67 वर्षापूर्वी प्रभात : बुधवार ता. 26 माहे ऑगस्ट सन 1953

पाकिस्तान व्याप्त “आझाद काश्मीर’च्या मंत्रिमंडळांत पुन्हा लाथाळ्या सुरू
श्रीनगर ता. 25 : पाकिस्तानने व्यापलेल्या आझाद काश्मीरच्या मंत्रिमंडळांत पुन्हा लाथाळ्या सुरू झाल्या असून पेचप्रसंग निर्माण झाल्याचे कळतें. रावळपिंडीवरून आलेल्या वार्तांनुसार या तथाकथित आझाद काश्मीर सरकारच्या दोन मंत्र्यांनी राजीनामा देण्याचा धाक घातला आहें. राजीनामा देण्यास तयार झालेल्या या मंत्र्यांची नावें पीर झियाउद्दिन व चौधरी हमीदुल्ला अशी आहेंत.
आझाद काश्मीरचे माजी प्रमुख चौधरी गुलाम अब्बास यांच्या गटाचेच हे दोघे असल्याचे समजतें. चौधरी गुलाम अब्बास गेले वर्षभर राजकारणातून निवृत्त झाले होते पण पुनः त्यांनी राजकारण प्रवेश केला आहें. आझाद काश्मीर सरकारांतील गटबाजीचा परिणाम म्हणजे या मंत्र्यांचा संभाव्य राजीनामा होय.
काश्मीरी वजीर बक्षी नेहरूंना भेटून परतले..
काश्मीरचे नवे वजीर बक्षी गुलाम महंमद, पंतप्रधान नेहरू यांना भेटून आजच विमानाने श्रीनगर येथे परत आले.
काश्मीरी विकास योजनांना जोराची चालना..
पंचवार्षिक योजनेखालील सर्व विकासयोजनांना जोराची चालना देऊन ठरलेल्या वेळांत त्या पुऱ्या करण्याचा हुकूम दिल्याचे नवे वजीर बक्षी साहेब यांनी पत्रकारांना निवेदन केले.
नेहरू-अली करारावर पाक मंत्रिमंडळाचें शिक्कामोर्तब
पाक पत्रांचें व लोकमताचें हृदयपरिवर्तन
उलट्या प्रवाहावर मात करण्यांत अलींना यश
कराची ता. 25 : नुकत्याच नवी दिल्ली येथे हिंद-पाक पंतप्रधानद्वयाच्या झालेल्या काश्मीरविषयक वाटाघाटीसंबंधी पाकिस्तानी मंत्रिमंडळात गेले पाच दिवस चर्चा चालली होती. आज ती चर्चा समाप्त होऊन काश्मीर संबंधी झालेल्या नेहरू-अली करारावर मान्यतेचें शिक्कामोर्तब करण्यात आलें.
काश्मीरसंबंधी नेहरू-अली वाटाघाटींना विरोध करणारा फार मोठा वर्ग पाकिस्तानांत असला, तरी त्यांचा विरोध मावळून टाकण्याच्या कामी पंतप्रधान मोहमंद अली यांना फारच मोठ्या प्रमाणांत यश आल्याचे समजते.
काही पाकिस्तानी पत्रांनी नेहरू-अली संयुक्त पत्रकांवर ताशेरे झाडलेले असले आणि सार्वमताला दीर्घकाळाचा अवकाश असून या काळांत हिंदुस्थान आपले काश्मीरमधील बुड स्थिर करील, अशी मते काही पत्रांनी व्यक्त केलेली असली, तरी एकंदरीत तो सूर कमी होत चाललेला दिसतो. आणि संयुक्त पत्रकांत सूचित केलेल्या आदेशाप्रमाणें काश्मीरप्रकरणी हिंद-पाकच्या सलोख्यावर बिब्बा न घालण्याचें धोरण त्यांनी अंगिकारलेले असावें.





