46 वर्षांपूर्वी प्रभात : घटनादुरुस्तीसाठी जनतेने कौल दिला आहे

घटनादुरुस्तीसाठी जनतेने कौल दिला आहे
नवी दिल्ली, दि. 25 – घटनादुरुस्तीचे समर्थन करत स्वर्णसिंग म्हणाले, घटनेच्या चौकटीत बदल करण्याचा कौल कॉंग्रेसच्या बाजूने जनतेने दिला आहे. केवळ संसदच घटनादुरुस्ती करू शकते. घटनादुरुस्तीचे दोन विभाग आहेत. एक राजकीय व दुसरा सामाजिक-आर्थिक.
घटनेत “समाजवादी’ असा शब्द घातला आहे, त्याबाबत स्वर्णसिंग म्हणाले, समाजवाद ही जीवनपद्धती आहे व राष्ट्राने ती स्वीकारली आहे. विकासाची फळे यापुढे काही मूठभरांच्या हाती जाणार नाहीत, तर समाजातल्या मोठ्या गटास
ती मिळतील.
पौंड, डॉलर, येन व मार्क यांची खरेदी तात्पुरती बंद
मुंबई – पौंड स्टर्लिंग, अमेरिकन डॉलर, जर्मन मार्क व जपानी येन या चलनांची खरेदी तात्पुरती रद्द केल्याचे रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने जाहीर केले आहे. परदेशातील चलन बाजारात असलेल्या अस्थिर परिस्थितीमुळे ही घोषणा करण्यात आली आहे. बॅंकेचे या परिस्थितीवर सतत लक्ष असून शक्य होईल तितक्या लवकर ही खरेदी बॅंक सुरू करण्यात येईल.
गंगा पाणी प्रश्न परस्पर चर्चेने सुटेल
नवी दिल्ली – भारताच्या सूचनेस बांगला देश योग्य प्रतिसाद देईल आणि गंगा पाणीप्रश्न परस्पर चर्चेने सोडविण्याचा प्रयत्न करेल, अशी आशा अमर सेन यांनी व्यक्त केली.





