निसर्गगाणे : गुरूवचने फुटली पहाट…

“गुरूवचने फुटली पहाट…’ या संतश्रेष्ठ श्री तुकोबारायांच्या जागृतीपर अभंगावर कीर्तन करताना, कीर्तनकार बुवा म्हणाले की, श्रोते जनहो! संताच्या वचनाचा अर्थ हा संत सद्गुरू पदास पोहोचलेल्यांनाच विचारावा लागतो. तरच तो नेमकेपणाने कळतो.
आता ही गुरूवचने फुटली पहाट म्हणजे काय? हे आपण प्रत्येकाने नेमकेपणाने जाणून घ्यायला हवे. कारण तुमच्या आमच्या जीवनात खरं तर अशी रोजच पहाट उगवत असते आणि ती आपल्या आळसात किंवा साखरझोपेत निघून जात असते. त्यामुळेच प्रथम आपल्याला पहाट म्हणजे काय हे समजून घ्यायला हवे.
पहाट म्हणजे काय तर अज्ञानरूपी अंधाऱ्या रात्रीचा शेवट आणि ज्ञानरूपी सूर्योदयाची जी मंगल वेळ ती म्हणजे पहाट. खरं तर निसर्गात ही अशी नवी पहाट रोज फुटत असते. ही निसर्गातील पहाट जशी रात्रीचा अंधार दूर करते आणि प्रकाशाचे सारे साम्राज्य निर्माण करते त्याप्रमाणे सद्गुरूच्या बोधाचा सूर्योदय माणसाच्या जीवनात झाला की त्याच्या जीवनातील मी, माझे, मला हा स्वार्थ, माया, मोह, आसक्ती यात वैचारिक परिवर्तन घडते. त्यातून ज्ञानाचा उदय होतो. माणसांनी खऱ्या अर्थाने “जागणे’ ही त्याच्या जीवनातली गुरूकृपेने फुटणारी पहाट आहे.
हल्ली शहरी जीवनात पहाट फारशी पाहायला मिळत नाही. पूर्वी खेडोपाड्यातून मात्र अशी खरी पहाट जागवीत काही मंडळी हे दारोदार यायची, खेड्यात अजूनही येतात. त्यात गाव जागवीत येणारी वासुदेवाची स्वारी, रामदासी मंडऴी ही जशी तसेच “उठा उठा हो सकलिक वाचे स्मरावा गजमुख’ किंवा “घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला’ असे भोपाळीचे स्वर कानी यायचे आणि त्या बरोबर मानवी तनास-मनासही जागविले जायचे.
पहाटेचं शांत, प्रसन्न, सुगंधित, शीतल वातावरण, पक्ष्यांच मधुर कुंजन, भूपाळीचे दूरवरून येणारे सुर, मंदिरातल्या घंटांचे आवाज अशी जी पहाट फुटत येते, ती पहाट मानवी मनास खऱ्या अर्थाने जागवत येते. ते जागवणं हे केवळ शरीराचे नाही तर मनाचे असते.
“मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे साधन’ हे लक्षात घेऊन जागृत मनाने आपण आपली नित्य कर्मे ही त्या ईश्वराच्या साक्षीने करायची आणि त्या कर्म फलाची अपेक्षा न बाळगता ती ईश्वारार्पण करायची. हीच आहे मानवी जीवनातली खरी पहाट फुटणं.





