अग्रलेख : आमसभेतील भूमिका

जगाच्या पाठीवर अनेक देशांमध्ये विविध ठिकाणी लष्करी संघर्षाची परिस्थिती सुरू असतानाच संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेची वार्षिक सभा होऊन त्यामध्ये बहुतेक सर्व नेत्यांनी आपल्या देशाची भूमिका मांडली. अर्थात, यूनोच्या आमसभेचे व्यासपीठ हे प्रत्येक देशासाठी त्यांची भूमिका स्पष्ट करण्यासाठीच आतापर्यंत वापरण्यात आले आहे. तीन वर्षांपासून सुरू असलेला रशिया आणि युक्रेन यांच्यातील संघर्ष असो किंवा इस्रायल आणि पॅलेस्टिन यांच्यातील गाझापट्टीमधील लष्करी संघर्ष असो किंवा भारत पाकिस्तान यांच्यातील लष्करी संघर्ष असो, या सर्व पार्श्वभूमीवरच यूनोची वार्षिक आमसभा पार पडली.
या आमसभेमध्ये ऑपरेशन सिंदूरबाबत भारत आणि पाकिस्तान काय भूमिका घेतात, याबाबतची उत्सुकता असताना यावरूनही उभय देशांमध्ये जोरदार संघर्ष झाला. भारताने ठामपणे आपली भूमिका मांडत पाकिस्तान हे दहशतवादी असल्याचे स्पष्टपणे नमूद केले. महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लष्करी संघर्ष हा पाकिस्तानच्या विनवणीवरून संपवण्यात आला आणि इतर कोणत्याही राष्ट्राच्या मध्यस्थीमुळे ऑपरेशन सिंदूर संपवण्यात आले नाही हे असे अत्यंत स्पष्ट शब्दांत भारताकडून सांगण्यात आल्यामुळे.
या विषयीचा गैरसमजही नष्ट व्हायला हरकत नाही. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या आमसभेत भाषण करत असताना इतर अनेक लष्करी संघर्षांचा उल्लेख केला असला, तरी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लष्करी संघर्षाचा उल्लेख मात्र त्यांनी जाणीवपूर्वक टाळला. अमेरिकेच्या मध्यस्थीमुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्ध थांबले असा दावा अनेक वेळा करणार्या ट्रम्प यांनी भारताच्या भूमिकेला आमसभेच्या व्यासपीठावर मात्र विरोध केला नाही हेसुद्धा लक्षणीय आहे. पाकिस्तानच्या नेत्यांनी आणि मुत्सद्द्यांनी नेहमीप्रमाणे खोटा आणि चुकीचा प्रचार करण्यासाठीच हे व्यासपीठ वापरले.
भारत-पाकिस्तान यांच्यातील लष्करी संघर्षामध्ये पाकिस्तानने भारताची सात विमाने पाडली असा दावा पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी यूनोच्या व्यासपीठावरून बोलताना केला. पण भारतीय मुत्सद्द्यांनी तो दावा ठामपणे खोडून काढला आणि अशा प्रकारचा कोणताही पुरावा पाकिस्तानने अद्यापपर्यंत दिला नाही, असे सांगितले. आतापर्यंत यूनोच्या व्यासपीठाचा वापर नेहमीच काश्मीर प्रश्नाचा उल्लेख करण्यासाठी पाकिस्तानकडून केला जात आहे. काश्मीर हा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील विषय आहे.
त्यामुळे यूनोच्या व्यासपीठावर अशा प्रकारचे विषय मांडले जात नाहीत. तरीसुद्धा जाणीवपूर्वक गेली अनेक वर्षे काश्मीरचा विषय पाकिस्तान मांडत आहे. या लष्करी संघर्षाच्या निमित्तानेसुद्धा पाकिस्तानने पुन्हा तोच प्रयत्न केला. पाकिस्तानची बदनामी करण्याचे कारस्थान भारताकडून केले जात आहे आणि आम्ही दहशतवादाला प्रोत्साहन देत असल्याचा कोणताही पुरावा भारताने आम्हाला दिला नाही, असा कांगावा जरी पाकिस्तानच्या नेत्यांनी केला असला, तरी अनेक दहशतवादी संघटनांना पाकिस्तानमध्ये आश्रय मिळाला आहे आणि हाफिज सईद आणि अझर मसूद यासारखे दहशतवादी खुलेआम पाकिस्तानमध्ये हिंडत असतात.
त्यापेक्षा कोणता मोठा पुरावा पाकिस्तानला हवा आहे हे समजत नाही. आमसभेच्या व्यासपीठावर पाकिस्तानची भूमिका मांडल्यानंतर बाहेर जात असताना पत्रकारांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांना छेडले असता त्यांना आपला विषय व्यवस्थितपणे मांडता आला नाही आणि काहीतरी जुजबी उत्तरे देऊन त्यांनी वेळ मारून नेली हेसुद्धा संपूर्ण जगाने पाहिले. आमसभेच्या व्यासपीठावरही पाकिस्तानची नेहमीप्रमाणे पडलो तरी नाक वर अशीच भूमिका राहिली. पण भारतीय परराष्ट्र मंत्र्यांनी आणि भारतीय मुत्सद्द्यांनीसुद्धा भारतीय धोरणाचे छान समर्थन करून पाकिस्तानला तोंडघशी पाडण्याचे काम केले हेसुद्धा योग्य झाले.
आमसभेच्या व्यासपीठावर जेव्हा अशा प्रकारचे विषय येतात तेव्हा अमेरिकेसारखे मोठे देश आमसभेला प्रभावित करत असतात. पण यावेळी डोनाल्ड ट्रम्प अशा कोणत्याही मूडमध्ये नव्हते. मुळात त्यांना यूनो ही संघटनाच आता मान्य नाही. अमेरिकेमध्येच ही आमसभा होत असल्यामुळे एक उपचार म्हणून डोनाल्ड ट्रम्प या सभेला उपस्थित राहिले. जगातील अनेक देशांनी येऊन आमसभेच्या व्यासपीठावर आपापल्या भूमिका मांडल्या असल्या तरी जागतिक लष्करी संघर्ष टाळण्यासाठी ज्या संघटनेचा जन्म 80 वर्षांपूर्वी झाला होता त्या यूनोला जागतिक शांतता निर्माण करण्यामध्ये अपयश आले आहे हे मात्र या आमसभेतील विविध भूमिकांवरून स्पष्ट होते. यूनोच्या सचिवांनी जोरदार भाषण करून शांतता प्रस्थापित करण्यावर जोर दिला असला, तरी या कामात आपण अपयशी ठरलो आहोत याची जाणीव त्यांना आहे.





