संरक्षण : आयएनएस तुशील (एफ 70)

– हेमंत महाजन
आयएनएस तुशील ‘मेक इन इंडिया’ धोरणाच्या अनुषंगाने भारताच्या सामरिक हितासाठी महत्त्वाची ठरेल. आयएनएस तुशील हिंद महासागरात चीनच्या वाढत्या सामर्थ्याचा मुकाबला करण्यासाठी भारताला मदत करील.
वोरोनेझ रडार प्रणाली काय आहे?
वोरोनेझ लाँग-रेंज अर्ली वॉर्निंग रडार प्रणालीचा एकूण पल्ला आठ हजार किलोमीटरपर्यंत आहे. ही प्रणाली एकाच वेळी 500 हून अधिक लक्ष्यांचा शोध घेऊ शकते, म्हणजेच ट्रॅक करू शकते. वोरोनेझ रडार यंत्रणा बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि स्टेल्थ विमानांचा मागोवा घेण्यास सक्षम आहे. रशिया 2012 पासून ही रडार प्रणाली वापरत आहे.
भारताली ही प्रणाली का हवी?
रशियाची वोरोनेझ रडार यंत्रणा मिळाल्यास ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाच्या अनुषंगाने किमान 60 टक्के प्रणाली भारतीय भागीदारांद्वारे तयार केली जाईल.वाढत्या सुरक्षा धोक्यांमध्ये हवाई संरक्षण सुविधांचे आधुनिकीकरण करण्याच्या देशाच्या प्रयत्नांचा हा एक भाग आहे. या प्रणालीमुळे भारताला चीन, दक्षिण आणि मध्य आशिया आणि बहुतेक हिंद महासागर क्षेत्रातील हवाई धोक्यापासून दूर ठेवण्यास मदत करील. क्षेपणास्त्र शोधण्याच्या प्रयत्नांमध्ये रडार महत्त्वाची भूमिका बजावेल.
जेव्हा एखादा उपग्रह प्रक्षेपण शोधतो तेव्हा तो वोरोनेझ रडारला सतर्क करतो. आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचे प्रक्षेपण धोक्याची पडताळणी करणे हे या रडार यंत्रणांचे काम आहे. बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे शोधण्यासाठी ही यंत्रणा रशियाच्या उपग्रहांबरोबर एकत्रित काम करते. भारताच्या शत्रूंकडून वाढत्या क्षेपणास्त्र धोक्याला शोधण्यासाठी प्रगत रडार प्रणाली महत्त्वाची आहे. चीनमधून फायर केलेल्या क्षेपणास्त्रांनासुद्धा या प्रणालीमुळे निष्क्रिय करता येईल.
वोरोनेझसारखी प्रगत रडार प्रणाली भारताला येणार्या काळातील धोक्यांना तोंड देण्यास सक्षम करील. रडारच्या मल्टीरोल क्षमतेत अंतराळ निरीक्षणाचा समावेश आहे. त्यामुळे ही प्रणाली भारताच्या अंतराळ कार्यक्रमासाठी देखील महत्त्वपूर्ण ठरू शकते. अवकाशातील वस्तूंवर नजर ठेवण्याची रडारची क्षमता भारताच्या नागरी आणि लष्करी उद्दिष्टांशी सुसंगत आहे. त्याचा फायदा भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो)ला देखील होणार आहे. यामुळे भारत पाच हजारांपेक्षा जास्त रेंजच्या रडार प्रणाली असलेल्या राष्ट्रांच्या यादीत सामील होईल.
आयएनएस-तुशील
आयएनएस तुशील (एफ 70), अत्याधुनिक बहुउद्देशीय मार्गदर्शित क्षेपणास्त्र युद्धनौका 9 डिसेंबर 2024 रोजी रशियाच्या कॅलिनिनग्राड येथील यंतर शिपयार्डमध्ये भारतीय नौदलात सामील करण्यात आली. अत्याधुनिक मल्टी-रोल स्टेल्थ-गाइडेड मिसाइल फ्रिगेट ‘आयएनएस तुशील’ ही युद्धनौका कॅलिनीनग्राडमध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि अॅडमिरल दिनेश त्रिपाठी यांच्या उपस्थितीत भारताला देण्यात आली.
