“अगोदर मी त्यांच्यासाठी लेडी सिंघम होते, आता भाजपची एजंट झाली आहे” – स्वाती मालिवाल

नवी दिल्ली – दिल्ली महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा आणि आपच्या नेत्या स्वाती मालिवाल यांनी सोशल मीडियातील एका पोस्टवरून आपल्याच पक्षाच्या नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. पोस्टमध्ये त्यांनी कोणा नेत्याचे नाव घेतलेले नाही, तथापि, केजरीवाल सरकारमधील एका मंत्र्याचा उल्लेख केला आहे. स्वत:वर होत असलेल्या आरोपांनाही त्यांनी उत्तर दिले असून एकप्रकारे दिल्लीत लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू असताना आता मालिवाल विरूध्द आम आदमी पार्टी हे दुसरे युध्द सुरू झाले आहे.
स्वाती मालिवाल म्हणाल्या की कालपासून दिल्लीचे मंत्री असे असत्य पसरवत आहेत की माझ्यावर भ्रष्टाचार प्रकरणी एफआयआर दाखल झाल्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या इशाऱ्यावर हे सगळे करते आहे.एफआयआर ८ वर्षांपूर्वी २०१६ मध्ये झाली होती. त्यानंतर दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी आणि नायब राज्यपालांनी मला दोन वेळा महिला आयोगाचे अध्यक्ष केले.
भ्रष्टाचाराचे प्रकरण पूर्ण बोगस असून दीड वर्षांपूर्वी माननीय उच्च न्यायालयाने त्यावर स्थगिती आणली आहे. देवाणघेवाणीचा कोणताही व्यवहार झाला नसल्याचे न्यायालयानेच म्हटले आहे. विभव कुमार यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल करेपर्यंत मी त्यांच्यासाठी लेडी सिंघम होती, मात्र आता मी त्यांच्यादृष्टीने भाजपची एजंट झाली आहे.
आपल्या पोस्टमध्ये त्या पुढे म्हणतात की सगळी ट्रोल आर्मी माझ्या मागे लावण्यात आली आहे. मी सत्य सांगितले केवळ हेच त्यामागचे कारण आहे. स्वातीचा कोणता खासगी व्हिडिओ असेल तर तो पाठवा, लीक करायचा आहे असे पक्षाच्या लोकांना फोन करून सांगितले जाते आहे. माझ्या नातलगांच्या गाड्यांचे नंबर आणि त्यांचे तपशील ट्वीट करून त्यांचा जीव धोक्यात घातला जातो आहे.
आपच्या नेत्यांना सल्ला देताना त्या म्हणाल्या की असत्य फार काळ तग धरत नाही. सत्तेच्या नशेत कोणाला कमी लेखण्यासाठी तुमच्या हातून अशी एखादी कृती न होवो जेणेकरून तुमच्या कुटुंबातल्या सदस्यांकडेही तुम्ही मान वर करून पाहु शकणार नाहीत. तुमच्याकडून पसरवण्यात आलेल्या प्रत्येक खोटेपणासाठी मी तुम्हाला तुरूंगात घेऊन जाईन.





