अग्रलेख : इन्फ्लुएन्सरची हेरगिरी

गेल्या काही वर्षांमध्ये इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढल्यानंतर सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्ममध्येही वाढ झाली. या प्लॅटफॉर्मचा वापर करून आपला कंटेंट समाजातील विविध थरांपर्यंत पोचवून आणि प्रतिसाद मिळवून चांगले उत्पन्न मिळवणारे काही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरही तयार झाले आणि लोकप्रियही झाले. अशा प्रकारे आपल्या एखाद्या कृतीला प्रतिसाद मिळवून त्या माध्यमातून पैसे मिळवणे ही जरी सर्वसामान्य गोष्ट असली, तरी या सोशल मीडियाचा वापर करून जेव्हा शत्रुराष्ट्रासाठी हेरगिरी केली जाते तेव्हा सोशल मीडियाची ही दुसरी बाजू भीषणपणे समोर येते. गेल्या काही दिवसांमध्ये भारतात विविध ठिकाणी पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याप्रकरणी 11 जणांना अटक केली आहे. ते सर्वजण सोशल मीडियाशी संबंधित असून इन्फ्लुएन्सर्स म्हणून लोकप्रिय आहेत.
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर विविध पातळीवर तपास सुरू असतानाच लोकप्रिय युट्यूबर ज्योती मल्होत्राला पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआयसाठी हेरगिरीप्रकरणी अटक केली आहे. आणखी काही जणांना याच संदर्भात अटक केली आहे. ज्योती मल्होत्रा आणि इतर सर्व युट्यूबर किंवा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर यांचा विचार करता त्यांनी पैसे मिळवण्यासाठी या सर्व गोष्टी केल्या हे उघड आहे. पण यानिमित्ताने पाकिस्तानच्या आयएसआय या गुप्तहेर संघटनेची एक वेगळी योजना समोर आली आहे हे सर्वात जास्त महत्त्वाचे आहे. पाकिस्तानच्या आयएसआयच्या माध्यमातून देशात हेरगिरी केली जाते हे काही नवीन नाही.
देशाच्या कानाकोपर्यामध्ये महत्त्वाच्या शहरांमध्ये स्लीपर सेल डेव्हलप करून त्यांच्या माध्यमातून माहिती मिळवण्याचे आणि दहशतवादी हल्ल्याच्या वेळी सहाय्य घेण्याचे कामही केले जाते, असे अनेक वेळा सिद्ध झाले आहे. कोणत्याही देशाची गुप्तहेर संघटना इतर देशांमध्ये आपल्या संघटनेच्या माध्यमातून गुप्त माहिती मिळवण्याचे काम करतच असते. देशात आयएसआय संघटनेचे अधिकृत एजंटही असे अधूनमधून पकडले जात असतात. पण ते शिक्षित एजंट असतात. ज्या प्रकारे सोशल मीडियाचा वापर करणार्या आणि लोकप्रिय झालेल्या काही महत्त्वाच्या इन्फ्लुएन्सर्सचा हेरगिरीसाठी वापर करण्याची रणनीती आयएसआयने आखली आहे, त्याचा विचार आता गांभीर्याने करावा लागणार आहे.
अनेक वेळा हे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स आपल्या लोकप्रियतेच्या किंवा त्यांना मिळणार्या लाइक्स आणि कॉमेंटच्या भरामध्ये वाहून जातात आणि आपण कशा प्रकारचा कार्यक्रम पेश करत आहोत याचे त्यांना भानही राहात नाही. आपण शत्रू राष्ट्राच्या ट्रॅपमध्ये अडकत आहोत त्याची कल्पनाही त्यांना येत नाही. ज्या प्रकारे हनी ट्रॅपचा वापर करून सरकारी अधिकारी किंवा दूतावासातील कर्मचारी यांना अडकवले जाते आणि त्यांच्याकडून महत्त्वाची माहिती मिळवली जाते, त्याच प्रकारे आता या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सचा वापरही आयएसआयकडून केला जात आहे. भारतासारख्या लोकशाही देशामध्ये सोशल मीडिया वापरकर्ते जेव्हा सरकार विरोधी किंवा देश विरोधी भूमिका घेतात तेव्हा त्याला काही प्रमाणात लाइक्स आणि कॉमेंट्सही मिळतात.
