47 वर्षांपूर्वी प्रभात : दिरंगाई हे भ्रष्टाचाराचे एक प्रमुख कारण

दिरंगाई हे भ्रष्टाचाराचे एक प्रमुख कारण
मुंबई, दि. 17 – भ्रष्टाचाराचे एक प्रमुख कारण प्रकरणे निकालात काढण्यास होणारा विलंब हे आहे. प्रभाव व दबाव यांचा उपयोग होऊ नये म्हणून सरकारी कामे त्वरेने उरकली गेली पाहिजेत, असे पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सांगितले.
त्या पुढे म्हणाल्या, हा होणारा विलंब, आपल्या गुंतागुंतीच्या कार्यपद्धतीमुळे बऱ्याच वेळा होतो म्हणून ती सोपी केली पाहिजे. भ्रष्टाचार हा सामाजिक रोग असून त्याच्याशी निर्धाराने लढा दिला पाहिजे. पण भ्रष्टाचाराचे मुद्दामच अतिरंजित चित्र रंगविण्यात येत आहे. त्यामुळे सरकारची पत कमी होऊन आपल्या राजकीय संस्थावरील लोकांचा विश्वास उडावा असा त्यांचा हेतू आहे.
सोयूझ आणि अपोलो यान अंतराळात जोडले
स्पेस सेंटर, ह्युस्टन – “आम्ही जिंकलो’ या विजयघोषात आज अमेरिका आणि रशिया या पृथ्वीवरील दोन बड्या शक्तींच्या अपोलो व सोयूझ यानांचे आज अंतराळात ऐतिहासिक मीलन झाले. पृथ्वीपासून 224 किमी अंतरावर भारतीय वेळेनुसार रात्री 9 वा. 39 मिनिटांनी “अपोलो’ हे अमेरिकन यान व “सोयूझ’ हे रशियन यान एकमेकांना जोडण्यात आले.
ठरलेल्या वेळेच्या सहा मिनिटे आधीच हे मीलन झाले. याने जोडण्यात आल्यानंतर काही मिनिटांतच अमेरिकन यानाच्या कमांडरने काहीतरी जळाल्यासारखा वास येत असल्याचे सांगितले होते. मॉस्को येथील दूरचित्रवाणीवर हे मीलनाचे दृश्य दाखविण्यात आले.





