46 वर्षांपूर्वी प्रभात : वि. स. खांडेकरांची “देवता’

वसईनजीक समुद्रात तेल सापडले!
नवी दिल्ली, दि. 8 – मुंबईच्या उत्तरेस वसईच्या किनाऱ्यावर समुद्रात तेल सापडल्याची माहिती केंद्रीय पेट्रोलियम मंत्री के. डी. मालवीय यांनी आज लोकसभेत सांगितली. वसईनजीक समुद्रात तेल संशोधन करण्यासाठी खणण्यात आलेल्या पहिल्याच विहिरीत तेल लागले.
सदर तेल चांगल्या दर्जाचे आहे. ही घटना अतिशय महत्त्वाची असून तेलाबाबत देश स्वयंपूर्ण होण्याच्या कामात यामुळे आणखी एक पाऊल पुढे पडले आहे. तेल संशोधनासाठी उत्खनन सुरू केल्यावर 1714 मीटर खोलीवर 71 मीटर जाडीचा चुनखडीचा भाग आढळून आला.
पौंडाच्या संदर्भात रुपयाचे मूल्य वाढले
मुंबई – रिझर्व्ह बॅंकेने आज रुपयाचे मूल्य पौंड स्टर्लिंगच्या संदर्भात सुमारे 2.1 टक्क्यांनी वाढविले. एका पौंडाला 18.1284 रुपये असा दर होता, तो आता 17.75 रुपये असा करण्यात आला आहे. रिझर्व्ह बॅंकेने असे जाहीर केले आहे की, गेल्या शनिवारपासून पौंड स्टर्लिंगची आगाऊ खरेदी (फॉरवर्ड पर्चेस) पद्धत बंद होती, ती त्वरित चालू करण्यात येईल.
वि. स. खांडेकरांची “देवता’
मुंबई – वि. स. खांडेकर यांनी “देवता’ बोलपटाची पटकथा लिहिली होती. आता मूळ निगेटिव्ह मिळाली असून लवकरच त्याची “नवी कॉपी’ रुपेरी पडद्यावर झळकेल.

