– उज्ज्वला शिंदे वेदांचे खरे स्वरूप लोकांसमोर आणून अंधश्रद्धा आणि कर्मकांडावर प्रहार करणारे युगद्रष्टा समाजसुधारक म्हणजे दयानंद सरस्वती. एकेश्वरवादाचा पुरस्कार करणारे दयानंद यांची आज जयंती. एकेकाळी आर्यावर्त म्हणवल्या गेलेल्या या भारतभूमीने आपल्या कुशीत अनेक दार्शनिक, विचारवंत आणि तत्त्वचिंतकांना वाढवले आणि याच तत्त्वचिंतकांनी भारतभूमीला या आर्यसंस्कृतीला वैश्विक अधिष्ठान प्राप्त करून दिले. आर्यावर्ताच्या समृद्धतेचा सुवर्णकाळ जिथे ह्या भारतभूमीने आपल्या दृष्टीत सामावून घेतला तिथेच बदलत्या कालचक्रामुळे आर्यावर्ताच्या सभ्यतेच्या र्हासाची, अध:पतनाची ही भूमी साक्षीदार झाली. धर्म क्षीण झाला आणि वासना शक्तिशाली झाली. न्यायाची जागा अन्यायाने आणि पुरुषार्थाची जागा प्रमादाने घेतली. एकंदरीत युगानुयुगे सामाजिक उदासीनता इथे नांदत राहिली. धर्म, जाती, पंथ, अनिष्ट रूढी-परंपरांमध्ये विभाजित झालेला हा भारतीय समाज आर्यावर्तातील एकात्मता हरवून बसला. अशा काळातही अनेक तत्त्वचिंतक या भारतभूमीला लाभले परंतु, त्यांचे कार्य धर्म आणि अध्यात्म एवढेच मर्यादित राहिले. तेव्हा अशा विविध जाती, धर्माच्या, पंथाच्या तुकड्यांमध्ये विभागलेल्या ह्या भारतभूमीला राष्ट्रीय आणि सामाजिक ऐक्याने मजबूत बनविणार्या युगद्रष्टा महापुरुषांची गरज निर्माण झाली. कित्येक काळापासून अज्ञानाच्या, अंधश्रद्धेच्या, दांभिकतेच्या चक्रव्यूहात बंदिस्त असलेल्या भारतीय समाजाला विमुक्त करणार्या अशा एका युगद्रष्टा महापुरुषाचा जन्म 12 फेब्रुवारी 1824 रोजी गुजरातमधील मोरवी संस्थानातील टंकारा या गावी झाला. करसनजी त्रिवेदी यांच्या ब्राह्मण कुटुंबातील मूळशंकर नामक बालकच पुढे वैदिक धर्माचा प्रचार आणि प्रसार करणारे महर्षी दयानंद सरस्वती म्हणून ओळखले गेले. महर्षी दयानंद यांच्या जन्मापूर्वी भारतीय समाजात जातीयता, धर्मांधता स्पृश्यास्पृश्यता, बालविवाह, जरठ कुमारी विवाह, सती प्रथा आदी अनिष्ट प्रथांचे स्तोम माजलेले होते. महर्षींनी या प्रथांना विरोध करतानाच स्त्री शिक्षणावर भर दिला. एवढेच नाही तर स्त्रियांसहित सर्व वर्णातील लोकांना वेद अध्ययनाचा अधिकार आहे हे त्यांच्याच गुरूकुलातून अध्ययन देऊन कृतीत उतरविले. महर्षी दयानंद सरस्वती यांनी वेद हे प्रमाण आणि शुद्ध आहे असा उपदेश करतानाच हिंदू धर्मासहित विविध धर्मातील विद्वानांशी त्यासंबंधी शास्त्रार्थ केला. ‘वेदांकडे परत चला’ अशी घोषणा केली. भारतीय विद्वानांसमवेतच अनेक विदेशी विद्वानांना या तत्त्ववेत्याने आकर्षित केले. 1875 मध्ये मुंबईत प्रथम आर्य समाजाची स्थापना केली. त्यांचे दहा नियम बनविले. एकेश्वरवादाचे समर्थन करणार्या महर्षींनी मूर्तिपूजा अमान्य केली. ईश्वर नित्य, निर्गुण, निराकार आणि सर्वशक्तिमान आहे, तो कधीही अवतार घेत नाही. हे वेद वाङ्मयाच्या आधारे सिद्ध केले. त्यामुळे अनेक विचारवंतांनी महर्षी दयानंद सरस्वती यांच्या आर्य समाजाचा स्वीकार केला. संस्कृत भाषेला महर्षींनी दिलेले स्थान अनन्यसाधारण होते. लंडनमध्ये संस्कृत शिकविण्यासाठी त्यांनी श्यामजी कृष्ण वर्मा यांना पाठवले, यावरून हे लक्षात येते. अशाप्रकारे एकेश्वरवादातून भारतीय समाजात धार्मिक दृष्टीने एकता आणि अखंडता प्रस्थापित करण्याचे महत्कार्य स्वामीजींनी केले. आधुनिक भारतात अनेकांनी धार्मिक, सामाजिक सुधारणेबाबत विचार मांडले परंतु धर्मग्रंथात समाविष्ट अनिष्ट गोष्टींवर प्रहार करण्याचे महत्कार्य महर्षींनी केले. हरिद्वार येथे कुंभमेळ्यात पाखंड खंडणी पताका रोवून अंधविश्वास, पाखंड व कुरीतींचे खंडन करण्यास प्रारंभ केला. धार्मिक क्षेत्रातील अनेक भ्रामक कल्पनांमुळे समाज निष्क्रिय झाला आहे. या निष्क्रिय समाजाला वैदिक कर्मसिद्धांताचे महत्त्व स्वामीजींनी पटवून दिले. महर्षींनी ओळखले होते की राष्ट्रीय आणि सामाजिक ऐक्य साधल्याशिवाय देशाची प्रगती साधली जाणार नाही. यासंदर्भात ते नेहमी म्हणत असत- आपले राज्य कितीही वाईट असले, तरी ते विदेशी राज्यापेक्षा चांगले असते. यातूनच स्वराज्य या संकल्पनेचे देणे महर्षींनी देशाला दिले. महर्षी प्रखर राष्ट्रवादी होते. महर्षी दयानंद यांनी ‘सत्यार्थ प्रकाश’ या ग्रंथातून एक वैचारिक क्रांती घडवून आणली. तर आर्य समाज या संस्थेद्वारे जगाचे सर्वांगीण कल्याण साधणारे एक महत्त्वपूर्ण ठिकाण महत्त्वपूर्ण नियमांनी बांधून समाजाला समाजोद्धारासाठी दिले. आदित्य-ब्रह्मचारी, सत्यान्वेषी, साहसी, क्रांतिकारी, प्रकांड पंडित, दिग्विजय विद्वान, ईश्वर भक्त, योगी, बुद्धिवादी, शिक्षण प्रसारक, स्त्रीमुक्ती दाता, समाजसुधारक, देशभक्त, राष्ट्रवादी, समतावादी अशा अनेक गुणवैशिष्ट्यांनी परिपूर्ण स्वामीजींचे जीवन होते. महर्षी दयानंद सरस्वती यांचे जीवनकार्य आधुनिक समाजाला विचार प्रवृत्त करणारे आणि प्रेरणादायी आहे. आज समाजाला या विचारांच्या अनुकरणाची गरज आहे.