दसऱ्याला एकट्या मुंबईतच झालं रेकॉर्डब्रेक सोने खरेदी; इतक्या कोटींचा ओलांडला टप्पा

मुंबई – अश्विन महिन्यातील अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी या नवरात्रीच्या काळात देवीची नऊ दिवस नऊ रूपात पूजा केल्यावर, अश्विन शुद्ध दशमीला आपण “दसरा’ हा सण मोठ्या प्रमाणात साजरा करतो. साडेतीन मुहुर्तांपैकी एक असणारा हा सण मुख्यतः “विजयोत्सव’ म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या आनंदात साजरा केला जातो.
यंदा दसऱ्याला मुंबईत रेकॉर्डब्रेक अशी सोन्याची खरेदी झाली आहे. करोनानंतर पहिल्यांदाच सराफ बाजारात एवढी मोठी उलाढाल झाल्याने व्यापारी आनंदात आहेत. विशेष म्हणजे सोन्याचे दर ४९,५९० रुपये प्रति तोळा असूनही नागरिकांनी गुंतवणुकीसाठी सोने खरेदीला प्राधान्य दिले.
सराफ बाजारातील व्यापाऱ्यांनी यंदा राज्यात ४०० कोटींची सोने खरेदी व मुंबईत २०० कोटींची सोने खरेदी होईल, असा अंदाज व्यक्त केला होता. मात्र यंदाच्या दसऱ्याला एकट्या मुंबईत ४०० कोटींची सोने खरेदी झाली आहे.
मागील दीड वर्षात अनेकांना सोने खरेदी करता आले नाही. त्यामुळे सोने खरेदीवर नागरिकांनी चांगलाच ताव मारला असून, सगळी कसर काढली आहे. सोन्याची मोठी खरेदी झाल्यामुळे नागरिकांबरोबरच व्यापारीही मोठे आनंदात आहेत.





