पिंपरी, (प्रतिनिधी) – दुर्गा ब्रिगेड संघटनेतर्फे संस्थापक अध्यक्ष दुर्गा भोर यांनी महिला तथा बालविकास मंत्री आदिती तटकरे यांना महिलांच्या रोजगाराच्या सुरक्षेसह अनेक योजनांना येणार्या समस्यांबाबतचे निवेदन दिले. यामध्ये महिला रोजगार महिला शक्ती केंद्र महिला मिशन शक्ती योजना आणि पेन्शन योजना याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी तटकरे यांनी या मागण्यांचा सकारात्मक विचार करून त्वरित यावर अंमलबजावणी करण्यात येईल, असे आश्वासन दिले. यावेळी इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर आणि अन्य कार्यकर्ते उपस्थित होते पिंपरी चिंचवड शहरात मोठ्या संख्येने महिला वर्ग असून औद्योगिक नगरी म्हणून ओळख असणार्या शहरांमध्ये महिलांसाठी रोजगार निर्मिती कार्यक्रम घेऊन त्याद्वारे शहरातील महिलांच्या हाताला काम निर्माण करून देण्यासाठी शासनाने प्रयत्न करावेत. शहरात महिलांचे छोटे-मोठे लघुउद्योग निर्माण करण्यासाठी व स्टार्टअप उद्योग उभे करण्यासाठी शासनातर्फे विविध योजना आहेत; परंतु त्या राबविल्या जात नाहीत. त्याच्यावर कार्यवाही करून या योजना त्वरित शहरातील महिलांना मिळवून देण्यासाठी शासनाचे सहकार्य आवश्यक असल्याचे सांगितले. तसेच शासनाने पिंक रिक्षा योजना पिंपरी चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणात सुरू करण्यासाठी सहकार्य करावे. शहरातील अनेक महिलांना अद्याप पेन्शन नाही तसेच महिला महिला कामगारांसाठी निवासी हॉस्टेलची सुविधा महिला उद्योग योजना अशा प्रकारच्या अनेक योजना फक्त कागदावरच आहेत. त्याचा लाभ शहरातील महिलांना मिळवून देण्यासाठी पुढाकार घेऊन त्वरित अंमलबजावणी करावी अशी मागणी करण्यात आली.