पुणे | मृत्यूपूर्वी पार पाडले “कर्तव्य’ ; बेपत्ता मुलीला केले पालकांच्या स्वाधीन

पुणे, {प्रभात वृत्तसेवा] – पोलीस हवालदार समाधान कोळी आणि संजोग शिंदे या दोघांनी अपघातापूर्वी चाळीस मिनिटे अगोदर घरातून बेपत्ता झालेल्या मुलीचा शोध घेऊन सुखरूप तिला तिच्या आई-वडिलांच्या ताब्यात दिले. मात्र, त्यानंतर दुसर्या पॉइंटची तपासणी करण्यासाठी जात असताना, कोळी यांच्यावर काळाने घाला घातला.
हवालदार कोळी आणि शिंदे रविवारी रात्री खडकी पोलीस ठाणेअंतर्गत बीट मार्शल कर्तव्यावर होते. मध्यरात्री एकच्या सुमारास दोघे वाकडेवाडी बसस्थानकात गस्त घालत होते.
त्यावेळी कोळी यांना अकरा वर्षीय अल्पवयीन मुलगी एकटी उभी असलेली दिसून आली. कोळी यांच्या नजरेने अचूक हेरले. मुलीला विश्वासात घेऊन विचारले तेव्हा तिने घरातून निघून आल्याचे सांगितले. पिंपळे सौदागर परिसरात ती राहत होती. कोळी त्या मुलीला खडकी पोलीस ठाण्यात घेऊन आले. तिथे तिची आस्थेवाईक चौकशी करत आई-वडिलांचा संपर्क क्रमांक घेतला.
त्यांनी मुलीबाबात पालकांना माहिती दिली. मुलीचे आई-वडील दोघे खडकी पोलीस ठाण्यात आले. दोघांची खात्री पटल्यानंतर मुलीला त्यांच्या ताब्यात दिले. त्यानंतर कोळी आणि शिंदे दोघे पुढील कर्तव्यावर रवाना झाले. हॅरिस पुलाजवळील अंडर पासमधून दोघे भाऊ पाटील रोडकडे निघाले होते. त्याचवेळी काही क्षणांत त्यांचा अपघात झाला.
घरातून बेपत्ता झालेली मुलगी रात्री एक वाजता दोघांनी कुटुंबीयांच्या ताब्यात सुखरूप दिली. त्यानंतर अवघ्या चाळीस मिनिटांत हा प्रकार घडला आहे. त्यांनी मरणापूर्वी आपले कर्तव्य पार पाडले.
समाधान यांच्या मृत्यूमुळे पोलीसही सुन्न
समाधान कोळी हे मनमिळावू स्वभावाचे होते. अपघाती मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. कोळी यांचे चोपडा तालुक्यातील वडोदा नावाचे गाव आहे. हा प्रकार घडल्यानंतर काहीवेळ खडकी पोलीस ठाण्यातील इतर पोलीस कर्मचारी सुन्न होते. कोळी यांच्या कुटुंबीयांचा आक्रोशही ह्रदय हेलावणारा होता. कोळी यांची पुणे शहर पोलीस दलात सतरा ते अठरा वर्षे सेवा झाली आहे.




