Koynanagar News : कोयना धरण परिसरात भूकंपमापन यंत्रणा पुन्हा होणार कार्यान्वित; दै. प्रभातच्या वृत्ताची घेतल दखल
Koynanagar News : कोयना धरण परिसरातील गेल्या पाच महिन्यांपासून बंद पडलेली भूकंपमापन यंत्रणा अखेर पुन्हा कार्यान्वित होणार आहे.

Koynanagar News : कोयना धरण परिसरातील गेल्या पाच महिन्यांपासून बंद असलेली भूकंपमापन यंत्रणा आता पुन्हा कार्यान्वित होणार आहे. ऑक्टोबरअखेर नवी डिजिटल यंत्रणा बसविण्यात येणार असून त्यामध्ये एक सिस्मोग्राफ आणि चार स्ट्राँग मोशन ॲक्सेलरोग्राफ बसविण्यात येणार आहेत. (Koynanagar News)
नाशिकच्या ‘मेरी’चे अधीक्षक अभियंता नितीन दुसाने यांनी ही माहिती दिली. भूकंपमापन यंत्रणा बंद असल्याची बातमी दै. प्रभातने प्रकाशित केली होती. त्याची दखल वेगवेगळ्या विभागांनी घेतल्यानंतर नवीन यंत्रणा कार्यान्वित होणार आहे. (Koynanagar News)
कोयना परिसरातील भूकंपीय हालचालींची नोंद घेण्यासाठी १९९३ पासून भूकंपमापन व्यवस्था कार्यरत आहे. जुन्या यंत्रणेत पाच ‘मेक ८०००’ ॲनालॉग उपकरणे होती. त्यापैकी चार यापूर्वीच बंद पडली होती. उर्वरित एकमेव कार्यरत यंत्र १ मे २०२६ रोजी बंद पडले. (Koynanagar News)
तांत्रिक बिघाड आणि आवश्यक सुटे भाग उपलब्ध नसल्याने ही यंत्रणा गेल्या पाच महिन्यांपासून बंद आहे. हा परिसर भूकंपीय हालचालींच्या दृष्टीने संवेदनशील आहे. या भागात आतापर्यंत लहान- मोठ्या १ लाख २१ हजार ७३५ भूकंपांची नोंद झाल्याची माहिती आहे. (Koynanagar News)
त्यामुळे परिसरातील भूकंपीय हालचालींची सातत्याने नोंद ठेवणे महत्त्वाचे आहे. मात्र, यंत्रणा बंद असल्याने नियमित अधिकृत मापनात खंड पडला आहे.
नव्या यंत्रणेतील उपकरणांची कामे सोप्या भाषेत सांगायची तर, सिस्मोग्राफ भूकंपाची नोंद करतो. (Koynanagar News)
भूकंप कधी झाला आणि जमिनीमध्ये किती कंपन झाले, याची माहिती त्यातून मिळते. तर भूकंपाच्या धक्क्याने धरणाच्या बांधकामात किती हालचाल किंवा कंपन झाले, हे चार ॲक्सेलरोग्राफ मोजतील. ही माहिती धरणाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाची ठरते. (Koynanagar News)
भूकंपाच्या वेळी बांधकामावरील परिणाम, कोणत्या भागात किती कंपन झाले आणि त्यानंतर पुढील तपासणीची आवश्यकता, याचा अभ्यास करण्यासाठी या नोंदी उपयुक्त ठरतात. (Koynanagar News)
केंद्राच्या धरण सुरक्षितता कायदा 2021 मध्ये निर्दिष्ट धरणे तसेच अधिसूचित भूकंपीय क्षेत्रातील धरणांसाठी भूकंपाच्या हालचालींची नोंद घेण्याची तरतूद आहे. केंद्रीय जल आयोगाच्या तांत्रिक मार्गदर्शक सूचनांमध्ये धरणाची उंची आणि भूकंपीय परिस्थितीनुसार सिस्मिक निरीक्षणाची व्यवस्था करण्यावर भर देण्यात आला आहे (Koynanagar News)
१०० मीटर किंवा त्यापेक्षा अधिक उंचीच्या धरणांसाठी सूक्ष्म भूकंपांच्या निरीक्षणासाठी सिस्मोग्राफच्या नेटवर्कचाही तांत्रिक मार्गदर्शक सूचनांमध्ये उल्लेख आहे. केंद्रीय जल आयोगाच्या नोंदीनुसार कोयना धरणाची पायाभरणीपासूनची कमाल उंची सुमारे १०३ मीटर आहे. त्यामुळे कोयना परिसरातील भूकंपमापन व्यवस्था ही केवळ भूकंपांची नोंद ठेवणारी यंत्रणा नसून, धरणाच्या सुरक्षा निरीक्षणासाठीही महत्त्वाची आहे. (Koynanagar News)
दरम्यान, नव्या डिजिटल यंत्रणेच्या स्थापनेसाठी मेरीकडून कार्यवाही सुरू आहे. अधीक्षक अभियंता नितीन दुसाने यांच्या माहितीनुसार, नवीन यंत्रणा ऑक्टोबरअखेर बसविण्याचे नियोजन आहे. स्थापना व कार्यान्वित करण्याच्या प्रक्रियेला सुमारे दोन महिने लागणार आहेत. (Koynanagar News)
नवी यंत्रणा सुरू झाल्यानंतर कोयना परिसरातील भूकंपांची नियमित नोंद पुन्हा सुरू होईल. त्याचबरोबर भूकंपाच्या धक्क्यामुळे धरणाच्या बांधकामात झालेल्या हालचालींचे मोजमापही उपलब्ध होणार आहे. त्यामुळे पाच महिन्यांपासून खंडित झालेली कोयना धरण परिसरातील भूकंपमापनाची ‘नजर’ पुन्हा कार्यान्वित होणार आहे. (Koynanagar News)





