कलंदर : एक्‍झिट पोल…

-उत्तम पिंगळे

(रविवारचे एक्‍झिट पोल पाहून काल सकाळी सरांकडे गेलो)

मी : सर नमस्कार, काय पेपरमधील एक्‍झिट पोल पाहताहेत वाटतं.
विसरभोळे : होय, तेच पाहतोय बऱ्याचशा एजन्सीचे साधारण जवळपास दिसत आहेत.

मी : एक्‍झिट पोलचा निर्णय अंतिम म्हणायचा का?
विसरभोळे : तसं निश्‍चित सांगता येत नाही; पण मी तुम्हास आधी विचारतो की एक्‍झिट पोल म्हणजे काय? असे तुम्हाला विचारल्यास आपण काय सांगाल?

मी : नाही, हे म्हणणे मतदान करून व्यक्‍ती बाहेर आल्यावर तिला विचारले जाते की आपण कुणास मत दिले व त्या आधारावर आकडेवारी केली जाते.
विसरभोळे : साफ चूक, म्हणूनच मी तुम्हाला विचारले आहे.

मी : म्हणजे तसे एक्‍झिट पोल घेतले जात नाहीत?
विसरभोळे : तुम्ही म्हणता आहात त्यात थोडे तथ्य आहे; पण अशा वेळी ती व्यक्‍ती खरे बोलेलच असे नाही. म्हणूनच ते पोल विश्‍वासार्ह धरले जात नाहीत.

मी : मग हे ठोकताळे बांधतात तरी कसे?
विसरभोळे : आपण पाहतोच की वेगवेगळी चॅनेल्स व वेगवेगळ्या एजन्सीज्‌ आपापले एक्‍झिट पोल प्रसिद्ध करीत असतात. लोकप्रतिनिधी कायद्याच्या 126 अ नुसार मतदानाच्या शेवटच्या टप्प्याचे मतदान संपल्यानंतर अर्ध्या तासाने असे निष्कर्ष घोषित केले जाऊ शकतात. निवडणूक सुरू झाल्यावर अशी आकडेवारी घोषित केली जाऊ शकत नाही. याचे कारण निवडणूक निःपक्षपाती व्हाव्यात हेच आहे.

मी : मग ही प्रक्रिया होते तरी कशी?
विसरभोळे : एक्‍झिट पोल हे एखाद्या स्नॅपशॉट प्रमाणे असतात. देशभरातील अगदी तळागाळाच्या क्षेत्रांपासून सर्वेक्षण केले जाते आणि त्यास चांगलाच अवधी लागतो. यातून कोणकोणत्या पक्षांस किती मते मिळू शकतात याचा अंदाज बांधला जातो. यासाठी लागणारे जे सॅम्पल गोळा केले जाते ते युनिट ऑफ ऍनालिसिसवर अवलंबून असते. खरं तर छोटे सॅम्पल आदर्श मानले जाते. त्यामध्ये सर्वात छोट्या समूहावर लक्ष केंद्रित केले जाते. उदाहरणार्थ, एखाद्या राज्यांमध्ये 4 ते 5 पक्ष सक्रिय असतील व 10 ते 15 प्रकारच्या धर्म, जाती, प्रादेशिक वा व्यवसायानुरूप विविध गट असतील आणि त्यातील सर्वात छोटा गट सुमारे दोनशे लोकांचा असेल तर त्यावर प्रथम लक्ष केंद्रित केले जाते. एखाद्या मोठ्या राज्याकरिता 8 ते 10 हजारांचा सॅम्पल आदर्श मानला जातो. तसा मतदारसंघागणिक विचार केल्यास 500 ते 800 हा आदर्श असतो. मग हा डेटा, जनगणना व निवडणूक परिसीमन आयोगाने दिलेल्या मतदार संघाच्या आकडेवारीबरोबर पडताळून पाहिला जातो.

आयोगाकडून मतदारसंघातील स्त्री व पुरुषाचे प्रमाण समजून घेतले जाते. मग अशा विविध प्रकारे विविध स्तरातून घेतलेला डेटा क्‍लीन केला जातो. असे करत असताना मागील कित्येक वर्षांची आकडेवारीही विचारात घेतली जाते. मग अशा वेगवेगळ्या कसोट्या पार केलेला डेटा कॉम्प्युटरला फीड केला जातो. अशा एक्‍झिट पोल करता लागणारा काळ हा तो पोल व सर्वेक्षण कशाकरिता केला जातोय तसेच किती जणांची टीम त्यात काम करते यावर अवलंबून असतो.

भारतभर असे सर्वेक्षण करण्याकरिता साधारणतः महिनाभराचा कालावधी लागतो. सर्वेक्षणातील डेटा चांगल्याप्रकारे घेतला गेला असल्यास सर्व अंदाज हे रिझल्ट्‌सच्या जवळपास असतात. अर्थात, प्रत्यक्ष निवडणूक काळात एखाद्या गटाबद्दल वा प्रभागात विशेष काही घडले तर त्या वेळी त्या ठिकाणचे मतदार पूर्वीच्या सर्व्हेप्रमाणेच मतदान करतील असे नाही. अशा वेळी सर्वेक्षणातील निष्कर्ष व प्रत्यक्ष निकाल यात फरक पडू शकतो. तसे अपवाद हे असतातच व ते सर्वच ठिकाणी गृहीत धरले गेले पाहिजेत. म्हणून सांगतो की एक्‍झिट पोल हा देशातील साधारण समाजातील त्या वेळचा मतप्रवाह काय आहे याचा केवळ अंदाज बांधत असतो.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.