61 वर्षापूर्वीं प्रभात : हॉटेलकर रद्द करण्याची मागणी

मराठी चित्रपटांचे अस्तित्वच धोक्यात आणणारा नवा फिल्मी कर रद्द करा
पुणे, ता. 11 – येथील प्रभात स्टुडिओ भारत सरकारने विकत घेतल्याने पुण्यातील चित्रपट व्यवसायाचा संसार उघडा पडला असून या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या स्थानिक कलावंतांना व तंत्रज्ञांना चित्र निर्मितीच्या मुंबई-कोल्हापूर या केंद्राकडे, गाव सोडून धाव घेणे वा पुण्यातच चित्र व्यावसायाची नव्याने उभारणी करणे असे दोनच पर्याय उरले आहे. मराठी चित्र निर्मितीच्या पुणे या प्रमुख केंद्रावर बेघर होण्याची पाळी आली असतानाच केंद्र सरकारच्या अर्थमंत्र्यांनी आपल्या नव्या 1960-61च्या अर्थसंकल्पात एक्सपोज्ड फिल्मच्या प्रत्येक मीटरवर 50 नये पैसेप्रमाणे एक्साइज ड्यूटी लादण्याची तरतूद केली आहे.
29 फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपर्यंत सिनेफिल्म स्टुडिओज व प्रोसेसिंग लॅबोरेटरीजना “एक्सपोज्ड व प्रोसेसड् फिल्मचा हिशेब ठेवून साठा जाहीर करण्याचे’ हुकूम संबंधित अधिकाऱ्यांनी सोडले होते. सर्वच भारतीय सिनेमा धंद्यास या कराने जबर तडाखा बसणार आहे पण कसाबसा तगून राहिलेला मराठी चित्रपट व्यवसाय या केंद्रीय कराने संपूर्ण निकालातच निघण्याचा धोका निर्माण झाला आहे.
हॉटेलकर रद्द करण्याची मागणी
पुणे – पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनने हॉटेलकर रद्द करावा अशी मागणी पुणे हॉटेल संघाने केली आहे. संघाच्या सर्वसाधारण सभेत मंजूर झालेल्या ठरावात म्हटले आहे की, केवळ हॉटेल व्यवसायावर हा कर बसविणे अन्यायाचे आहे.
व्यवसाय कर द्यायचाच असेल तर तो सर्व व्यवसायाकडूंन घेण्यात यावा. हॉटेल, खाणावळी यांना व मिठाईवाले यांना जरूरीपुरता साखर पुरवठा नियमितपणे करण्यात यावा अशी संघाने आणखी एक मागणी केली असून, त्यासंबंधीच्या ठरवात काही सूचनाही केल्या आहेत.





