मोदींच्या काळात बदल होऊन देशाचा मान वाढला : डॉ. किरण रिजिजू

पुणे – काँग्रेससाठी एक परिवार महत्त्वाचा आहे, पण आमच्यासाठी देश प्रथम आहे. काँग्रेस काळात गरीब देश म्हणून भारताला हिणवले जात होते. मात्र, मोदी यांच्या काळात बदल होऊन देशाचा मान जगात वाढला आहे, असे मत संसदीय कार्यमंत्री डॉ. किरण रिजिजू यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
या वेळी भाजप पश्चिम महाराष्ट्र माध्यम प्रमुख अमोल कविटकर, पुष्कर तुळजापूरकर, हेमंत लेले, निवेदिता एकबोटे, अतुल सावे, मिलिंद कांबळे उपस्थित होते. डॉ. किरण रिजिजू म्हणाले, देशाची आर्थिक राजधानी मुंबई असून, देशातील उद्योग निर्मितीचे केंद्र महाराष्ट्र आहे. लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीपर्यंत अनेक गोष्टी बदलल्या आहे. काँग्रेसला लोकसभेमध्ये जनतेची दिशाभूल करून काही मते मिळाली होती, पण आता त्यांचा पर्दाफाश झाला आहे.
त्यामुळे त्यांना आता जनतेचे समर्थन मिळणार नाही. महायुतीला राज्यात बहुमत मिळेल असेच सध्या दिसून येत आहे. गरिबांना न्याय देण्याचे काम भाजपने केले आहे. त्यामुळे काँग्रेसने अस्वस्थ होऊन काही घोषणा सुरू केल्या. मात्र, त्यावर आता मतदारांचा विश्वास नाही. गरिबी हटाओ नारा काँग्रेसने दिला, परंतु त्याची पूर्तता मोदी सरकारने केली.
मोदींच्या काळात आपल्या देशाच्या जमिनीवर कोण अतिक्रमण करू शकत नाही किंवा हिसकावून घेऊ शकत नाही, असे रिजिजू यांनी सांगितले. जगातील सर्वाधिक वक्फ बोर्ड जमिनी भारतात आहेत. त्या गरीब मुसलमान यांना मिळाल्या पाहिजे, असे आमचे मत असल्याचेही ते म्हणाले.





