रशियाची भारतात हेरगिरी
नवी दिल्ली – रशिया भारताच्या अंतर्गत बाबतीत हेरगिरी करीत असल्याचा जोरदार आरोप विरोधकांनी आज राज्यसभेत केला. पण संरक्षणमंत्री स्वर्णसिंग यांनी त्याचा इन्कार केला. रशिया भारताला मिग विमानाची सुधारित आवृत्ती आणि सुटे भाग देत नसल्याच्या विरोधकांच्या आरोपाचाही स्वर्णसिंगांनी इन्कार केला. राजकीय पक्षांच्या बैठकीत विदेशी लोकही भाग घेतात. ही नेहमीचीच पद्धत आहे, असे स्वर्णसिंग यावेळी म्हणाले.
खासदारांमध्ये स्त्री-पुरुष भेद नाही
नवी दिल्ली – लोकसभेच्या सदस्यांना माझ्या दृष्टीने स्त्री-पुरुष भेद नाही, असे उद्गार सभापती धिल्ला यांनी काढले. तसेच माझ्या दृष्टीने सर्व सदस्य सभ्य गृहस्थ आहेत, असेही सभापती महोदय म्हणाले.
राज्यांच्या स्वायत्ततेवर आघात नाही
नवी दिल्ली – आज केंद्रीय अर्थमंत्री सुब्रह्मण्यम यांनी तीन दिवसांच्या चर्चेस राज्यसभेत उत्तर दिले. राज्यांच्या स्वायत्ततेवर आघात करण्याची केंद्राची इच्छा नाही, परंतु राज्यांनी खर्च करताना कोणती शिस्त पाळली पाहिजे हे सांगण्याचा केंद्राचा हक्क आहे व केंद्र तो बजावणार. कारण चलनवाढ रोखण्यासाठी केंद्राचा जो कार्यक्रम आहे त्यासाठी हे आवश्यक आहे. आज राज्यसभेत पंतप्रधान इंदिरा गांधींनी असे सांगितले की, मंत्र्यांची येणी व देणी किती आहेत ती जाहीर करण्याचा सरकार विचार करीत आहे. इतके दिवस मंत्री आपल्या मालमत्तेचा हिशोब फक्त पंतप्रधानांना सादर करीत असत.