संरक्षण : महाराष्ट्राची सागरी सुरक्षा?

एक आंतरराष्ट्रीय बोट एक महिन्याहून जास्त काळ आपल्या सागरी हद्दीमध्ये तरंगत होती, तरी गस्त घालणाऱ्या तिन्ही दलांच्या नौकांना ती कशी दिसली नाही. त्यामुळे महाराष्ट्र सागरी सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते.
रायगडच्या हरिहरेश्वरच्या समुद्रात एक संशयास्पद बोट मिळाल्याने खळबळ उडाली. त्यामुळे महाराष्ट्र पोलीस सतर्क झाले. खबरदारीची उपाययोजना म्हणून रायगड जिल्ह्यात अलर्ट देण्यात आला. या बोटीत एक काळ्या रंगाचा बॉक्स आढळून आला, त्यात तीन रायफल आणि काही काडतुसं मिळाली. स्थानिक नागरिकांना ही संशयास्पद बोट आढळून आली. समुद्रात मोठ्या लाटा उसळत असल्यामुळे दोरीच्या साहाय्याने ही बोट खेचून बाहेर काढली गेली. महाराष्ट्र एटीएस, रायगड पोलीस आणि केंद्रीय तपास यंत्रणांनी याची चौकशी सुरू केली. या बोटीवर नेपच्युन मॅरिटाइम सिक्सुरीटी असं लिहिलेले होते. बोट किनाऱ्याजवळ आढळून आली तेव्हा या बोटीवर कोणीही नव्हतं.
केंद्रीय यंत्रणा आमच्या संपर्कात आहे, असं निवेदन उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केले. या बोटीचं नाव लेडी हान असून तिची मालकी ऑस्ट्रेलियन नागरिक हाना लॉंडरन यांची आहे. या महिलेचा नवरा जेम्स हॉबर्ट या बोटीचा कप्तान असून ही बोट मस्कतहून युरोपला जाणार होती. 26 जूनला बोटीचं इंजिन निकामी झालं आणि खलाशांनी मदतीचा कॉल दिला. त्याच दिवशी 1 वाजता कोरियन युद्धनौकेने बोटीवरील खलाशांची सुटका केली आणि त्यांना ओमानला सुपूर्त केलं. समुद्र खवळलेला असल्याने लेडी हाना बोटिंगचं टोईंग करता आलं नाही. समुद्राच्या अंतर्गत प्रवाहामुळे ही बोट भरकटत रायगडच्या किनारी आली.
अनेक प्रश्नांची उत्तरे जरुरी
देशाची सागरी सुरक्षा ही तीनस्तरीय आहे. पहिल्या स्तरात किनारपट्टीपासून बारा नॉटिकल माइलपर्यंत पोलीस सागरी सुरक्षेकरिता जबाबदार आहेत. 12 नॉटिकल माइलपासून 200 नॉटिकल माइलपर्यंत भारतीय तटरक्षक दल जबाबदार आहे. 200 नॉटिकल माइलच्या पुढच्या समुद्रामध्ये भारतीय नौदल जबाबदार आहे. वरील बोट जवळजवळ एक महिन्याहून जास्त काळ आपल्या सागरीहद्दीमध्ये तरंगत होती, तरीपण गस्त घालणाऱ्या तिन्ही दलांच्या नौकांना ती कशी दिसली नाही? याशिवाय हवेतून हेलिकॉप्टर आणि विमानेसुद्धा गस्त घालत असतात. त्यांनासुद्धा ही बोट दिसली नाही. 26/11 नंतर पश्चिम किनारपट्टीवर रडारचे जाळे बसवण्यात आले होते. ही आंतरराष्ट्रीय बोट असल्यामुळे हिच्यावरती ऍटोमॅटिक आयडेंटिफिकेशन सिस्टीमही होती, तरीपण आपल्या रडारना ही बोट का दिसली नाही, असे अनेक प्रश्न समोर येतात. याविषयी नक्कीच चौकशी झाली पाहिजे.
महाराष्ट्र राज्यास 720 कि. मी. किनारपट्टी लाभली आहे आणि 1 हजार कि. मी. खाड्या आहेत ज्या निगराणीखाली ठेवण्यात आलेल्या आहेत. किनारपट्टीवर 728 लॅंडिंग पॉइंट (बोटीतून उतरण्याची जागा/धक्का) असलेला महाराष्ट्र याबाबतीत अव्वल आहे. खाड्या निगराणीखाली ठेवणे हे एक आव्हानच आहे. आता सर्व लॅंडिंग पॉइंटवर पर्यवेक्षक तैनात केले आहेत. सर्वाधिक नोंदीत आणि अनोंदीत स्थाने क्लोजसर्किट टेलिव्हिजन निगराणीखाली ठेवण्यात आलेली आहेत, जेणेकरून चढ-उतारावर लक्ष ठेवले जाऊ शकेल.
सागरी किनारी सुरक्षा उपेक्षित
गेल्या काही महिन्यांमध्ये पश्चिम किनारपट्टीवर अनेक वेळा हजारो कोटी रुपयांची अफू, गांजा, चरस पकडण्यात आले आहे. याशिवाय या किनारपट्टीवरती तस्करी म्हणजे सोने, खोट्या नोटा आणल्या जातात असेपण रिपोर्ट आहेत. आताच पाकिस्तानमधून एक टेलिफोन कॉल आला होता की, समुद्राकडून महाराष्ट्रामध्ये दहशतवादी हल्ला होणार आहे.
