अग्रलेख : राजकारण्यांची डायलॉगबाजी

सुमारे दोन महिन्यांपूर्वी महाराष्ट्रातील राजकारणामध्ये भूकंप होऊन शिवसेनेत उभी फूट पडली आणि त्यानंतर शिवसेनेचे जे आमदार गुवाहाटीला गेले त्यापैकी सोलापूर जिल्ह्यातील आमदार शहाजी पाटील यांचा “काय ते डोंगर’ या आशयाचा एक डायलॉग तुफान लोकप्रिय झाला होता. महाराष्ट्रात नवे सरकार प्रस्थापित होऊन दीड-दोन महिने झाले असले तरी राजकारण्यांची अशी डायलॉगबाजी मात्र काही संपायला तयार नाही, हेच दिसून येते.
व्यासपीठ गाजवण्यासाठी किंवा कार्यकर्त्यांच्या टाळ्या मिळवण्यासाठी किंवा आपला एखादा मुद्दा रेटण्यासाठी सिनेमातील डायलॉगचा आधार घेणे हे समजण्यासारखे असले तरी त्यामुळे मूळ विषयाचे गांभीर्य कमी होण्याचा धोका असतो याची जाणीव अद्याप अनेक राजकारण्यांना नाही याचेच नवल वाटते. दक्षिण भारतातील अनेक राज्यांमध्ये राजकारण आणि सिनेमा हातात हात घालून पुढे चालत असतात आणि अनेक अभिनेते राजकारणात यशस्वी झाल्याची उदाहरणे तेथे असली, तरी महाराष्ट्रमध्ये मात्र अशी फारशी उदाहरणे नाहीत. म्हणूनच कदाचित महाराष्ट्रातील राजकारण्यांना सिनेमातील डायलॉगबाजीचा मोह पडत असावा.
दोन दिवसांपूर्वी भाजपची मुंबईमध्ये एक महत्त्वाची सभा झाली. त्यात मुंबईचे नवनीत अध्यक्ष आशिष शेलार यांचा सन्मान करण्यात आला. अर्थात, हा सन्मान आशिष शेलार यांचा असला तरी त्यामध्ये सर्वात जास्त कौतुक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे झाले. मात्र, हे कौतुक करतानाच बहुतेक सर्व नेत्यांना डायलॉगबाजीचा आधार घ्यावा लागला. “देवेंद्र फडणवीस जहॉं खडे होते है वहॉं से लाइन शुरू होती है’ असा डायलॉग फेकून आशिष शेलार यांनी महाराष्ट्राच्या राजकारणातील देवेंद्र फडवणीस यांचे महत्त्व अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला. अर्थात, देवेंद्र फडणवीस मुत्सद्दी राजकारणी असल्याने त्यांनी आपल्या वजनाचा आणि शरीरयष्टीचा संदर्भ देत “मी अमिताभ नाही तर गब्बरसिंग आहे’ अशाप्रकारचे विधान केले आणि “कितने आदमी है’ हा माझा आवडता डायलॉग आहे, असेही सांगितले.
मुंबई महापालिकेची निवडणूक लवकरच होणार असल्याने कार्यकर्त्यांच्या मनात जिद्द आणि ईर्षा निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातूनच भाजपच्या नेत्यांनी अशा प्रकारे व्यासपीठे गाजवायला सुरुवात केली आहे, हे उघड आहे. मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी आशिष शेलार यांची नियुक्ती करण्यात आल्याने त्यांचे नाव सतत चर्चेत राहील. महापालिका निवडणुकीत भाजपाला यश मिळवून देण्यासाठी या चर्चा उपयुक्त ठरतील, याच एका दृष्टिकोनातून या सगळ्या गोष्टी सुरू आहेत. अर्थात, गेल्या आठवड्यात पार पडलेल्या दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने जो नवीन वाद सुरू झाला आहे त्यालाही कारणीभूत राजकारण्यांची डायलॉगबाजीच आहे. एका दहीहंडी कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी “50 थरांची दहीहंडी मी गेल्याच महिन्यात फोडली’ अशा प्रकारचे विधान करून अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे यांना टोला मारला आहे.
