अबाऊट टर्न : टाइम मशीन

“जुने जाऊद्या मरणालागुनि’ वगैरे सगळं झूट आहे. “जुने काढूया पुन्हा उकरुनि’ हाच खरा राजमार्ग. तुम्ही एका महापुरुषाबद्दल बोला, आम्ही दुसऱ्या महापुरुषाबद्दल बोलू. पहिल्या महापुरुषाबद्दल आम्ही एकतर बोलणार नाही आणि बोललोच तर तुम्हाला लागेल असं बोलू. दुसऱ्या महापुरुषाबद्दल तुम्ही बोलू नका आणि बोललाच तर आम्हाला लागेल असं बोला. मग आपल्यात मस्त कलगी-तुरा रंगेल.
एखाद्या चित्रपटावर आम्ही बोललो तरी तुम्ही बोलायचं नाही आणि एखाद्या यात्रेबद्दल तुम्ही बोललात तरी आम्ही बोलायचं नाही, असं केलं तरी वादाला सुरुवात करता येते. झालंच तर एखादी जागा कुणाच्या जाण्याने अपवित्र होते आणि कुठल्या व्यक्तीने कुणाला मिठी मारल्यावर व्यक्तीच अपवित्र होते, याबद्दल आपण बोललो तरी एका धम्माल विषयाला तोंड फुटतं. उत्तरोत्तर विषय रंगतदार बनतो. कारण, या विषयात शुद्धीकरण, गोमूत्र वगैरे येतं. बाकी कुणावर गुन्हे दाखल होणं, त्याचे पडसाद उमटणं, चक्काजाम होणं, कुठल्यातरी मेळाव्यात राडा होणं वगैरे सुरू असतंच.
इतिहास हा फार मोठा आधार आहे. मग तो प्रतापगडच्या पायथ्याशी घडलेला असो वा रूपेरी पडद्यावर बिघडलेला असो. पंडित नेहरूंचा असो वा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा असो. इतिहास सर्वांना भूतकाळात घेऊन जातो. आपण त्यांना तिथेच रमवून ठेवू. त्यांना वर्तमानात येऊ देणं ना तुम्हाला सोयीस्कर आहे ना आम्हाला!
वर्तमानात येऊन तरी काय करणार आहेत लोक? वर्तमानात मानवी सभ्यतेचे 35 तुकडे झालेत आणि ते थंडगार फ्रीजमध्ये ठेवले गेलेत. रोज एकेक तुकडा जंगलात जाऊन टाकण्यामागेही भूतकाळात जाण्याच्या प्रयत्नांपेक्षा वेगळं काय असणार? आपण जंगलातून शहरापर्यंत आलो, याची आठवण रोज व्हायला हवी. आपण मूळचे जंगली आहोत हे दररोज जाणवायला हवं आणि फ्रीजकडे बघत-बघत रात्र रंगीत करण्याचा मुर्दाडपणा अंगात भिणायला हवा.
वर्तमानातला हा जंगलीपणा भूतकाळात नेल्याशिवाय कसा येणार लोकांच्या अंगात? एवढ्या-तेवढ्या कारणावरून कोयत्यानं एकमेकांवर हल्ले करणं, बैलगाड्यांच्या शर्यतीवरून गोळीबार करणं, राजकीय विरोधकांच्या सभेत घुसून मारामारी करणं, जेवण द्यायला उशीर झाला म्हणून वेटरचा खून करणं अशा गोष्टी वर्तमानातून जंगली काळात गेल्याशिवाय कशा शक्य आहेत? शिवाय, वर्तमानात गोवर वगैरेही आहेच.
वास्तविक तो इतिहासजमा व्हायला पाहिजे होता; परंतु इतिहासातलं सगळंच लोक विसरून गेले तर लोक सतत वर्तमानातच राहू लागतील. म्हणूनच शंभर टक्के लसीकरण कधी होऊ द्यायचं नाही. आता गोवरची साथ चांगलीच फोफावतीये; पण लक्ष आहे का कुणाचं तिच्याकडे? अहो, गॅस सिलिंडरची किंमत चार आकडी झाली, तिकडे कुणाचं लक्ष नाही, तिथं गोवरची काय कथा?
मध्यंतरीच्या काळात काही टेक्निक तुम्हीही शिकलात; आम्हीही शिकलो. उदाहरणार्थ, “कोण बोलतो’ याला इतकं अवास्तव महत्त्व द्यायचं, की “काय बोलतो’ हे कुणी विचारातच घेता कामा नये. “व्यक्तिगत’ इतकं बोलायचं, की “सामूहिक’ काही शिल्लकच राहता कामा नये. आपलं राजकीय टाइम मशीनसुद्धा असंच! एकतर आपण कालचं बोलायचं किंवा उद्याचं बोलायचं. तीनशे वर्षांपूर्वीचं बोलायचं नाहीतर शंभर वर्षांनंतरचं बोलायचं. “आजचं’ बोलत राहिलो तर आपला “उद्या’ अडचणीत येईल..!





