अग्रलेख : बंगाली खेला
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस (Trinamool Congress) पक्षात फूट पडली. विधिमंडळातील संख्याबळाच्या अनुषंगाने विचार करायचा झाला तर 80 टक्के पक्ष ममतांची साथ सोडून गेला.

Trinamool Congress : पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस (Trinamool Congress) पक्षात फूट पडली. विधिमंडळातील संख्याबळाच्या अनुषंगाने विचार करायचा झाला तर 80 टक्के पक्ष ममतांची साथ सोडून गेला.
दोनच दिवसांपूर्वी ममतांनी ज्या आमदार ऋतब्रत बॅनर्जी यांची पक्षातून हकालपट्टी केली होती त्यांनाच बंडखोर 58 आमदारांनी आपला नेता निवडले. आता तृणमूलचे (Trinamool Congress) लोकसभेतील आणि राज्यसभेतील किती खासदार ऋतब्रत यांच्यासोबत आहेत हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल.
पक्षसंघटनेतील किती पदाधिकारी आणि सगळ्यांत महत्त्वाचे कार्यकर्ते आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे मतदार आणि सर्वोच्च महत्त्वाचे अल्पसंख्याक मतदार कोणासोबत आहेत हेही लवकरच समोर येईल. तूर्त ममतांच्या पायाखालून जमीनच काढून घेतली असून त्यांना तुम्ही मार्गदर्शकाच्या भूमिकेत जा, मुख्य सल्लागार म्हणून काम करा आणि तुमच्या भाच्याला या सगळ्यापासून लांबच ठेवा असा स्पष्ट संदेश ऋतब्रत यांच्या नेतृत्वाखालील आमदारांच्या गटाने दिला आहे. यशाचे बाप अनेक असतात आणि अपयश मात्र पोरके असते असे म्हणतात.
भारताच्या राजकारणात याला छेद दिला गेला आहे. आपल्याकडे राजकीय संस्कृतीच अशी विकसित केली गेली आहे की यशाचा बाप तोच असतो जो पक्षात सर्वशक्तिमान असतो. त्याच्यानंतर दुसर्या क्रमांकावर त्याच्या कुटुंबातील सदस्य म्हणजे त्याचा राजकीय उत्तराधिकारी हा बाप असतो. प्रमुख नेत्यानंतर पहिल्या दहा नंबरवर त्याच्या कुटंबातले सदस्यच असतात. त्यानंतर त्याचा सगळ्यांत विश्वासू सहकारी, निष्ठावान वगैरे अशी बिरूदे ज्याला किंवा ज्यांना लावली जातात त्यांचा क्रमांक येतो. हे सगळे यश मिळत असेपर्यंतच असते.
अपयश आले आणि बुरूज ढासळत असल्याचे दिसू लागले किंवा आता सत्ता मिळण्याची शक्यता नजीकच्या भविष्यात कमीच दिसते आहे असे दिसू लागले की दहाच्या पुढच्या नंबरवर असलेले निष्ठावान मग एकेक करून मागे सरकू लागतात आणि सर्वोच्च नेत्याच्या कुटुंबातील कोणा एकाला लक्ष्य करत आपले स्वतंत्र दुकान थाटण्याचा प्रयत्न करतात आणि कोणतीतरी ‘महाशक्ती’ अशाच स्वाभिमानी नेत्याच्या शोधात असल्यामुळे त्याचा वापर करून मूळ पक्ष संघटना पंगू केली जाते. त्या अर्थाने अपयश हे पोरकेच असते किंबहुना अपयश हे तुमचा प्रवास संपवणारेच असते हेच खरे.
पश्चिम बंगालमध्ये गेल्या दोन दिवसांत जे घडले ते महाराष्ट्रात 2022 मध्ये घडले याची प्रचिती बंगालमधील लाइव्ह प्रक्षेपण पाहताना सगळ्यांना आलीच असेल. ममतांचा विधानसभेच्या निवडणुकीत (Trinamool Congress) दारुण पराभव झाला. पक्ष तर हरलाच, पण त्या स्वत:ही त्यांच्या बालेकिल्ल्यातून पडल्या. पराभवाची कारणे लाख दिली गेली वा जातील मात्र ममतांच्या सरकारच्या संदर्भात प्रचंड रोष सर्वसामान्य नागरिकांत होता हे दर्शवणार्या घटना गेल्या काही दिवसांत सातत्याने समोर आल्या. काही नेत्यांना मारहाण झाली; त्याचे समर्थन नाही.
