अबाऊट टर्न : मायावी कांचनमृग…

आत्म-जागरूकता आणि आत्ममग्नता हे वेगवेगळे विषय आहेत. स्वतःविषयी भान असणं किंवा येणं, आपल्या वर्तणुकीवर स्वतःच लक्ष ठेवणं, आपल्या हातून काही चुरगाळलं जाणार नाही याची दक्षता घेणं कधीही चांगलंच. यातूनच व्यक्तिमत्त्वाचा खर्या अर्थानं विकास होतो.
आत्ममग्नता मात्र आहे त्या स्वरूपात स्वतःच्या प्रेमात पाडते. ती आपल्याला स्वतःत बदल घडवू देत नाही. आहे तसं आपल्याला सगळ्यांनी स्वीकारावं असा अट्टहास धरते. त्यासाठी स्वतःवर प्रमाणीकरणाचा शिक्का मिळवण्याचे वेगवेगळे मार्ग शोधते आणि आजच्या काळात हा मार्ग सोशल मीडियाने मोकळा करून दिलाय. या नवमाध्यमाचा वापर सगळेच जण अविवेकी पद्धतीने करतात असं नाही; परंतु तुलनात्मक विचार करता अविवेकी वापर अधिक दिसतो.
या मानसिकतेचा एक अटळ परिणाम नको ती जोखीम पत्करणं हा आहे. एखादं सुंदर ठिकाण धोकादायकही असू शकतं, याचं भान राहात नाही ते स्वतःच स्वतःवर रोखलेल्या कॅमेर्यामुळे. मग ‘फाॅलोअर्स’ वाढतात; पण विवेक जिथल्या तिथे थांबतो. एक मायावी कांचनमृग व्यक्तीला धोक्याच्या दिशेने खेचू लागतो आणि… काही कळायच्या आत ती व्यक्ती दुनियाच सोडून जाते. मग त्या 26 वर्षांच्या ट्रॅव्हल ब्लॉगर अन्वी कामदार असोत वा मध्य प्रदेशच्या मुरेना जिल्ह्यातला अवघा 11 वर्षांचा चिमुरडा.
लोकांना आकर्षित करण्याचा एक क्षण साधताना तोच क्षण अखेरचा ठरला तरी बेहत्तर, अशी आत्मघाती मानसिकता आपण पुढच्या पिढीकडे ‘वारसा’ म्हणून देत आहोत का, याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. भटकंती या विषयावर व्हिडिओ ब्लॉग करणार्या इन्फ्लुएन्सर म्हणून अन्वी कामदार प्रसिद्ध होत्या. सोशल मीडियावर त्यांचे दोन लाखांवर फाॅलोअर्स होते. त्यांना भटकंतीसाठी ‘हटके’ ठिकाणांची माहिती अन्वी यांच्याकडून मिळत होती. पण रायगड जिल्ह्यातल्या एका धबधब्याजवळ व्हिडिओ करताना पाय घसरून त्या 300 फूट खोल दरीत कोसळल्या आणि त्यांचा प्रवास कायमचा थांबला.
‘रेस्क्यू टीम’च्या प्रमुखांचा एक व्हिडिओ पाहण्यात आला. ज्या ठिकाणी गवत दबलं गेलं होतं, तिथूनच त्या खाली कोसळल्या असाव्यात हे ओळखून तिथून शोधमोहीम सुरू करण्यात आली. ते ठिकाण ‘झूम’ करून टीमचे प्रमुख ‘इथे जाण्याची गरज होती का,’ असा सवाल करताना दिसतात. म्हणजे, धोका किमान समजण्याजोगा होता. मुरेनामधली घटना तर विचित्र धोक्याचा इशारा देतेय. प्रौढांच्या बेफिकिरीचा आणि ‘लाइक-हंग्री’ मानसिकतेचा परिणाम पुढच्या पिढीवर किती खोलवर होतोय, हे या घटनेतून दिसतं.
पोरांनी आजही भातुकली अन् चोर-पोलीस खेळावं असं कुणीच म्हणणार नाही; पण ‘रील-मेकिंग’ हा खेळ व्हावा आणि खेळता-खेळता जीव जावा, हे भयानक आहे. एकाने झाडाला दोरी बांधून गळङ्गास घेतल्याचा ‘अभिनय’ करणं, दुसर्याने शूटिंग करणं, डान्स घेणार्याचा पाय घसरणं आणि काही सेकंदात त्याचा जीव जाणं… पोरांचा आरडाओरडा… पळापळ… हे सगळं पाहताना जीव कालवतो. धोका पत्करून रील बनवण्याची जबरदस्त उत्कंठा या पोरांमध्ये आली कुठून? तिनेच या लहानग्याचा घात केला, असं नाही वाटत?





