मुंबईत डंपरने 4 जणांना चिरडले; संतप्त जमावाकडून तोडफोड, पोलिसांचा लाठीचार्ज !

मुंबई – मुंबईतील गोवंडी परिसरात एका डंपरने 4 जणांना चिरडल्याची धक्कादायक घटना शनिवारी दुपारी घडली. यामध्ये चौघांचाही मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर स्थानिक जमावाने संताप व्यक्त करत डंपरचालकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र, सुरक्षेच्या मुद्द्यावरून वाद घालत तिथेच काही स्थानिकांनी ठिय्या दिला. यावेळी त्यांनी घडलेल्या घटनेबद्दल संताप व्यक्त केला.
मुंबईतील घाटकोपर मानखुर्द लिंकरोड वर शिवाजीनगर भागात हा अपघात झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दोन्ही बाजूंनी जाणारी वाहतूक काही काळासाठी बंद केली. या अपघातानंतर काही स्थानिकांनी त्याचठिकाणी ठिय्या दिला. यामुळे दोन्ही मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले.
पोलिसांनी तत्काळ आरोपी चालकाला घेतले आणि पोलिसांनी ठिय्या देणाऱ्या लोकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, यानंतरही जमाव आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले आणि त्यांनी डंपरच्या काचांची तोडफोडदेखील केली. स्थानिक समजावूनही ऐकत नसल्याने पोलिसांना बळाचा वापर करावा लागला आणि त्यांनी सौम्य लाठीचार्ज करत गर्दी पांगविण्यात आली. यावेळी काही आंदोलकांना ताब्यात घेतल्याचेही सांगण्यात येत आहे.





