Suresh Raina and Shikhar Dhawan in 1xBet Money Laundering Case : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) माजी भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैना आणि शिखर धवन यांची एकूण 11.14 कोटी रुपयांची मालमत्ता तात्पुरती जप्त केली आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायदा (PMLA), 2002 अंतर्गत ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. जप्त केलेल्या मालमत्तांमध्ये सुरेश रैनाच्या नावावरील 6.64 कोटींचे म्युच्युअल फंड गुंतवणूक आणि शिखर धवनच्या नावावरील 4.5 कोटींची एक स्थावर मालमत्ता (अचल मालमत्ता) यांचा समावेश आहे. नेमकं प्रकरण काय? ईडीची ही कारवाई अनेक राज्यांच्या पोलिसांकडून दाखल करण्यात आलेल्या प्रथम माहिती अहवालांवर (FIR) आधारित आहे, जे वन एक्स बेट (1xBet) नावाच्या बेकायदेशीर ऑनलाइन सट्टेबाजी प्लॅटफॉर्मशी संबंधित आहेत. तपासानुसार, वन एक्स बेट आणि त्याचे ‘सुरोगेट ब्रँड्स’ (1xBat, 1xBat Sporting Lines) भारतात कोणत्याही अधिकृत परवानगीशिवाय ऑनलाइन सट्टेबाजी आणि जुगाराचा प्रचार करत होते. विदेशी कंपन्यांशी हातमिळवणी आणि गैरकृत्ये – ईडीच्या माहितीनुसार, रैना आणि धवन यांनी परदेशी कंपन्यांसोबत संगनमत करून या प्लॅटफॉर्म्सचा प्रचार केला. या बदल्यात त्यांना परदेशी मार्गांनी (विदेशी चॅनेल्सद्वारे) पैसे दिले गेले. हे पैसे बेकायदेशीर सट्टेबाजीतून कमावले गेले होते, ज्यांचे मूळ स्रोत लपवण्यासाठी अत्यंत जटिल व्यवहार करण्यात आले होते. हेही वाचा – IND vs AUS : गिल-वॉशिंग्टनच्या जोरावर भारताचा ‘सुंदर’ विजय, ऑस्ट्रेलिया धुव्वा उडवत मालिकेत २-१ ने घेतली आघाडी तपासात उघड झालेली तथ्ये – बनावट बँक खाती: 1xBet भारतात हजारो बनावट बँक खात्यांचा (फर्जी ‘म्युल’ बँक खाती) वापर करून पैशांचे व्यवहार करत होते. 6000 हून अधिक खाती: आतापर्यंतच्या तपासात 6000 हून अधिक बनावट खाती समोर आली आहेत. पेमेंट गेटवेचा वापर: या खात्यांमधून सट्टेबाजीची रक्कम वेगवेगळ्या पेमेंट गेटवेमधून फिरवून, पैशांचे खरे स्रोत लपवण्यात आले. केवायसी नसलेले व्यवहार: अनेक पेमेंट गेटवे कोणतीही केवायसी (KYC) पडताळणी न करताच व्यापारी (मर्चंट) जोडत असल्याचेही आढळले. मनी लॉन्ड्रिंगचा मोठा मागोवा: मनी लॉन्ड्रिंगचा एकूण व्यवहार 1000 कोटी रुपयांहून अधिक असल्याचे ईडीच्या तपासात समोर आले आहे. ईडीची पुढील कारवाई आणि आवाहन – ईडीने या प्रकरणात चार पेमेंट गेटवेवर छापे टाकले असून 60 हून अधिक बँक खाती फ्रीज ली आहेत. आतापर्यंत 4 कोटी रुपयांहून अधिक रक्कम गोठवण्यात आली आहे. ईडीने सामान्य नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या ऑनलाइन सट्टेबाजी, जुगाराच्या जाहिराती किंवा गुंतवणुकीपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. हेही वाचा – IND vs AUS : ‘हा कोणता न्याय?’, संजू सॅमसनला डावलल्यानं माजी खेळाडू संतापला; म्हणाला, ‘हे माझ्या आकलनशक्तीच्या बाहेर…’ बेकायदेशीर सट्टेबाजी केवळ आर्थिक नुकसानच करत नाही, तर मनी लॉन्ड्रिंग आणि इतर गैरकृत्यांनाही प्रोत्साहन देते, असे ईडीने स्पष्ट केले आहे. कोणत्याही संशयास्पद ऑनलाइन जाहिराती किंवा व्यवहारांची माहिती तात्काळ स्थानिक पोलीस किंवा ईडीला देण्याची विनंतीही करण्यात आली आहे.