दुसरीकडे शिवसंवाद यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असलेले आदित्य ठाकरे यांनी अद्यापही गद्दार आणि गुलाम या शब्दांचा वापर करणे थांबवलेले नाही. साहजिकच आदित्य ठाकरे यांची ही शिवसंवाद यात्रा नसून विसंवाद यात्रा आहे अशा प्रकारचा डायलॉग एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांच्या मुखातूनही बाहेर पडला. आणखी एक विषय म्हणजे नोकरीमध्ये दहीहंडी खेळणाऱ्या गोविंदांना पाच टक्के आरक्षण दिले जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्यानंतर त्यावरूनही अनेक डायलॉग समोर येऊ लागले आहेत. अजित पवार यांनी अत्यंत संयमी प्रतिक्रिया व्यक्त करताना भावनिक पातळीवर अशा प्रकारचे निर्णय घेणे चुकीचे ठरू शकेल, असे विधान केले आहे, ही सर्वात महत्त्वाची प्रतिक्रिया मानावी लागेल. पण दुसरीकडे भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि विद्यमान मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मात्र या निर्णयाचे समर्थन करताना भविष्यात मागणी झाल्यास इतर खेळाडूंनाही नोकरीमध्ये आरक्षण दिले जाऊ शकते, असे विधान करून धमाल उडवून दिली आहे.
एकूणच राजकारण हा गांभीर्याने करण्याचा विषय असला तरी विद्यमान महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मात्र गांभीर्याची उणीव जाणवत आहे, असाच निष्कर्ष या सर्व डायलॉगबाजीवरून काढावा लागतो. एकाला उत्तर देण्याच्या निमित्ताने किंवा एखादा विषय मांडण्याच्या निमित्ताने एखादा नेता जो डायलॉग मारतो त्याला प्रत्युत्तर देताना दुसरा नेता अशाच प्रकारचा नवीन डायलॉग मारतो आणि ही डायलॉगबाजी सतत चालूच राहते. त्यामुळे मुख्य विषयाला बगल मिळते आणि सामान्य नागरिक मात्र एक प्रेक्षक म्हणूनच या डायलॉगबाजीकडे पाहात राहतो. महाराष्ट्राच्या पाठोपाठ ज्या राज्यामध्ये सत्तांतर झाले त्या बिहारमध्ये उपमुख्यमंत्रिपदावर असलेले राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी ज्या गंभीरपणे राजकारण करायला सुरुवात केली आहे ते उदाहरण समोर असताना महाराष्ट्रातील सध्याचे राजकारण जास्तच घसरत चालल्याचे दिसत आहे. तेजस्वी यादव यांनी आपल्या पक्षाच्या मंत्र्यांसाठी आचारसंहिता तयार केली आहे.
कोणीही कोणाच्या पाया पडायचे नाही, कोणत्याही मंत्र्यांनी विनाकारण मोटारींची खरेदी करायची नाही अशा प्रकारची आचारसंहिता तेजस्वी यादव यांनी आपल्या मंत्र्यांसाठी तयार केली आहे. अशाच प्रकारचे गंभीर राजकारण महाराष्ट्रातही अपेक्षित आहे; पण दुर्दैवाने गेल्या काही दिवसांमध्ये भावनिक पातळीवर असे अनेक निर्णय घेतले जात असल्याने राजकारणातील हे गांभीर्यच कमी होऊ लागले आहे. राजकारण हा एक नेत्यांचा खेळ आहे आणि या खेळामध्ये जो चांगले वक्तृत्व गाजवू शकतो तो यशस्वी होऊ शकतो, असे आजवर अनेक वेळा सिद्ध झाले आहे. पण केवळ सभा गाजवण्यासाठी आणि व्यासपीठावर टाळ्या मिळवण्यासाठी डायलॉगबाजी करणे महत्त्वाचे की खरोखर गंभीर राजकारण करून लोकांच्या समस्या सोडविणे महत्त्वाचे याचाही विचार करण्याची वेळ आता आली आहे.
आकर्षक अशा डायलॉगबाजीमुळे एखादा विषय लोकांपर्यंत पोहोचत असेल तर ते स्वागतार्ह असले तरी त्याचा अतिरेक होणार नाही, याचाही विचार आता सर्वच पक्षांच्या नेत्यांना करावा लागणार आहे. डायलॉगबाजी करत करतच गांभीर्याने राजकारण करण्याचा समतोल आता सर्वांना साधावा लागणार आहे. अन्यथा लोक फक्त टाळ्या वाजवतील आणि पुढील पिक्चर पाहायला जातील हे विसरून चालणार नाही.





