62 वर्षांपूर्वी प्रभात : निग्रोंना प्रवेश देणाऱ्या शाळेवर गोऱ्या पोरांचा बहिष्कार

संयुक्त शेतीच आजच्या स्थितीत अत्यंत योग्य
नवी दिल्ली, ता. 19 – आज लोकसभेमध्ये राष्ट्रपतींच्या आभाराचा ठराव संमत झाला. चार दिवसांच्या चर्चेचा समारोप पंतप्रधान नेहरू यांनी केला. ते म्हणाले, देशाच्या सध्याच्या स्थितीत संयुक्त शेतीचे उद्दिष्टच चांगले होय. अर्थात अशी शेती शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय सुरू केली जाणार नाही. संयुक्त शेतीबाबतच्या मसानी यांच्या टीकेला नेहरू यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, मी परंपरेच्या विरुद्ध नाही. पण काही परंपरेच्या पाशांतून भारताने बाहेर पडण्याची आवश्यकता आहे.
संततिनियमनावर पोटात घेण्याचे प्रभावी- स्वस्त औषध
नवी दिल्ली – कलकत्ता येथील बॅक्टरियॉलॉजिकल इन्स्टिट्यूटने सतत 10 वर्षांच्या संशोधनानंतर संततिप्रतिबंधक औषध शोधून काढले असून ते रामबाण आहे असे समजते. या प्रभावी औषधाची किंमत ऍस्पिरिनच्या गोळीपेक्षा कमी असून ते तोंडावाटे पोटात घ्यायचे असते. हे औषध लवकरच सरकारतर्फे किंवा प्रमुख खासगी फर्मतर्फे बाजारात विक्रीस येईल.
डॉ. एस. एन. संन्याल म्हणाले, अनेक स्त्रियांना हे औषध देण्यात आले, ते प्रभावी आणि बिनधोक असल्याचे आढळून आले. या औषधाचे नाव “मिक्सिलोहायड्रोक्निनिन’ असे असून ते स्त्रिया आणि पुरुष या दोघांनाही घेता येते. स्त्री आणि पुरुषाने हे औषध विशिष्ट प्रमाणात घेतले तर अनपेक्षित आणि अनिच्छेने होणारी गर्भधारणा टाळणे बहुतांशी शक्य होते असा डॉ. संन्याल यांनी निर्वाळा दिला.
निग्रोंना प्रवेश देणाऱ्या शाळेवर गोऱ्या पोरांचा बहिष्कार
फ्रॉंटिरॉयल (व्हर्जिनिया) – अखिल गौरवर्णीय विद्यार्थ्यांसाठीच असलेल्या पूर्वेच्या शाळेत काळ्या निग्रो विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास विरोध करण्यासाठी काल येथे गोऱ्या शाळकरी पोरांनी बहिष्काराचे अस्त्र उपसले. गोरे व गौरेतरांसाठी शाळा चालू केल्यापासून व्हर्जिनियात अशा तऱ्हेचे हे पहिलेच निदर्शन होत आहे.





