विविधा : जमनालाल बजाज

गांधीवादी देशभक्त व बजाज उद्योगसमूहाचे प्रवर्तक, दानशूर दिवंगत जमनालाल बजाज यांचा आज स्मृतिदिन. त्यांचा जन्म 4 नोव्हेंबर 1889 रोजी पूर्वीच्या जयपूर संस्थानातील कासीकाबास या खेड्यात एका गरीब कुटुंबात झाला.
वयाच्या चौथ्या वर्षी जमनालाल यांना वर्ध्याचे बच्छराज बजाज या श्रीमंत कुटुंबातील व्यक्तीने दत्तक घेतले. जमनालाल यांचे प्राथमिक शिक्षण वर्धा येथे झाले. पण कोणतीही पदवी न घेता त्यांनी इंग्रजी, हिंदी, गुजराथी या भाषा आत्मसात केल्या. त्यांचा विवाह इंदूर संस्थानातील जावरा येथील शेठ गिरधारीलाल जाजोदिया यांच्या जानकीदेवी या मुलीशी झाला.
जमनालाल यांना तरुणपणीच लोकमान्य टिळक, पंडित मदनमोहन मालवीय, रवींद्रनाथ टागोर इत्यादी थोर व्यक्तींचा सहवास लाभला. गांधीजी यांनी दक्षिण आफ्रिकेत केलेल्या कामामुळे ते प्रभावित झाले. गांधीजी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावरून परत आल्यावर बजाज यांनी त्यांची गाठ घेतली आणि “आपणास पाचवा मुलगा’ म्हणून स्वीकारावे, अशी त्यांनी गांधीजींना विनंती केली. 1908 मध्ये जमनालाल मानसेवी दंडाधिकारी झाले. तसेच वर्ष 1918 मध्ये त्यांना “रायबहादूर’ हा किताब मिळाला. नागपूर येथील वर्ष 1920चे अखिल भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या अधिवेशनाचे जमनालाल स्वागताध्यक्ष होते. कॉंग्रेसचे खजिनदार म्हणून त्यांनी दीर्घकाळ काम केले.
आपल्या संपत्तीमधील मोठा हिस्सा त्यांनी सत्याग्रहासाठी वापरला होता. त्यांनी 1920 मध्ये असहकार चळवळीत भाग घेऊन वर्धा येथे सत्याग्रह आश्रमाची स्थापना केली आणि कॉंग्रेसच्या ठरावानुसार रायबहादूर या उपाधीचा त्याग त्याच वर्षी केला. वर्ष 1923 मध्ये त्यांनी नागपूर येथे राष्ट्रध्वज सत्याग्रहाचे नेतृत्व केले. त्यासाठी त्यांना कारावास भोगावा लागला. त्याच वर्षी गांधीजीच्या कार्यास पाठिंबा देण्यासाठी “गांधी सेवकसंघा’ची त्यांनी स्थापना केली. वर्ष 1924 मध्ये ते नागपूर प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष व 1925 मध्ये चरखा संघाचे खजिनदार झाले. अस्पृश्यता निवारण, गोवर्धन, शिक्षणसंस्था यांसाठी भरीव आर्थिक मदत केली.
कॉंग्रेसच्या अस्पृश्यता निवारण कार्यक्रमामध्ये त्यांनी पुढाकार घेऊन अस्पृश्यता निर्मूलनाचा प्रचार केला आणि वर्ष 1928 मध्ये वर्ध्याचे त्यांच्या मालकीचे लक्ष्मीनारायण मंदिर हरिजनांना खुले केले. मिठाच्या सत्याग्रहाचे मुंबई येथील नेतृत्व त्यांनी केले होते. या प्रसंगी त्यांच्या पत्नी जानकीदेवी व मुलगा कमलनयन यांनाही शिक्षा झाल्या. जमनालाल यांनी वर्ध्याजवळील सेगाव हे खेडे व तेथील जमीन गांधींना दिली. वर्ष 1936 मध्ये तेथे गांधींनी “सेवाग्राम आश्रम’ स्थापन केला.
“सस्ता साहित्य मंडळ’ याद्वारे त्यांनी राष्ट्रीय विचारांचे हिंदी साहित्य प्रकाशित केले. जयपूरच्या संस्थानी प्रजेस राजकीय हक्क मिळावेत, म्हणून त्यांनी सत्याग्रह केला, त्यात त्यांना दोन वेळा 1939 मध्ये शिक्षा झाली. वर्ष 1941 मधे दुसऱ्या महायुद्धाकाळात युद्धविरोधी प्रचारांमुळे त्यांना अटक झाली. त्यांनी वर्ष 1941 मधे वर्धा येथे “गोसेजा संघा’ची स्थापना केली होती. 11 फेब्रुवारी रोजी 1942 त्यांचे निधन झाले.