भारतीय नौदलासाठी गेम चेंजर
आयएनएस तुशील ही 125 मीटर लांब आणि 3,900 टन वजनाची युद्धनौका आहे. ही युद्धनौका रशियन, भारतीय अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि युद्धनौका बांधणीतील सर्वोत्तम पद्धतींचे प्रभावी मिश्रण आहे. आयएनएस तुशील अनेक अत्याधुनिक शस्त्रांनी सुसज्ज आहे. यामध्ये ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र, उच्च श्रेणीच्या पृष्ठभागावरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र आणि विमानविरोधी तोफा यांचा समावेश आहे. याशिवाय या युद्धनौकेत नियंत्रित क्लोज-रेंज रॅपिड फायर गन सिस्टम, पाणबुडी मारणारे टॉर्पेडो यासह अनेक प्रगत रॉकेट्स आहेत. युद्धनौकेच्या डिझाइनमुळे रडारपासून वाचण्याची क्षमता आणि चांगली स्थिरता मिळते.
2016 मध्ये भारत आणि रशिया यांच्यात 4 स्टेल्थ फ्रिगेट्ससाठी सुमारे 21 हजार कोटी रुपये किमतीचा करार झाला होता. यापैकी 2 युद्धनौका रशियात (यंतर शिपयार्ड) आणि 2 गोवा शिपयार्डमध्ये बांधण्यात येणार आहेत. तुशीलच्या डिलिव्हरीनंतर रशिया जून-जुलै 2025 मध्ये तमलला भारताकडे सुपूर्द करेल. भारतीय नौदल आणि रशियन जहाज डिझाइन कंपनी सेव्हर्नॉय डिझाइन ब्यूरोच्या तज्ज्ञ अभियंत्यांच्या मदतीने, आयएनएस तुशीलमधील स्वदेशी सामग्री 26 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आली आहे.
भारतीय नौदलात वापरल्या जाणार्या बहुतेक जहाजांमध्ये वापरल्या जाणार्या गॅस टर्बाइनची निर्मिती युक्रेनियन कंपनी नेीूर-चरीहिीेशज्ञीं करतात. हे जागतिक स्तरावर हायड्रोगॅस टर्बाइनच्या उत्पादनासाठी ओळखले जाते. या संपूर्ण ऑर्डरची सर्वात मोठी गोष्ट म्हणजे युद्ध असूनही भारताला हे जहाज रशिया आणि युक्रेनच्या मदतीने मिळाले आहे.
आयएनएस तुशीलवर 18 अधिकार्यांसह 180 कर्मचार्यांचा ताफा तैनात केला जाऊ शकतो. जहाजावर 8 ब्रह्मोस अनुलंब प्रक्षेपित केलेली जहाजविरोधी क्रूझ क्षेपणास्त्रे, 24 मध्यम पल्ल्याच्या आणि 8 कमी पल्ल्याच्या पृष्ठभागावरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे, एक 100 मिमी तोफ आणि दोन क्लोज-इन क्षेपणास्त्रे असतील. तुशील ही क्रोव्हॅक-3 श्रेणीतील युद्धनौका आहे.
भारतात सध्या अशा 6 युद्धनौका सेवेत आहेत. ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ आणि हाय रेंज क्षेपणास्त्रांनी सुसज्ज अशा 3 युद्धनौकांची डिलिव्हरी बाकी आहे. आयएनएस तुशील ही प्रगत पाणबुडीविरोधी युद्धनौका आहे. यात प्रगत युद्ध आणि हवाई संरक्षण प्रणाली आहे; ज्यामुळे याचा अनेक मोहिमांसाठी वापर केला जाऊ शकतो.
लवकरच पाणबुड्यांचा करार
केंद्र सरकारने देशी बनावटीच्या अणुऊर्जेवर चालणार्या दोन पाणबुड्यांच्या निर्मितीला मंजुरी दिली असून, नौदलासाठी तीन स्कॉर्पिन वर्गातील पाणबुड्यांच्या बांधणीचा करार पुढील महिन्यात होणे अपेक्षित आहे, अशी माहिती नौदलप्रमुख अॅडमिरल दिनेश त्रिपाठी यांनी दिली. अणुऊर्जेवर चालणारी पहिली पाणबुडी 2036-37 पर्यंत, तर दुसरी पाणबुडी त्यापुढील दोन वर्षांत तयार होईल.
भारताच्या विविध जहाजबांधणी कारखान्यांत 62 युद्धनौका आणि एका पाणबुडीची बांधणी सुरू आहे. या शिवाय देशी बनावटीच्या 31 नौका आणि पाणबुडी बांधणी प्रकल्पाचे प्रस्ताव मान्य करण्यात आले आहेत. नौदलासाठी 60 युटिलिटी हेलिकॉप्टरच्या खरेदीस सरकारची मान्यता दिली आहे. यामुळे भारताची संरक्षण क्षमता येणार्या काळात आणखी मजबूत होणार.





