67 वर्षापूर्वी प्रभात : ता. 9 माहे ऑक्टोबर सन 1954

सिलोनांतील हिंदी लोकांची भारतीय म्हणून नोंद करावी
सिलोनी शिष्टमंडळाचे मनोगत
दिल्ली, ता. 8 – सिलोनांतील सर्व हिंदी लोकांची (ज्यांचे अर्ज फेटाळण्यात आले आहेत किंवा जे सिलोनी नागरिकत्वास अपात्र आहेत) भारतीय म्हणून नोंद करावी, अशी सूचना सिलोनी शिष्टमंडळाचे दोन सदस्य श्री. सेनानायके व बंदरनायके यांनी केल्याचे कळते. आज या दोघांनी पं. नेहरू यांची भेट घेऊन आपला दृष्टिकोन विशद केला. उद्या भारत सिलोनच्या औपचारिक वाटाघाटी सुरू होणार असून पं. नेहरूंना अनौपचारिकरित्या अगोदर भेटावे असे ठरवूनच ही मंडळी आज गेली होती.
राष्ट्रसंघांत चीनच्या समावेशास विरोध
टोकियो – शांततासंबंध संस्थेची बैठक भरून जे निर्णय घेण्यात आले त्यात चीनचा राष्ट्रसंघात समावेश करण्यास विरोध करण्यात आला आहे. ही बैठक 12 दिवस चालली व 10 राष्ट्रांच्या 300 प्रतिनिधींनी तीत भाग घेतला.
अमेरिकन प्रतिनिधींनी चीनच्या राष्ट्रसंघ प्रवेशास विरोध केला व ब्रिटनने चीन जगातील बडे राष्ट्र झाल्याचा निर्वाळा देऊन त्यांस स्थान देण्याचा आग्रह केला. कम्युनिझमपासून आग्नेय आशियाचे रक्षण करण्यासाठी अधिक तांत्रिक मदत द्यावी असे एकमताने ठरले. जपानच्या उत्कर्षासंबंधी परिषदेत एकमत झाले.
हैदराबादेच्या तेलगू लोकांना दोन तेलगू राज्ये हवीत
औरंगाबाद – हैदराबादचे महसूलमंत्री श्री. के. व्ही. रंगा रेड्डी येथील कॉंग्रेस कार्यकर्त्यांसमोर भाषण करताना म्हणाले की, हैदराबाद संस्थानांतील 95 टक्के तेलगू राज्ये निर्माण करावीत व त्यांत हैदराबाद, आंध्र, ओरिसा व मध्य प्रदेश यातील तेलगू भाषिकांचा समावेश करण्यात यावा या मागणीला
पाठिंबा आहे. त्यांनी अशी माहिती दिली आहे की, हैदराबादमधील एका उर्दू साप्ताहिकांत निजामाने लिहिलेल्या काही आक्षेपार्ह लिखाणाबद्दल प्रदेश कॉंग्रेस कमिटीने ऑ. इ. कॉं. कमिटी व संस्थांनी तक्रार केली आहे.





