अबाऊट टर्न : विकणे आहे!

“गाव विकणे आहे’ अशी पाटी पुन्हा एका गावात लागलीय. “पुन्हा एकदा’ म्हणण्याचं कारण असं, की ही काही कविता-कादंबरीतली कल्पना नाही आणि असं पहिल्यांदाच घडतंय असंही नाही. “यह गॉंव बिकाऊ है’ नावाची कादंबरी एम. एम. चंद्रा यांनी लिहिली होती आणि तिचं मराठी रूपांतरही उपलब्ध आहे.
कादंबरी असली, तरी ती वास्तवावर आधारित आहे. भारताचा “इंडिया’ होत असताना त्या प्रक्रियेत ज्या खेड्यांचा बळी गेला, त्यांची ही कहाणी आहे. आर्थिक उदारीकरणाचा श्रमिकांच्या पाठोपाठ शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. धोरणं बदलल्यामुळे शेतकरी वाऱ्यावर सोडला गेला आणि त्याला वाचवण्याचा आव आणत अनेक योजनाही जाहीर करण्यात आल्या. त्या किती दिखाऊ स्वरूपाच्या होत्या, हे सर्वांना ठाऊक आहे. म्हणूनच “गाव विकणे आहे’ हे वाक्य त्यानंतरच्या काळात देशाच्या अनेक भागांमधून कायम ऐकू येत राहिलंय. आपल्या महाराष्ट्रातलीच उदाहरणं पाहायची झाली, तर चार वर्षांपूर्वी हिंगोली जिल्ह्यातलं ताकतोडा गाव “विकणे आहे’ असा फलक लागला होता. अंबानी, अदानी, महिंद्रा अशा बड्या उद्योजकांनी गाव विकत घ्यावं, असं आवाहन ग्रामस्थांनी केलं होतं. पावसाच्या अभावाबरोबरच कर्जबाजारीपणा आणि विम्याची रक्कम न मिळणं ही या घटनेमागची प्रमुख कारणं होती. ग्रामपंचायत कार्यालयासमोर “गाव विकणे आहे’ असा फलक लावून ग्रामस्थांनी कोणतंही काम न करण्याचा निर्णय घेतला होता.
आमच्या घरादाराचा आणि शेतीचा ताबा घेऊन गाव खुशाल विकत घ्यावं, वेळ पडलीच तर आम्हालाही विकत घ्या आणि कुठेतरी रोजगार द्या, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली होती. महानगरांमधून मेट्रोसह, सहा-आठपदरी रस्ते, उड्डाणपूल आदी होत असताना गावांचा विकास किती मागे पडला, याची सर्वांना कल्पना आहेच. परभणी जिल्ह्याच्या पूर्णा तालुक्यातलं माहेर नावाचं गाव रस्त्याअभावी इतर गावांपासून तुटलं होतं. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये तिथल्याही ग्रामस्थांनी गाव विकायला काढलं होतं. तोंडी, लेखी आश्वासनं देऊनसुद्धा गावाला जोडणारा एकमेव रस्ता होत नसल्यामुळे लोकांचा संयम संपला होता.
आता असाच प्रकार नाशिक जिल्ह्याच्या देवळा तालुक्यात घडलाय. माळवाडी नावाचं गाव “विकणे आहे’ असा फलक सोमवारीच गावात लागलाय. असा फलक लावण्यामागे लोकांच्या काय भावना असतील? त्यांना स्वतःकडे केवळ लक्ष वेधून घ्यायचंय का? की प्रयत्न करूनही काहीच होत नाही, म्हणून उद्विग्नता आलीये? शेती हाच प्रमुख व्यवसाय असलेल्या या गावात कांदा या प्रमुख पिकासह भाजीपाला, ऊस, कडधान्यं ही पिकं घेतली जातात. परंतु गेल्या 3-4 वर्षांपासून कोणत्याही शेती उत्पादनाला बाजारात योग्य भाव मिळालेला नाही, असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे.
शेतकरी कर्ज काढून मुलामुलींची लग्नं लावतो, हे शहरी सुसंस्कृतांना लगेच दिसतं; पण अशा कारणासाठी कर्ज काढावंच लागू नये एवढं उत्पन्न त्याला मिळायला पाहिजे, असं कुणी म्हणत नाही. भंगारमाल आणि रद्दीपेक्षा कमी भाव जर शेती उत्पादनाला मिळणार असेल, तर अन्न ही मानवाची मूलभूत गरज उरलेली नाही, असं आपण जाहीर करून टाकायला हवं. श्रीमंतांनी खरोखर गावंच्या गावं विकत घ्यावीत, फार्महाउस बांधावीत, म्हणजे “आर्थिक विकास’ आणखी उठून दिसेल.





