अग्रलेख : तामिळनाडूत नवे शक्तिस्थळ

अलीकडेच तामिळनाडूत चेंगराचेंगरीची एक घटना घडली, त्यात सुमारे 60 जण मरण पावल्याची बातमी बहुतेक जणांनी वाचली असेल. इतकी चेंगराचेंगरी होण्याइतकी गर्दी एका राजकीय यात्रे दरम्यान घडली आहे. अलीकडच्या काळात राजकीय सभांना किंवा यात्रांना गर्दी जमवावी लागते. तामिळनाडूत एवढी प्रचंड गर्दी जमवण्याची क्षमता नव्यानेच राजकारणात प्रवेश करणार्या एका अभिनेत्याने सिद्ध केली आहे. त्या अभिनेत्याचे नाव विजय. त्यांना तेथे थलपती विजय या नावानेही ओळखले जाते. त्यांचे मूळ नाव जोसेफ विजय चंद्रशेखर असे आहे.
रजनीकांत यांच्या लोकप्रियतेचे विक्रम या अभिनेत्याने तेथे मोडीत काढले आहेत. त्यांनी गेल्याच वर्षी टीव्हीके नावाचा राजकीय पक्ष स्थापन केला. तामिळ वेटरी कळघम असे या पक्षाचे नाव आहे. त्यांचा पक्ष स्थापन होऊन जेमतेम एक वर्षसुद्धा अजून झालेले नाही, पण हा पक्ष तेथे अचानकच फुल फॉर्मात आला आहे. तामिळनाडूत हे एक नवीन शक्तिस्थळ उदयाला आले आहे. त्याचा धसका एव्हाना तेथील सर्व प्रस्थापित राजकीय पक्षांनी घेतला आहे. अभिनेते विजय यांनी सन 2026 मध्ये होणार्या तामिळनाडूच्या विधानसभेच्या निवडणुका प्रथमच स्वबळावर लढवायचा निर्णय घेतला असून त्याची पायाभरणी करण्यासाठी विजय सध्या राज्यव्यापी दौर्यावर आहेत.
त्यांच्या सभांना ठिकठिकाणी अफाट गर्दी होते आहे. लोक कामधंदे सोडून त्यांच्या यात्रेची वाट पाहत बसतात. अक्षरशः लाखोच्या संख्येने लोक त्यांच्या सभांना जमतात. अशाच एका सभेत परवा इतकी प्रचंड गर्दी झाली की तेथे झालेल्या चेंगराचेंगरीत सुमारे 60 लोक मरण पावले आणि शंभरावर लोक जखमी झाले. या घटनेची चौकशी, कारवाई, एफआयआर वगैरे सगळे रीतसर प्रकार सध्या सुरू आहेत, पण या चेंगराचेंगरीच्या घटनेने संपूर्ण देशाचे लक्ष वेधले गेले. अभिनेते विजय तामिळनाडूत इतके लोकप्रिय आहेत हे आतापर्यंत तामिळनाडू बाहेरील लोकांना फारसे माहिती नव्हते. पण परवाच्या या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर संपूर्ण देशात त्यांच्या विषयी चर्चा सुरू झाली.
तामिळनाडूतील परंपरागत राजकीय पक्ष येथील जनतेच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यास अपयशी ठरल्याने आपण हा नवीन राजकीय पक्ष काढला असून आपला पक्ष धर्मनिरपेक्ष तत्त्वाने वाटचाल करेल आणि भ्रष्टाचाराला कायमची मूठमाती देईल असा निर्धार विजय हे ठिकठिकाणी व्यक्त करताना दिसतात. तामिळनाडू हे वेगळ्याच खाक्याचे राज्य आहे. येथे सिनेमासृष्टीत वर्चस्व गाजवणार्यांच्या हाती येथील लोकांनी कायम सत्ता दिली आहे. एमजी रामचंद्र यांच्यापासून हा सिलसिला सुरू आहे, त्यानंतर जयललिता, करुणानिधी, मधल्या काळात ज्यांचा खूप बोलबाला झाला ते अभिनेते रजनीकांत आणि आता थलपती विजय यांच्या भोवती तेथील राजकारण केंद्रित होऊ पाहत आहे.
