पुणे जिल्हा : भोरमध्ये शांततेत मतदान प्रक्रिया पूर्ण

-मतदार संघात एकूण ६७. ७९ टक्के मतदान
– दुपारनंतर मतदान केंद्रांवर नागरिकांची गर्दी
– भोर पोलिसांचा चोख बंदोबस्त
भोर – २०३ भोर विधानसभा मतदार संघात प्रशासनाच्या कर्तव्य जबाबदारीतून मतदान केंद्रांवर शांततेत मतदान प्रक्रिया पूर्ण पार पडली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डाॅ. विकास खरात यांनी दिली. भोर २४०, वेल्हे ९६ तर मुळशी २२८, अशा एकूण ५६४ मतदान केंद्रावर ३७२२ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती.
मतदान प्रक्रिया सकाळी ७ वाजल्यापासून सुरू झाली असताना ७ ते ११ यावेळीत १८ टक्के मतदान झाले होते. तर दुपारीनंतर मतदान केंद्रावर नागरिकांनी चागलीच गर्दी केल्यामुळे सायंकाळी पाच वाजेपर्यंत ५८.१७ टक्के मतदान झाले होते. सायंकाळी ६ पर्यंत या मतदार संघात ६७.७९ टक्के मतदान झाले. यामध्ये भोर ७३.५४, वेल्हे ७३.८६ व मुळशी ६१.७९ टक्के, असे एकूण विधानसभा मतदार संघात ६७. ७९ टक्के मतदान झाले, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
दुपारनंतर मतदान केंद्रावर गर्दी झाल्यावर नागरिकांनी मतदानाचा हक्क शेवटपर्यंत बजावला. नंतरच मतपेट्या सील करण्यात आल्या. भोर तालुक्यात १ लाख ७० हजार २१३ मतदार, वेल्हे तालुक्यात ५४ हजार ५० तर मुळशी तालुक्यात २ लाख ६ हजार १५, असे तीनही तालुक्यांत एकूण ४ लाख ३० हजार २७८ मतदार आहेत. यामध्ये महिला मतदार २ लाख २ हजार ९३०, तर पुरुष मतदार २ लाख २७ हजार ३४० मतदार आहेत. मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी मुळशीतील ९ सोसायटींत सहा मतदान केंद्र तयार करण्यात आली होती.
प्रत्येक मतदार केंद्र असलेल्या शाळेच्या इमारतीजवळ सावलीची सोय, तसेच सोसायटींमध्ये मतदान सुविधा उपलब्ध करण्यात आल्या होत्या. बावधन, हिंजवडी व इतर अशा पाच सोसायटींमध्ये सहा मतदान केंद्र तयार करण्यात आली होती. १५०० पेक्षा अधिक मतदान असणारे एकही केंद्र नसून शहरी मतदान केंद्र ५३ तर ग्रामीण ५०० मतदान केंद्र होती. सर्व मतदार केंद्रावर पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असताना मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.
चुरस वाढली…
मतदारांसाठी प्रशासनाच्या वतीने मतदान केंद्रावर ज्येष्ठ, दिव्यांगांसाठी व्हिलचेअर तसेच आरोग्य सेवा उपलब्ध करण्यात आली होती. मतदार संघात महाविकास आघाडी, महायुती यांच्यामध्ये मोठी चुरस लागली असताना प्रत्येक गावातील बुथवर दोन गटाच्या कार्यकर्त्यांनी गर्दी करून निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. अपक्ष उमेदवारांनी मतदारांना देवदर्शन घडवून आणल्यामुळे काही ठिकाणी मतदारांचा कल त्यांच्या बाजूने दिसत होता. महाविकास आघाडीचे उमेदवार संग्राम थोपटे, महायुतीचे उमेदवार शंकर मांडेकर, अपक्ष किरण दगडे पाटील, कुलदीप कोंडे या उमेदवारांनी सकाळी मतदान केंद्रावर जाऊन सहकुंटूंबासह मतदानाचा हक्क बजवला.
असे झाले मतदान
तालुका पुरुष महिला इतर एकूण
भोर ६६००५ ५९१६९ २ १२५१७६
वेल्हे २१६२२ १८२९८ १ ३९९२१
मुळशी ६९२८५ ५७३२२ ० १२६६०७