कदाचित ममतांचा पक्ष आरोप करतो त्याप्रमाणे प्रतिस्पर्धी राजकीय पक्षाचेही हे कारस्थान असू शकते. तथापि, या व्यतिरिक्त अनेक व्हिडिओ, मुलाखती आणि बातम्या चालवल्या जात आहेत अथवा समोर येत आहेत, ज्या पाहता लोकांना बदल हवा होता आणि त्यांनी तो घडवला हे स्पष्ट होते. तथाकथित सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर विदेशात बसून काय म्हणतात किंवा मांडतात यापेक्षा प्रत्यक्ष जमिनीवरची स्थिती वेगळी असते. पराभव झाल्यानंतर त्यावर चर्चा होऊन योग्य सुधारणा अपेक्षित असताना ममतांच्या विशेष मर्जीतील काही नेते त्याच तोर्यात होती ज्यामुळे त्यांना सत्ता गमावण्याची वेळ आली.
हाच धोका ओळखून ऋतब्रत आणि त्यांच्यासोबतच्या आमदारांनी वेगळी चूल मांडण्याचा निर्णय घेतला असेल आणि त्यांना याकामी कोणी अप्रत्यक्ष रसद पुरवली असेल तर तो त्यांचा दोष म्हणता येणार नाही. बंगालमधील डाव्या आघाडी सरकारला सत्तेतून घालवण्यासाठी ममतांनी स्वत: काँग्रेस सोडत तृणमूलची स्थापना केली होती. डाव्या पक्षांच्या विचारधारेबद्दल त्यावेळी त्या प्रश्न विचारायच्या. सत्ताप्राप्तीनंतर मात्र त्यांनी आपली काँग्रेसी विचारधारा सोडली असा आरोप बंगालमधील सर्व जुन्या काँग्रेस नेत्यांचा होता.
अलीकडच्या काळात भ्रष्टाचार आणि प्रशासनातील अनियमितता हीच ममता यांच्या सरकारची व पक्षाची ओळख झाली होती व स्वत:ला सत्तेवरून पायउतार करायला त्यांच्या याच गोष्टींचा हातभार लागला. तथापि, ममता लढवय्या आहेत. बंगालमधील मोठा समाज आजही त्यांच्यासोबत आहे हे त्यांना मिळालेल्या जवळपास 40 टक्के मतांनी सिद्ध होते.
अशा स्थितीत जर पक्षच पंगू केला तर भविष्यातील आव्हानच (Trinamool Congress) संपुष्टात येते हा विचार करून जुनाच डाव खेळला गेला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. काँग्रेस सोडून ममतांसोबत तृणमूलमध्ये सहभागी झालेल्या अनेक नेत्यांनी गेले दीड दशक सत्ता आणि राजकीय योजनांचा लाभ घेतला. तीच मंडळी जर आता अन्यत्र सुरक्षित आश्रय शोधत असतील तर त्याला जबाबदार कोण? अर्थात थेट भाजपमध्ये विलीन होण्याचा धोका पत्करण्याची त्यांची सध्या तयारी नसावी.
तसे केले तर आपले पारंपरिक मतदार दुरावतील आणि विशेषत: अल्पसंख्य समुदायाच्या मतांवरही पाणी सोडावे लागेल अशी भीती त्यांना असावी. भाजपलाही ज्यांच्यावर आपण भ्रष्टाचाराचे आणि गुंडगिरीचे आरोप केले त्यांना थेट पक्षात प्रवेश देणे प्रशस्त वाटत नसावे. त्यामुळे सध्या ही तात्पुरती व्यवस्था असावी असे दिसते. भविष्यात जे घडेल ते घडेल, डाव मात्र जुनाच आहे आणि तो पुन्हा यशस्वी ठरला.






