मनोरंजनाची माध्यमे काळानुरूप बदलतात, तशाच त्याच्या संकल्पनाही बदलतात. नाटक-सिनेमाच्या जोडीला छोटा पडदा आला, नंतर तो आणखी छोटा होऊन तळहाताएवढा झाला. टीव्हीवरच्या मालिका इतक्याच वेबसीरिज लोकप्रिय झाल्या. इंटरनेटच्या दुनियेत ‘सेन्सॉर’ नसल्यामुळे नव्या पिढीला ‘हवा तो’ कंटेन्ट मिळू लागला. श्लील-अश्लीलतेच्या कल्पना जशा काळाप्रमाणे बदलत गेल्या, तसेच मनोरंजनाचे स्वरूपही बदलत गेले. माणसातले श्वापद बाहेर काढणारे ‘रिअॅलिटी शो’ प्रचंड टीआरपी खेचू लागले. माणसाचे नीती-अनीतीच्या पलीकडे जाणारे रूप पंचेंद्रियांना आणि मेंदूला सवयीचे झाले. इतके सगळे बदल झाले तरी एक प्रश्न कायमच राहिला- पुढे काय? मनोरंजनाचा उद्योग खूप मोठा आहे आणि त्यात प्रचंड आर्थिक उलाढालही होते. पण तिथं ‘निर्मिती’ कमी आणि ‘उत्पादन’ जास्त होऊ लागल्यावर दरवेळी नवा कंटेन्ट कुठून आणायचा, हा प्रश्न पडणारच. अर्थात, तरीही या उद्योगात लेखकाला फार मोठा दर्जा आहे, असेही नाही. लोकांची ‘टेस्ट’ ज्याला कळते असा मनुष्य, अशी लेखकाची सरधोपट व्याख्या आहे. त्यामुळे येणार्या सरधोपट उत्पादनाला वैतागलेले लोक इंटरनेटच्या दुनियेत हरवून गेले. तिथेही मनोरंजनाच्या संकल्पना आता ‘खूप पुढे’ गेल्यात. लोकांना हसणं-हसवणं, घाबरवणं, थरकाप उडवणं, इमोशनल करणं, अंदाज बांधायला लावणं हे टप्पे केव्हाच ओलांडलेत. आता खर्या-खोट्यातला ङ्गरक संपुष्टात आणून लोकांची दिशाभूल करणं यालाही ‘मनोरंजन’च म्हटलं जातंय. या मनोवृत्तीचं ढळढळीत उदाहरण पाहायला मिळालं. इंटरनेटवर एक ‘बातमी’ व्हायरल झाली. लग्नमंडपातून मुलीची पाठवणी होत असताना तिने आणि तिच्या मैत्रिणींनी कसं रडावं, हे शिकवणारा सात दिवसांचा ‘क्रॅश कोर्स’ सुरू झालाय, अशी ती बातमी होती. बातमीत म्हटलं होतं, एक तरुणी आपल्या मैत्रिणीच्या लग्नाला गेली होती. पाठवणीच्या वेळी नवर्या मुलीला रडूच येईना. तिच्या मैत्रिणींनाही काय करावं कळेनासं झालं. मग एका मैत्रिणीला कुणीतरी खुणावलं आणि ती रडू लागली. तिने एवढा ‘मेलोड्रामा’ केला, की लोक रडणं विसरून हसू लागले. संपूर्ण प्रसंगाचाच फियास्को झाल्यामुळे संबंधित मैत्रिणीनं हा ‘इव्हेन्ट सक्सेसफुल’ करण्यासाठी भोपाळमध्ये क्रॅश कोर्स सुरू केला. ही बातमी अनेक माध्यमांनी ‘कॅरी’ केली. आपल्या लग्नात नाजूक प्रसंगाचं हसं होऊ नये म्हणून विवाहेच्छू मुली संबंधित वर्ग शोधू लागल्या; परंतु असा क्रॅश कोर्स संपूर्ण भोपाळमध्ये कुणालाच सापडला नाही. बातमीच्या सत्यतेची पडताळणी काही वृत्तसमूहांनी केली, तेव्हा लक्षात आलं, की पेपरमध्ये छापून आलेल्या बातमीच्या स्वरूपात धादांत खोटी माहिती प्रसारित केली गेली होती. त्या ‘बातमी’च्या तळाशी लिहिलं होतं- हा मजकूर केवळ मनोरंजनासाठी आहे! अशा मस्करीसाठी पूर्वी एक एप्रिल हा दिवस संपूर्ण जगानं मान्य केला होता; परंतु त्या दिवशी असं काही केलं, तर कुणी विश्वास ठेवणार नाही. मग मजा कशी येणार? इतरांना होणारा त्रास, इतरांची होणारी ङ्गसगत हे मनोरंजन असतं का? अपवादात्मक ‘प्रँक’ स्वीकारार्ह आहे; पण अपवादच नियम बनू लागला तर ‘प्रँक’मध्येही गोडी राहणार नाही आणि ‘लांडगा आला रे आला’ गोष्टीप्रमाणे एकंदर गांभीर्य आणि विश्वासार्हता नष्ट होऊन नुकसानच अधिक होईल, यात शंका नाही.