संरक्षण : अरिघात – संरक्षणातील ब्रह्मास्त्र

– सत्यजित दुर्वेकर
दुसरी स्वदेशी बनावटीची अण्वस्त्र सुसज्ज पाणबुडी ‘अरिघात’ भारतीय नौदलात सामील झाल्याने एकप्रकारे ब्रह्मास्त्र लाभले असून ते क्वचितच वापरण्याची गरज भासेल.
आयएनएस अरिघात पाणबुडीचे वजन 6 हजार टन असून लांबी 112 मीटर आहे. ‘आयएनएस’च्या आतमध्ये अणुभट्टी असून त्यामुळे पाणबुडीला वेग मिळतो. ही पाणबुडी सागरी पृष्ठभागावर कमाल 12 ते 15 नॉट्स (22 ते 28 किलोमीटर प्रती तास) आणि पाण्याखाली 24 नॉट्स (44 किलोमीटर प्रतितास) वेग देऊ शकते. ‘अरिघात’मध्ये दुहेरी हुल, बॅलास्ट टँक, दोन सहायक इंजिन आणि आपत्कालीन स्थितीत शक्ती आणि गतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी थ्रस्टर बसविले आहे. सागरी किनार्यावर अतिशय शांतपणे गस्त घालणार्या आण्विक पाणबुडीमुळे भारतावर कोणताही देश अण्वस्त्र हल्ला करण्याचे धाडस दाखविणार नाही.
दबदबा वाढणार
‘अरिघात’च्या समावेशाने सागरी विश्वात भारताचा दबदबा वाढणार आहे. 8 वर्षांपूर्वी 2016 मध्ये भारतीय नौदलात आण्विक विजेवर चालणारी पहिली पाणबुडी ‘आयएनएस अरिहंत’ला सामील करण्यात आले होते. आयएनएस ‘अरिघात’ अरिहंतपेक्षा अधिक सामर्थ्यशाली आहे. यात साडेतीन हजार किलोमीटरपर्यंत लक्ष्य भेदणारे चार आण्विक बॅलेस्टिक क्षेपणास्त्र (के-4) बसविणे शक्य आहे.
अणुहल्ल्याला उत्तर
युद्धाच्या स्थितीत ही पाणबुडी शत्रूच्या किनारपट्टीवर अतिशय गुप्तपणे जाऊ शकते आणि मोक्याच्या ठिकाणांवर हल्ला करू शकते. भारतावर अणुहल्ला झाल्यास आणि भारतीय लष्कर जमिनीवरचे अग्नी बॅलेस्टिक क्षेपणास्त्र तसेच राङ्गेल किंवा सुखोई-30 विमाने शत्रूंवर अणुहल्ला करण्याच्या स्थितीत नसतील तर अशावेळी ‘अरिघात’च्या कमांडरला हल्ला करण्याचे निर्देश दिले जातील.
न्यूक्लियर ट्रायड
आण्विक पाणबुडी क्षमता मिळवत भारताने आण्विक त्रिकूट म्हणजे न्यूक्लियर ट्रायडची क्षमता आणखी मजबूत केली. यामुळे शत्रू देश हे भारतावर अणुहल्लाच काय; पण सर्व स्तरावरील पारंपरिक युद्ध लढण्यासही कचरतील. दुसर्या शब्दांत सांगायचे झाल्यास आण्विक पाणबुडीची शक्ती ही देशात सीमेवर शांतता राखण्यास उपयुक्त ठरेल.
प्रत्युत्तर देण्याचे स्वातंत्र्य
भारताने शत्रू देशांत धडकी भरविण्यासाठी अग्नी क्षेपणास्त्र तैनात केले असून हवाई दलाच्या लढाऊ विमानांना देखील अण्वस्त्र सज्ज केले आहे. मात्र, सागरी मार्गावर आण्विक पाणबुडीची आणि क्षेपणास्त्रांची उणीव भासत होती. त्यामुळे अशाप्रकारची शस्त्रसज्जता देशासाठी सेकंड स्ट्राइक म्हणजेच प्रत्युत्तराच्या स्थितीत नेहमीच महत्त्वाची ठरते. मे 1998 मध्ये दुसर्या अणुचाचणीनंतर भारताने जगाला अणुहल्ला न करण्याची हमी दिली; पण त्याचवेळी एखाद्याने अणुहल्ला केला तर देश प्रत्युत्तर म्हणून महाविनाशकारी हल्ला करण्यास स्वतंत्र असेल, असाही संदेश दिला गेला.
