Earthquake News : जम्मू-काश्मीरसह लडाखमध्ये भूकंपाचे धक्के !

श्रीनगर – जम्मू-काश्मीरसह लडाखमध्ये 24 तासांत पाच वेळा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. या भूकंपाची तीव्रता 4.5 रिश्टर स्केलवर इतकी होती. जम्मू-काश्मीरमध्ये शनिवारी, 17 जून रोजी दुपारी 2:30 वाजता पहिला भूकंप झाला. या भूकंपाची तीव्रता 3.0 रिश्टर स्केल होती. लेहमध्ये भूकंपाचा दुसरा हादरा जाणवला.
हा भूकंप शनिवारी रात्री 9.44 वाजता झाला असून त्याची तीव्रता 4.5 रिश्टर स्केल होती. तिसरा भूकंपाचा धक्का जम्मू-काश्मीरमधील डोडा येथे भारत-चीन सीमेजवळ रात्री 9.55 वाजता झाला, या भूकंपाची तीव्रता 4.4 रिश्टर स्केल इतकी होती.
नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी म्हणजे राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्री 2.13 वाजता ईशान्य लेहमध्ये चौथा भूकंपाचा हादरा बसला. या भूकंपाची तीव्रता 4.1 रिश्टर स्केल होती.
मात्र, भूकंपामध्ये कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही. यानंतर रविवारी पहाटे 3.50 वाजता जम्मू-काश्मीरमधील कटरा येथे पाचवा भूकंपाचा धक्का बसला, याची तीव्रता 4.1 रिश्टर स्केल इतकी होती.





