अबाऊट टर्न : कीड

विवेक आणि विज्ञाननिष्ठेचा मार्ग सांगण्यासाठी ज्यांनी आयुष्य वेचलं, त्या डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या नवव्या स्मृतिदिनाच्या आसपास पुणे आणि सातारा या त्यांच्या कर्मभूमीत काय घडलं? शिक्षणाशी संबंध नसलेल्यांची बातच सोडा; परंतु सुशिक्षितांनी तरी अंधश्रद्धेचा पदर सोडला का? व्यवसायाची भरभराट व्हावी आणि घरात सुख-शांती नांदावी, यासाठी शिकली-सवरलेली माणसं काय करताहेत? घरात जिच्यामुळे सुख-शांती येते, तिलाच मांत्रिकाच्या सांगण्यावरून सर्वांसमक्ष आंघोळ करायला लावताहेत?
एका प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचं संचालकपद भूषवणाऱ्या व्यक्तीला उद्योजकतेचं महत्त्व कळून चुकलंय, असं मानायला हरकत नसावी. परंतु अशा व्यक्तीलाही घरात भानामती झाल्याचा भास होत असेल आणि ती व्यक्ती मांत्रिकाच्या तालावर नाचायला तयार होत असेल, तर काय म्हणावं या उद्योजकतेला? ज्या अभागिनीला सर्वांसमक्ष आंघोळ करायला लावली, तीही संबंधित कंपनीची संचालक असल्याचं प्रसिद्ध झालंय.
घरातली भानामती दूर व्हावी म्हणून संबंधित उद्योजकानं मांत्रिकाच्या सांगण्यावरून अघोरी पूजा केली. त्यानंतर पत्नीला सर्वांदेखत आंघोळ करायला लावली. काय म्हणायचं या वेडगळपणाला? अंधश्रद्धा, बुवाबाजी, जादूटोणा ही केवळ खेड्यांची आणि अशिक्षितांची मक्तेदारी आहे, असं अजूनही कुणाला म्हणायचंय? विज्ञान-तंत्रज्ञानाचे वारेच जिथे पोहोचलेले नाहीत, अशा ठिकाणी एखादी घटना घडल्यास समजून घेता येईल. परंतु “ग्लोबल’ मानल्या जात असलेल्या शहरांमध्ये अंधश्रद्धांची पाळंमुळं इतकी खोलवर रुजलेली असणं लाजिरवाणंच म्हणावं लागेल.
आपल्याला दुसरी कशाचीही नसली तरी प्रबोधनाची प्रदीर्घ परंपरा आहे. आपल्या समाजात लोकांना शहाणं करणाऱ्या विचारांची पेरणी आपोआप व्हावी, अशी सोय केलेली आहे. हजारो वर्षांपासून वेडगळ समजुती दूर करणाऱ्या लोकांनी या भूमीत जन्म घेतलाय. अंधश्रद्धांवर प्रहार करणारी मोठी संतपरंपरा आपण सांगतो; मानतो. आपली समाजसुधारकांची परंपराही मोठी आहे. “महाराष्ट्र’ शब्द उच्चारल्याबरोबर “पुरोगामी’ हा शब्द आपोआप येतो. अशा राज्याच्या प्रगत आणि सुखवस्तू भागात आजही अंधश्रद्धांमुळे एका अभागिनीला तिच्या मानसन्मानाला मुकावं लागत असेल आणि साताऱ्यासारख्या ठिकाणी एखाद्या अभागिनीवर मांत्रिकाकडून अत्याचार होत असेल, तर भौतिक आणि मानसिक सुधारणांची सांगड घालायची कशी?
एखादी महिला घरगुती अडचणी घेऊन थेट मांत्रिकाचा दरवाजा ठोठावते आणि डोक्यावरून लिंबू उतरवताना तो मांत्रिक तिला संमोहित करतो. तिच्या हतबलतेचा फायदा घेऊन तिच्यावर अत्याचार करतो, ही घटना एकविसाव्या शतकातल्या बावीसाव्या वर्षातली वाटते? उशापायथ्याला तंत्रज्ञान घेऊन झोपणारी पिढी उगवलीये. घरातली कामंही “अलेक्सा’ करू लागलीय; परंतु माणूस नावाच्या यंत्रातला बिघाड काही केल्या दुरुस्त होण्याचं नाव घेईना. आपल्या पीछेहाटीचं कारण तो घरातल्या तथाकथित भानामतीमध्ये शोधतोय आणि त्याचा उपाय मांत्रिकाच्या अघोरी पूजेत, पत्नीच्या अप्रतिष्ठेत शोधतोय.
बात बुवाबाजीची असो वा मनात लपलेल्या अंधश्रद्धांची, पितृसत्ताक समाजव्यवस्थेत शोषणाचा बळी ठरते ती स्त्रीच. घरातील अडचणी पुरुषामुळे उद्भवलेल्या असल्या, तरी त्या सोडवण्याच्या बहाण्यानं सर्वस्व लुटलं जातं स्त्रीचंच! तिच्याकडून आलेलं स्त्रीधन हडप करून त्यावर सासरची मंडळी कर्ज काढतात आणि पुन्हा घरावर संकट आलं म्हणून तिच्याच स्वाभिमानाचा बळी देतात. ही दोन्ही संतापजनक प्रकरणं आपल्या समाजाला लागलेली बुरसटलेल्या, कोत्या विचारांची कीड दाखवून देणारी आहेत.





