Pune : अंधश्रद्धा, अज्ञानावर रंगरेषांचे फटकारे

पुणे : अंधश्रद्धा, कट्टरता, भोंदूपणा आणि अज्ञान अशा मुद्द्यांवर भाष्य करणाऱ्या व्यंगचित्राचे प्रदर्शन अंनिसकडून बालगंधर्वच्या कलादालनात आयोजित केले आहे. महाराष्ट्रासह देशभरातील २५ व्यंगचित्रकारांची १५० हून अधिक चित्रे असलेल्या या प्रदर्शनाचा सोमवारी शेवटचा दिवस असून, गेली दोन दिवस नागरिक प्रदर्शनाचा लाभ घेत आहेत.
समाजात घडणाऱ्या घटना, नेते आणि अभिनेत्यांची वक्तव्ये, सरकार व प्रशासनाच्या वर्तनातील विरोधाभासाची अतिशयोक्ती करून त्यांच्यावर टीका, तर घडणाऱ्या घटनांवर भाष्य करण्यासाठी व्यंगचित्रासारख्या माध्यमांचा वापर केला जातो.
त्यामुळे समाजात असलेली अंधश्रद्धा आणि गेल्या काही काळातील वाढती कट्टरता, अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दलची दुटप्पी भूमिका, धर्मसत्ता आणि राज्यसत्ता यांची मिलिभगत, वैज्ञानिक योजनांच्या यशासाठी केला जाणारा पूजापाठ आणि श्रद्धेतून सामान्य भाविकांचे होणारे शोषण यासारख्या विषयांवर भाष्य करणारी व्यंगचित्रे या प्रदर्शनात ठेवण्यात आली आहेत. आपल्याकडे वेगवेगळ्या प्राण्यांबद्दल असलेल्या अंधश्रद्धा दूर व्हाव्यात म्हणून या प्राण्यांचे फलक तयार करून त्यावर त्या प्राण्यांची भूमिका हायकू कवितांमध्ये मांडली आहे आणि त्यांच्याबद्दल असलेली मान्यता खोडून काढण्याचा प्रयत्न केला आहे.
विवेकवादी विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी व्यंगचित्र एक प्रभावी माध्यम आहे. त्यामुळे आम्ही राज्यासह देशातील निवडक व्यंगचित्रकारांच्या चित्रांचे प्रदर्शन करण्याचे ठरवले. यात सतीश आचार्य, मंजुल आणि रवी राणेंसारख्या आघाडीच्या व्यंगचित्रकारांची चित्रे इथे आहेत.
– गौरव सर्जेराव, व्यंगचित्रकार आणि आयोजकमला ही संकल्पना प्रचंड वेगळी वाटली. मला वाटते राज्यातील प्रत्येक शाळेत असे प्रदर्शन भरले पाहिजे. यातील काही चित्रांमधून लगावलेल्या मार्मिक टोल्यामुळे ती काहीशी टोचतात, तर काही चित्र खूप हसवतात. काही तुम्हाला विचारात पाडतात.
– राधिका पाटिल, नागरिकही खूप डोळस संकल्पना आहे. मी माझ्या मुलासाठी इथे आलो होतो. मुलांमध्ये विवेकवाद, विज्ञानवाद आणि अंधश्रद्धा याबद्दल जागृकता वाढवायची असेल, तर नक्की इथे भेट दिली पाहिजे. त्यातून विचारांवर बसलेली जळमटे दूर होतील.
– सुभाष शेंडगे, नागरिक