अशाप्रकारे भारत विरोधी किंवा सरकारच्या धोरणाविरोधी भूमिका घेणार्या सोशल मीडियाच्या शोधातच पाकिस्तानची आयएसआय गुप्तहेर संघटना आहे असे दिसते. ज्योती मल्होत्राला अटक केल्यानंतर जो तपास झाला त्यामध्ये जी माहिती समोर आली आहे त्यामध्ये अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने ज्योतीला पाकिस्तानची हेर म्हणून तयार करण्यात आले हे दिसत आहे. ज्योती मल्होत्राने गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक वेळा पाकिस्तानचा प्रवास केला आणि पर्यटक म्हणून तेथील काही चित्रण आपल्या युट्यूब चॅनेलवर प्रदर्शित केले. या एका कारणामुळे ज्योतीवर कारवाई करण्यात आलेली नाही.
तर अत्यंत जाणीवपूर्वक ती पाकिस्तानच्या गुप्तहेर संघटनेसाठी काम करत होती असेही लक्षात आले आहे. महत्त्वाची गोष्ट अशी आहे की देशातील जो अधिकृत मीडिया आहे म्हणजे वृत्तपत्रे किंवा वृत्तवाहिन्या त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांच्या स्वतःच्या यंत्रणा आहेत आणि सरकारी यंत्रणाही आहेत. पण या सोशल मीडियावर कंटेंट क्रिएट करणार्या लोकांवर कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नाही. गेल्या काही कालावधीमध्ये वादग्रस्त वक्तव्य किंवा वादग्रस्त कार्यक्रम सादर करून अडचणीत आलेल्या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सचा विचार केला, तर आपण काय सादर करत आहोत त्याचे भान राहात नसल्याने हे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स अडचणीत येऊ लागले आहेत.
देशांतर्गत धोरणाला विरोध केला किंवा आक्षेपार्ह वर्तन केले किंवा विधाने केली म्हणून एखादा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरने अडचणीत येणे वेगळे आणि पाकिस्तानसारख्या शत्रू राष्ट्रासाठी हेर म्हणून काम केले म्हणून अडचणीत येणे वेगळे. ज्योती मल्होत्राच्या प्रकरणामुळे सोशल मीडियाची ही एक वेगळी बाजू समोर आली आहे आणि सरकारला त्याची गांभीर्याने दखल घ्यावी लागणार आहे. येत्या काही कालावधीमध्ये आणखी काही लोकांना अटक होण्याचीही शक्यता आहे.
अर्थात, शत्रू राष्ट्राला काही महत्त्वाची माहिती देणे ही जेवढी गंभीर गोष्ट आहे तेवढीच गंभीर गोष्ट देशविरोधी वातावरण तयार करणे हीसुद्धा आहे. अनेक वेळा या सोशल मीडियाचा वापर करून पाकिस्तानी गुप्तहेर संघटना भारत विरोधी वातावरण तयार करण्याला चालना देऊ शकतात हा धोकाही या निमित्ताने लक्षात घ्यायला हवा. साहजिकच अशा प्रकारे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सना केवळ अटक करून या विषयाला पूर्णविराम मिळणार नाही तर देश विरोधी वातावरण तयार करण्यासाठी जाणीवपूर्वक पाकिस्तानमधून काही मदत मिळते आहे का हे पाहणेसुद्धा महत्त्वाचे ठरणार आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचा हा इन्फ्लुएन्स देशासाठी घातक ठरणार नाही हे आता पहावेच लागणार आहे.