पश्चिम किनारपट्टीवर अरबी देश यांच्या बरोबर बेकायदेशीर व्यापार चालू असतो अशी वृत्त मधून-मधून येतात. गुजरात किनारपट्टीवर अनेक पाकिस्तानी बोटी रण ऑफ कच्छमध्ये पकडल्या गेल्या आहेत, पण त्यामध्ये माणसे नव्हती. म्हणजेच किनारपट्टीवरती वेगवेगळ्या प्रकारचे सुरक्षाभंग वेळोवेळी होत असतात. दहशतवादी हल्लाच म्हणजे सुरक्षाभंग असे नव्हे, कारण सर्जिकल स्ट्राइकमुळे पाकिस्तानची आता दहशतवादी हल्ला बाकीच्या भारतामध्ये करायची हिंमत नाही.
दरवर्षी कोकण किनाऱ्यावर भरकटलेली जहाजे येऊ लागली आहेत. हा सुरक्षा व्यवस्थेला धोका आहे. कारण या जहाजांमध्ये धोकादायक साहित्य असू शकते. काही दहशतवादी संघटना, तस्कर, त्याचा वापर तस्करीसाठी, देशविघातक कारवायांसाठी करू शकतात. जहाज मुद्दाम भरकटवून किनाऱ्यापाशी आणून काही धोकादायक साहित्य किनाऱ्यावर आणले जाऊ शकते. तसेच या जहाजांमध्ये जे इंधन असते ते जर समुद्रात पसरले तर पर्यावरणाला धोकादायक ठरू शकते. 2005 साली सुरू झालेल्या सागरी सुरक्षा योजनेअंतर्गत समुद्री पोलीस दल निर्माण करण्यात आले. योजनेचे उद्दिष्ट सागरी भागातील गस्ती आणि निगराणी करताच्या पायाभूत सुविधा सशक्त करण्याचे होते. विशेषतः किनारपट्टी नजीकच्या उथळपाण्याच्या भागांत.
आपल्या यंत्रणेमध्ये अनेक उणिवा
तस्कर/दहशतवादी यंत्रणा आपल्या उणिवांचा गैरफायदा घेऊन कारवाई करतात. त्यांना सहज सापडतील अशा अनेक उणिवा आपल्या यंत्रणेमध्ये आहेत. म्हणून देशात वारंवार तस्करी होऊ शकतात. कोकण किनाऱ्यावर आता तटरक्षक दलाचे मुंबई बंदर, मुरुड-जंजिरा आणि रत्नागिरी बंदर असे तीन तळ आहेत. सर्वत्र बंदर खात्याची यंत्रणा आहे. शिवाय सागरी गस्त घालणारी पथके आहेत. पोलिसांनी सुरक्षा व्यवस्थेत किनारी भागातील नागरिकांचे सहकार्य असावे, म्हणून सागरी सुरक्षा पथके स्थापन केली आहेत. अशी सारी व्यवस्था असूनदेखील किनारी भागात भरकटलेली जहाजे येतात. बंदर खाते, नौदल, तटरक्षक दल, पोलीस यंत्रणा पुरेशी सतर्क नाही, असे चित्र दिसते आहे. अनेक वर्षांनंतर आता सागरी गस्तीसाठी फौजफाटा, अद्ययावत उपकरणे, पोलीस ठाणी जमा होऊ लागली असली, तरी सुरक्षेचे कडे अजूनही मजबूत नाही.
मच्छीमारांमधून फौजफाटा भरती
मुंबईसारख्या ठिकाणी या तीन यंत्रणांव्यतिरिक्त डीजी-शिपिंग, कस्टम्स, मुंबई पोर्ट ट्रस्ट अशा अनेक यंत्रणांचा संबंध येतो. मुंबई पोर्ट ट्रस्टनेही मुंबई बंदराभोवतीच्या वाहतुकीत सुसूत्रता आणण्यासाठी काही चॅनेल तयार केले. पण या चॅनेल्सचे छोट्या नौकांकडून वारंवार उल्लंघन होत असते. गेल्या काही वर्षांत प्रवासी वाहतूक प्रचंड वाढली आहे. पण त्यावर पोर्ट ट्रस्टचे नियंत्रण नाही. छोट्या यॉट्स, हार्बर क्रूझ बोटी यांच्यावर सध्या पुरेसा अंकुश नाही.
ड्युटीसाठी मच्छीमार बांधवांमधून फौजफाटा भरती करावा. परिणामकारक निगराणी करता, सागरी पोलीस नागरिक-स्नेही (चांगले वर्तवणूक करणारे) असले पाहिजेत. भारतीय नौदल, भारतीय तटरक्षक दल, सैनिकी अभियंत्रज्ञ, ई.एम.ई. यांतील कर्मचाऱ्यांना डेप्युटेशनवर किंवा यातील निवृत्त कर्मचाऱ्यांना भरतीद्वारे सागरी पोलीस दलात घेण्यास प्रोत्साहन दिले पाहिजे. घातक विचार पसरविणारे, संशयास्पद हालचाली करणारे,चुकीच्या व्यवसायात गुंतलेले यांची माहिती सुरक्षा यंत्रणेला देणे हे सर्व नागरिकांनी आपले कर्तव्य समजले पाहिजे.





