46 वर्षांपूर्वी प्रभात : सर्वप्रथम देशाचा आणि देशबांधवांचा विचार

सर्वप्रथम देशाचा आणि देशबांधवांचा विचार
पुणे, दि. 3 – लोकांनी सर्वप्रथम आपल्या देशाचा व देशबांधवांचा विचार करावा. त्यामुळेच त्यांचे सामर्थ्य वाढण्यास मदत होईल, असे आवाहन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी केले. सध्या देशापुढे असणाऱ्या प्रश्नांचा उल्लेख करून गांधींनी अशी आशा व्यक्त केली की येत्या काही महिन्यांत देशभर शांतता, एकात्मता व सहानुभूती याकरिता काम करण्यासाठी लोकमत तयार होईल.कधीकधी स्वप्नांची प्रत्यक्षात पूर्ती होत नाही. अशा वेळी तरुणांनी आत्मविश्वास गमावू नये. उलट अधिक झटावे.
डॉ. वॉट यांच्या धूमकेतूचे दर्शन
पुणे – काल सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास पूर्वेकडे क्षितिजापासून सुमारे 15 अंश उंचीवर द्विनेत्रीच्या साहाय्याने डॉ. वॉटच्या धूमकेतूचे दर्शन झाले. द्विनेत्रीमधून दिसणारे दृश्य फारच मनोहर आहे. धूमकेतूचे डोके खूप मोठे गोलाकार व अत्यंत तेजःपुंज असून त्याभोवती प्रकाशमान अशी प्रभा सर्व बाजूला दिसते. शेपटीचा आकार किंचित वक्र असून ती उत्तरेच्या दिशेने जवळजवळ 45 अंश झुकलेली दिसते. आकार पिसाऱ्याप्रमाणे आहे. तर 6.14च्या सुमारास हा धूमकेतू नुसत्या डोळ्याने दहा मिनिटे दिसला.





