E Peek Pahani: दुष्काळात तेरावा महिना! महिनाभर आधी पीक पाहणी झाली, पण सातबारावर नोंदच नाही; शेतकरी संभ्रमात
E Peek Pahani: रांजणगाव गणपती परिसरात बाजरीची काढणी पूर्ण झाल्याने डिजिटल छायाचित्रांचा प्रश्न; कृषी व महसूल विभागाच्या समन्वयावर प्रश्नचिन्ह.

E Peek Pahani- दुष्काळाच्या संकटामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकर्यांच्या समस्यांमध्ये आता प्रशासकीय दिरंगाईची भर पडत असल्याच्या तक्रारी आहेत. महिनाभरापूर्वी शेतात येऊन पीक पाहणी करण्यात आली; मात्र अद्याप सातबारा उतार्यावर संबंधित पिकाची नोंद झालेली नसल्याने शेतकरी संभ्रमात आहेत. दुसरीकडे, बाजरीची काढणीही पूर्ण झाल्याने आता डिजिटल छायाचित्रे कशी काढायची आणि पीक पडताळणी कशी होणार, असा प्रश्न शेतकर्यांसमोर उभा राहिला आहे.
यंदा दुष्काळी परिस्थितीचा सामना करत अनेक शेतकर्यांनी बाजरीची पेरणी केली होती. पीक तयार झाल्यानंतर त्याची काढणीही पूर्ण झाली आहे. अशा वेळी पीक पाहणीसाठी गुगल छायाचित्र किंवा अन्य डिजिटल पुरावा आवश्यक असल्यास शेतकर्यांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. काढणीपूर्वीची छायाचित्रे, उपलब्ध पीक नोंदी किंवा अन्य अधिकृत पुरावे ग्राह्य धरले जाणार का, याबाबत प्रशासनाने स्पष्ट मार्गदर्शन करावे, अशी मागणी होत आहे.
पीक पाहणी झाल्यानंतरही सातबारा उतार्यावर नोंद अद्ययावत नसेल, तर ही प्रक्रिया नेमकी कुठे रखडली आहे, असा सवाल शेतकरी उपस्थित करीत आहेत. दुष्काळी परिस्थितीत नुकसानभरपाई आणि शासकीय मदतीची अपेक्षा असताना नोंदी व पंचनाम्यांना विलंब झाल्यास शेतकर्यांच्या अडचणी वाढण्याची भीती आहे. त्यामुळे कृषी विभाग आणि महसूल प्रशासनाने संयुक्त आढावा घेऊन प्रलंबित नोंदी व पंचनामे तातडीने पूर्ण करावेत, तसेच काढणी झालेल्या पिकांच्या पडताळणीसाठी नियमानुसार पर्यायी पुराव्यांबाबत स्पष्टता द्यावी, अशी मागणी होत आहे.
कृषी आणि महसूल प्रशासनाचा समन्वय कुठे?
पीक पाहणी, सातबारा उतार्यावरील नोंद आणि पंचनामे या परस्परांशी संबंधित प्रक्रिया वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे. मात्र, पाहणी होऊनही नोंदी प्रलंबित असल्याच्या तक्रारींमुळे प्रशासकीय समन्वयाबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत. कोणत्या गावात किती पाहण्या पूर्ण झाल्या, किती नोंदी व पंचनामे प्रलंबित आहेत आणि डिजिटल पुराव्यांबाबत शेतकर्यांना कोणत्या अडचणी येत आहेत, याचा आढावा घेऊन निश्चित कालमर्यादेत कार्यवाही करावी.





