46 वर्षांपूर्वी प्रभात : इंदिरा सरकारच हवे!

इंदिरा सरकारच हवे!
पुणे, दि. 24 – देशाची सध्याची परिस्थिती लक्षात घेता इंदिरा गांधी यांचेच सरकार असणे अत्यंत जरुरीचे आहे, असे प्रतिपादन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केले. आंतरराष्ट्रीय राजकारणात देशाचे हितसंबंध गुंतले आहेत. सत्तेवर कोणीही आले तरी त्यांना हेच राजकारण खेळावे लागणार आहे.
परदेशाशी केलेले करार कोणालाच मोडता येणार नाहीत. सत्तेवर प्रत्यक्ष बसल्यानंतर सत्ताधाऱ्यांच्या अडचणी कळतात. मराठी माणसाच्या हिताचे दृष्टीने निश्चित विचाराने बांधलेले, स्वाभिमानी शिवसैनिक तयार करण्यास शिवसेना कटिबद्ध आहे. चालू राजकारणात लोकांच्या गर्दीमुळे वाहवत जाऊ नये.
विरोधकांचे आरोप जुनेच
रायपूर – निवडणुका घ्या असा लकडा लावणारे विरोधी पक्ष निवडणुकीची घोषणा करताच त्या घाईगर्दीने घेतल्या जात आहेत, असा आरोप करीत आहेत, असे पंतप्रधान इंदिरा गांधी म्हणाल्या.
जाहीर सभेत बोलताना इंदिरा गांधी म्हणाल्या, माझ्यावर हुकूमशाहीचा केला जाणारा आरोप नवा नाही. आणीबाणी नव्हती व वृत्तपत्रांवर निर्बंध नव्हते तेव्हाही विरोधक हाच आरोप ते नेहमी करीत होते. आणीबाणी का आणावी लागली याचीही कारणे गांधी यांनी प्रमाण सांगितली. स्थिर सरकार केवळ कॉंग्रेसच देऊ शकते. शेतकरी, कामगार, गरिबांच्या कल्याणासाठी कॉंग्रेस कटिबद्ध असल्याचे गांधी म्हणाल्या.