निवडक देशांचा समूह
‘अरिघात’ची क्षमता मिळवल्यानंतर भारत आघाडीचे निवडक देश अमेरिका, ङ्ग्रान्स, रशिया, चीनच्या समूहात सामील झाला आहे. या देशांकडे अणु त्रिकुट शक्ती आहे. कदाचित या कारणांमुळे पूर्व लडाखच्या सीमेवर 50 हजारांपेक्षा अधिक जवान चार वर्षांत तैनात केलेले असतानाही चीनशी खुले युद्ध सुरू होऊ शकले नाही. कारण शेवटी त्याची परिणीती आण्विक क्षेपणास्त्रांच्या वापरात होऊ शकते.
लहान परंतु उपयुक्त
अमेरिकेकडे सुमारे 70 आणि चीनकडे डझनभर आण्विक पाणबुड्यांची क्षमता आहे. भारतानेदेखील आण्विक पाणबुड्यांची किमान क्षमता साध्य करण्याचे ध्येय ठेवले आहे. यानुसार नौदलाला येत्या सहा महिन्यांत तिसरी आण्विक पाणबुडी ‘अरिंदमन’ मिळेल. चौथ्या आण्विक पाणबुडीची निर्मिती सुरू आहे. अन्य देशांच्या तुलनेत भारताच्या आण्विक पाणबुडीचा ताङ्गा लहान आहे. मात्र शत्रूचा मुकाबला करण्यासाठी पुरेसा आहे.
रशियाकडून सहकार्य
आण्विक पाणबुडी तयार करताना भारताला अमेरिकी किंवा अन्य युरोपीय देशांचे सहकार्य लाभले नाही. परंतु रशियाने महत्त्वाचे तंत्रज्ञान सहकार्य केले. ‘अरिहंत’ आणि ‘अरिघात’च्या विकासात रशियाच्या अभियंत्यांनी बरेच काम केले. तत्पूर्वी रशियाने भारताला दोन आण्विक पाणबुड्या भाड्याने दिलेल्या आहेत. 1989 मध्ये त्यांनी चार्ली श्रेणीतील पाणबुड्या दिल्या आणि त्याचे नाव चक्र-1 असे दिले. परंतु त्याचा भाडेकरार संपल्यानंतर अकुला श्रेणीतील दुसरी पाणबुडी दहा वर्षांच्या भाड्यावर आणण्यात आली. आता रशिया दहा वर्षांच्या भाडेकरारावर आणखी एक आण्विक पाणबुडी देण्याची तयारी दर्शवित आहे.
डीझेलवर पाणबुडी हवी
भारताला डीझेलवर चालणार्या पाणबुडीच्या ताफ्यांचा विस्तार करण्याची गरज आहे. भारताच्या पारंपरिक पाणबुडीच्या ताफ्यात सध्या 16 डीझेल पाणबुड्या आहेत. ङ्ग्रान्सिसी स्कॉर्पिन श्रेणीतील आतापर्यंत मिळालेल्या पाच पाणबुड्यांव्यतिरिक्त (सहावी आणि शेवटच्या पाणबुडी निर्मितीचे काम मुंबईत सुरू आहे) अन्य सर्व पाणबुड्या आता निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत.
ताफा वाढवावा लागेल
या दशकाच्या प्रारंभी भारतीय नौदलाकडे 2030 पर्यंत किमान 24 पाणबुड्या असणे गरजेचे असल्याचे म्हटले होते. परंतु नवीन डीझेल पाणबुड्या ताफ्यात सामावून घेण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झाला नाही आणि जुन्या 12 डीझेल पाणबुड्या येत्या काही वर्षांत निवृत्त कराव्या लागतील. भविष्यातील धोका लक्षात घेता हिंंद महासागरात टेहेळणीसाठी पाणबुड्यांची संख्या वाढविणे गरजेचे आहे.