तामिळनाडूतील विद्यमान राजवट ही मुख्यमंत्री स्टॅलिन यांची आहे पण त्यांनाही चित्रपटसृष्टीची थोडीफार पार्श्वभूमी आहेच. तामिळनाडूत आतापर्यंत द्रमुक आणि अद्रमुक या दोन राजकीय पक्षांमध्ये आलटून पालटून सत्ता बदल होत राहिला. जयललिता यांच्या निधनानंतर अद्रमुकची दोन शकले झाली, त्यामुळे या राजकीय पक्षाचे आव्हान संपुष्टात आल्यातच जमा आहे. त्यामुळे त्या राज्यात जी राजकीय स्पेस निर्माण झाली आहे ती स्पेस भरून काढण्यासाठी विजय तेथे पुढे सरसावले आहेत. तामिळनाडूत शक्यतो लागोपाठ कोणालाही सत्ता मिळत नाही असा अलीकडच्या काळाचा प्रकार आहे. त्यामुळे उद्या जर तेथील द्रमुकची सत्ता फिरवायची असेल तर जनतेला सक्षम पर्याय हवा, हा पर्याय आपण देऊ शकतो असा अभिनेते विजय आणि त्यांच्या समर्थकांचा दावा आहे.
मधल्या काही काळात तामिळनाडूमध्ये रजनीकांत यांनी एक राजकीय पक्ष स्थापन केला होता. राज्यातील जनता त्यांना मुख्यमंत्री म्हणून पाहायला उत्सुक होती, पण राजकारण हे आपल्याला फार झेपणार नाही आणि वाढत्या वयानुसार तब्येतीलासुद्धा ते परवडणार नाही याची खात्री पटल्यानंतर रजनीकांत यांनी सगळ्यांना आश्चर्याचा धक्का देत अगदी ऐनवेळी राजकारणातून माघार घेतली. त्यामुळे द्रमुकला प्रबळ प्रतिस्पर्धीच उरला नव्हता. तामिळनाडूच्या राजकारणातील ही सगळी पार्श्वभूमी आपल्याला अनुकूल होईल अशी गणिते मनाशी बांधून थलपती विजय यांनी टीव्हीके नावाचा राजकीय पक्ष गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात स्थापन केला. आश्चर्य असे की त्यांनी मनात जी गणिते योजली होती ती गणिते प्रत्यक्ष मैदानावर यशस्वी होताना दिसत आहेत. लोक त्यांच्या राजकीय पक्षाला समर्थन देण्यासाठी उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरत आहेत.
विजय यांनी आपल्या पक्षाची विचारसरणी धर्मनिरपेक्ष स्वरूपाची राहील असे स्पष्ट केल्यानंतर भारतीय जनता पक्षाशी त्यांची तेथे युती होण्याची शक्यता आधीच मावळली आहे. भारतीय जनता पक्षाला अजूनही तेथे विश्वासाचा साथीदार मिळालेला नाही. त्यातच आता स्टॅलिन यांच्या राजवटीला विजय यांच्या टीव्हीके पक्षाचे नवे आव्हान उभे राहिल्यामुळे भारतीय जनता पक्षाला तामिळनाडूत शिरकाव करण्याचे मार्ग त्या अर्थाने बंदच झालेले दिसतात. विजय यांच्या रूपाने निर्माण झालेले हे शक्तिस्थळ राजकारणात किती दूरवर मजल मारणार आहे यावर पुढची सगळी गणिते अवलंबून आहेत.
त्यांना तामिळनाडूत एकहाती वर्चस्व मिळाले तर त्या आधारे विजय यांना राष्ट्रीय राजकारणावरही प्रभाव टाकता येऊ शकतो, पण तो खूप लांबचा पल्ला आहे. अफाट लोकप्रियता असूनही रजनीकांत यांच्या राजकीय पक्षाची जी अवस्था झाली तशी अवस्था आपल्या राजकीय पक्षाची होऊ नये यासाठी विजय यांना मोठी मोर्चेबांधणी करावी लागेल. केवळ रस्त्यावर जमणारी लाखोंची गर्दी राजकारणात पुरेशी नसते याची खूणगाठही त्यांना मनाशी बांधावी लागेल.





