दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाने याबाबत जी एक टिप्पणी केली आहे तीसुद्धा महत्त्वाची आहे. सर्वोच्च न्यायालयात किंवा अन्य कोणत्याही न्यायालयात दाखल करण्यात येणार्या याचिकांसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर चिंताजनक असल्याचे स्पष्ट मत सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी व्यक्त केले आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा म्हणजेच एआयचा वापर करून दाखल करण्यात आलेल्या याचिकांमध्ये बनावट आदेशांचा संदर्भ आणि चुकीची उदाहरणे दिली जात असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने अधोरेखित केले आहे. अशा प्रकारच्या चुकीच्या संदर्भांमुळे आणि चुकीच्या माहितीमुळे न्यायदानावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आणि भीतीही सरन्यायाधीशांनी व्यक्त केली आहे. अस्तित्वातच नसलेल्या एखाद्या केसचा उल्लेख करून एआयच्या माध्यमातून याचिका दाखल केल्या जात असल्याची माहितीही सरन्यायाधीश यांनी दिली आहे हे निश्चितच महत्त्वाचे आहे. म्हणजे एकीकडे राजधानीमध्ये एआयच्या इम्पॅक्टचा सकारात्मक वापर चर्चिला जात असताना दुसरीकडे न्यायदानाच्या प्रक्रियेत एआयचा वापर कशा चुकीच्या पद्धतीने केला जात आहे हे समोर येत आहे. शेवटी आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता एक तंत्रज्ञान आहे आणि तंत्रज्ञानाचा वापर कशाप्रकारे केला जातो यावरच त्याचे फलित अवलंबून असते. ‘विज्ञान शाप की वरदान’ हा विषय नेहमीच चर्चेला येतो. त्याच धर्तीवर ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स शाप का वरदान’ याची चर्चा आतापासूनच सुरू केली जात आहे. जरी बेरोजगारी हा त्याचा त्वरित दिसून येणारा परिणाम असला, तरी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून ज्या प्रकारचे कंटेंट तयार केले जात आहे, त्याबाबत विश्वासार्हता कशी ठेवायची हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केलेल्या चिंतेमुळे अधोरेखित होत आहे हे विसरून चालणार नाही. शेवटी एखादे तंत्रज्ञान जरी निर्माण झाले तरी त्याचा वापर कशाप्रकारे केला जातो हेच जास्त महत्त्वाचे असते. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून आता अस्तित्वात नसलेल्या गोष्टीच समोर आणल्या जात असल्याने गैरसमजाचे आणि संभ्रमाचे वातावरण पसरण्याची भीती लक्षात घ्यायला हवी. औद्योगिक किंवा आर्थिक विकास यासाठी या प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर जरी स्वीकारार्थ असला तरी हे तंत्रज्ञान जर चुकीच्या हातात पडले तर त्यातून अनेक नकारात्मक गोष्टी समोर येतील हेसुद्धा विसरता येणार नाही. सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून जे विविध प्रकारचे कंटेंट समोर येत आहे, त्याच्यामध्ये मुक्तपणे आणि चुकीच्या पद्धतीने एआयचा वापर होताना दिसत आहे. एखादी गोष्ट खरी आहे का खोटी आहे, याबाबत संभ्रम निर्माण व्हावा अशा प्रकारची परिस्थिती या तंत्रज्ञानाने सध्या निर्माण केलेली दिसते. अर्थात, त्यामध्ये या तंत्रज्ञानाचा कोणताही दोष नाही. या तंत्रज्ञानाची अपुरी माहिती असणारे किंवा संपूर्ण माहिती असूनसुद्धा चुकीच्या प्रकारे वापर करणारेच या गोष्टींना जबाबदार आहेत हे नाकारता येत नाही. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रांमध्ये आगामी कालावधीमध्ये जर अब्जावधी डॉलरची गुंतवणूक होणार असेल तर हा विषय आर्थिकदृष्ट्या निश्चितच महत्त्वाचा आहे. पण समाजावर घातक परिणाम करणारा जर हा विषय ठरला तर चिंताजनक परिस्थिती निर्माण होऊ शकते. आगामी कालावधीमध्ये या तंत्रज्ञानाचा वापर करून अवघड कामे सोपी होणार असली तरी संभ्रमाची आणि संशयाची परिस्थिती निर्माण करण्याचे काम जर या तंत्रज्ञानाने केले तर त्यावर नियंत्रण ठेवणे अवघड जाणार आहे. भारतासारख्या प्रमुख देशाने एआय इम्पॅक्टची परिषद भरवली आहे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. पण या परिषदेच्या निमित्ताने कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर सकारात्मक पद्धतीने आणि मानव जातीच्या कल्याणासाठी कशा प्रकारे केला जाईल यालासुद्धा प्राधान्य देणे सर्वात महत्त्वाचे आहे.