विविधा: जादूगार रघुवीर

-माधव विद्वांस

‘जादू ही कला आहे’, अशी तिची ओळख करून देणारे जादूगार रघुवीर भोपळे यांचे आज पुण्यस्मरण. 20 ऑगस्ट 1984 रोजी त्यांचे निधन झाले. त्यांचे पूर्ण नाव रघुवीर भिकाजी भोपळे, पण ते जादूगार रघुवीर म्हणूनच ओळखले जायचे.

त्यांचा शकुंतला पटवर्धन यांच्याशी प्रेमविवाह झाला होता. शकुंतलाताई पण त्यांच्याबरोबरीने जादूचे प्रयोग करायच्या. त्या “बोलक्‍या बाहुल्या’ हा कार्यक्रम सादर करीत असत. विजय व संजय ही त्यांची दोन मुलेही त्यांच्याबरोबरीने प्रयोग करीत असत. उंची 6 फूट 2 इंच व निळे डोळे, त्यामुळे त्यांचे व्यक्‍तिमत्त्व आकर्षक व भारदस्त दिसायचे. ते आंतरराष्ट्रीय कीर्तीचे मराठी जादूगार होते. आमच्या लहानपणी त्यांच्या नावाचीच आमच्यावर जादू असायची. डोळे बांधून रस्त्यावर मोटरसायकल चालविताना मी त्यांना बघितले आहे.

त्यांचा जन्म सामान्य शेतकरी कुटुंबात 24 मे 1924 रोजी मुळशी धरणाजवळच्या कडव या गावी झाला.त्यानंतर त्यांचे आईवडील चाकणजवळील आंबेठाण येथे स्थायिक झाले. त्यांच्या घरची परिस्थिती बेताची असल्याने ते पुण्याचे अनाथ विद्यार्थिगृह (सध्याचे पुणे विद्यार्थी गृह) येथे शिकण्यासाठी आले. अनाथ विद्यार्थिगृहात राहून मॅट्रीकची परीक्षा उत्तीर्ण केली. एकदा रस्त्यावर जादूचे खेळ करणाऱ्या “राणा’ या राजस्थानी जादूगाराचे खेळ त्यांनी पाहिले. त्यांच्याकडून जादूची ही कला त्यांनी शिकून घेतली. सुमारे 80 वर्षांपूर्वी त्यांनी पहिला व्यावसायिक प्रयोग केला. त्यांची कला पाहून गानहिरा हिराबाई बडोदेकर यांनी जादूगार रघुवीर यांना आफ्रिकेत दौऱ्यावर नेले आणि मग त्यांनी मागे वळून पाहिले नाही.

ते धनुर्विद्येमध्ये प्रवीण होते. एकदा त्यांनी माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांचे बाणाचे साहाय्याने फुलहार घालून स्वागत केले होते. पु. ल. देशपांडे, राजा गोसावी, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्याशी त्यांचे स्नेहपूर्ण संबंध होते. श्‍वास रोखून धरणे, योगासने तसेच शक्‍तीचे प्रयोग ते करत होते. मुख्य म्हणजे ते अंधश्रद्धा निर्मूलनाचेही काम करीत असत. त्यासाठी त्यांनी व्याख्यानेही दिली तसेच नारळ फोडणे, कुंकू काढणे या गोष्टी कशा केल्या जातात याचे प्रयोगही करून दाखविले. जादू ही कला आहे, हे सांगणारे ते एकमेव सत्यवादी जादूगार होते. त्यांनी इंग्लंड, जपान, रशिया इ. देशांत आपले प्रयोग सादर केले. त्यांना अनेक पारितोषिके मिळाली आहेत. त्यांनी 7 हजार 23 प्रयोग केले.

जादूची शाळा नावाची एक संस्था त्यांनी पुण्यात काढली. तेथे अनेक विद्यार्थी जादू शिकण्यासाठी येत असत. अनेक परदेशी विद्यार्थीही जादू शिकण्यासाठी येत असत. डोळे बांधून रस्त्यावर मोटरसायकल चालविणे, स्वप्नसृष्टी, नोटांचा पाऊस, हातातून वीजनिर्मिती, भुतांचा नाच इ. खेळांचे ते प्रयोग करीत असत. अनेक शाळा महाविद्यालयांमधे जादूविद्येवर व्याख्याने देऊन त्यांनी तिचा प्रचार केला.

सध्या रिमोट कंट्रोलचा जमाना आहे, पण त्यांच्या जपानी शैलीतील बंगल्यात टाळी वाजविल्यावर पाणी येणे, लाइट लागणे अशा सुविधा 50 वर्षांपूर्वीपासून होत्या. त्यांनी अनेक चॅरिटी शो करून शाळा, संस्थांना मदत केली. खेडेगावापासून ते मोठ्या शहरातही त्यांनी प्रयोग केले.अडीअडचणीत दुसऱ्याला मदत करणे हा त्यांचा स्वभाव होता. पुढच्या पिढीनेही त्यांचा हा वारसा चालूच ठेवला आहे. त्यांचे नातू जादूगार जितेंद्र यांनी नुकतेच सांगलीतील खिद्रापूरजवळील पूरग्रस्त गावात जाऊन जीवनावश्‍यक वस्तू पोचवल्या.

जादूगार रघुवीर यांनी “मी पाहिलेला रशिया’ व “प्रवासी जादूगर’ हे दोन पुस्तके लिहून त्यांचे लेखन कौशल्यही दाखवून दिले. त्यांचे “प्रवासी जादूगार’ला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कारही मिळाला. “प्रवासी जादूगार’ या पुस्तकातून त्यांनी त्यांना आलेले अनुभव रोचक पद्धतीने लिहिले आहेत. कोठे थांबायचे याचे भान असलेल्या या जादूगाराने 1977 मध्ये व्यवसायातून निवृत्ती घेतली. त्यानंतर सातच वर्षांनी त्यांनी इहलोकीचा निरोप घेतला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.