शिवाजी कर्डिलेंच्या उणिवांमुळे प्राजक्त तनपुरेंचा मार्ग सुकर
अनिल देशपांडे
राहुरी –राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघातून सहाव्यांदा जिंकून परत एकदा हॅट्ट्रिक करण्याचा आमदार शिवाजी कर्डिले यांचा प्रयत्न प्राजक्त तनपुरे यांनी पहिल्याच प्रयत्नात रोखून धरला. या मतदारसंघात राहुरी तालुक्यातील गावात मिळालेल्या मताधिक्याच्या आधारे हा गड जिंकणे प्राजक्त तनपुरे यांना सोपे झाले.
लोकसभा निवडणुकीत ज्या राजकीय घडामोडी जिल्ह्यात घडल्या त्याचा विधानसभा निवडणुकीवर परिणाम अगदी स्पष्टपणे जाणवला.लोकसभा निवडणुकीत नगर दक्षिणची जागा डॉ.सुजय विखे यांच्यासाठी सोडावी,असे कसोशीने सर्वंकष प्रयत्न झाले, परंतु केवळ लोकसभेची एक जागा सोडणे एवढ्या पुरता हा विषय मर्यादित नव्हता तर आगामी विधानसभेच्या आपल्या आघाडीच्या दहा ते बारा आमदारांच्या जीवनमरणाचा प्रश्न असल्याचे साकडे त्यांना घालण्यात आले होते.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा आजवरच्या अनुभवाचा अभ्यास त्यांना विधानसभा निवडणूकीत निश्चितच उपयोगी पडला. जिल्ह्यातील कोणते नेते हे कोणत्या बाजूने असल्यामुळे आघाडीचे अधिक आमदार विजय होतील. याबाबतीत त्यांचा अंदाज निश्चितच खरा ठरल्याचे निकालावरून स्पष्ट होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अभ्यास नक्कीच कमी पडला असेच म्हटले जात आहे. आजपर्यंत कॉंग्रेस पक्षातील राधाकृष्ण विखे-पाटील यांचे ताकदीचा अनुभव कॉंग्रेस व मित्रपक्ष व भाजपही घेत आलेले आहेतच.
आता पक्ष ताकदीचा हाच आपल्याला आलेला अनुभव विरोधी भाजप व युतीला येत असल्याचे पाहून कॉंग्रेस वा आघाडीच्या पक्षांना निश्चितच हायसे वाटत असेल. लोकसभा निवडणुकीत 80 हजारांचे मताधिक्य डॉ.सुजय विखे यांना या मतदार संघात मिळाले.या पार्श्वभूमीवर शिवाजी कर्डिले यांचा विजय खरे तर निश्चित समजला जात होता. प्राजक्त तनपुरे निवडणूक लढवतील की नाही अशी पण शंका व्यक्त केली जात होती. परंतू लोकसभा निवडणुकीत पडद्याआड झालेल्या काही गोष्टींमुळे जिल्ह्यातील च नव्हे तर तालुक्यात गटांची फेरजुळणी झाली.
लोकसभा निवडणूक निकालानंतर जिल्ह्यात चर्चा मोदीलाट व प्रवरा पॅटर्न यांचीच होत होती.आता विधानसभा निकालानंतर चर्चा शरद पवार व प्रवरा पॅटर्न यांची होत आहे. तीन पंचवार्षिकला ही वन डे मॅंच तनपुरे हरत होते. या निवडणुकीत ही वनडे मॅच अँट ऐनी कॉंस्ट जिंकायचीच असा निर्धार तनपुरेंच्या गटात झाला. कारण ही त्यांच्या आस्तित्वाचीच लढाई होती. वास्तवतः तालुक्यातील संघटीत विरोधावर मात करण्याची तनपुरेंची क्षमता आधी सिध्द झालेली होतीच.मात्र पराभवानंतर आत्मपरीक्षण करुन जय्यत तयारीने तनपुरे याच निवडणूकीत ते उतरले. विरोधी मतांची विभागणी ही नेहमीच सत्ताधाऱ्यांच्या फायद्याची ठरते.
हे लक्षात येण्यात तालुक्यातील तनपुरे विरोधकांना वीस वर्षे लागली तर कर्डिले विरोधक असलेल्या तनपुरेंना दहा वर्षे लागली. त्यामुळेच राहुरी तालुक्यातील मतांची विभागणी होणार नाही. यासाठी आवश्यक ती सर्व काळजी त्यांनी यंदा निवडणूक पूर्व घेतली. त्याचा परिणाम त्यांना निवडणुकीत दिसला. राहुरीतील मतांची विभागणी दूर होण्यासाठी आवश्यक त्या तडजोडीची सुरुवात लोकसभा निवडणूकी पासूनच झाली. लोकसभा निवडणूकीत केलेल्या सहकार्याच्या साखरपेरणीमुळे पुढची वाटचाल सोपी झाल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
लोकसभा निवडणूकीत ऐंशी हजाराचे मताधिक्क विरोधकांना असूनही 23 हजार मताधिक्याने तनपुरेंनी विजय मिळवला. विजय तमनर यांना वंचित उमेदवारी मिळाली होती. एकास एक लढतीसाठीच तमनर यांनी ती उमेदवारी नाकारली.भाजपत इच्छुक नगराध्यक्ष सत्यजित कदम, विक्रम तांबे व नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांची एकत्रित बैठक झाली. कर्डिले यांची उमेदवारी या बैठकीमुळे रद्द होऊ शकली नाही. परंतु निवडणूक निकालावर या बैठकीचा परिणाम जाणवला.
पक्षांतर्गत इच्छुक दोन्ही गट निवडणुकीत उदासीन, तटस्थ झाले. स्टेजवर हम साथ साथ अशा घोषणा दिल्या जात होत्या. पाठीमागे मात्र परिस्थिती वेगळी होती. लोकसभा निवडणूकीचे हिशोब चुकते करावयाचे होते. पक्षांतर्गत गटबाजी तर होतीच, तसेच युती म्हणून शिवसेना-भाजप एक साथ स्टेजवरच होते. स्टेजमागील प्रत्यक्षात त्यांच्या भूमिका मतदानात दिसतात. लोकसभा निवडणुकीत तत्कालीन आमदार शिवाजी कर्डिले यांनी खासदार डॉ. सुजय विखे यांच्या विरोधात इतका मन लावून प्रचार केला की त्यांच्या प्रभाव क्षेत्रातील मतदान केंद्रांवर सुजय विखे यांना मोठे मताधिक्य मिळाले. तर विधानसभा निवडणुकीत विखे गटाने कर्डिले यांचा अर्थातच भाजपचा एवढा मन लावून प्रचार केला की त्यांच्या प्रभावक्षेत्रात ही भाजपच्या उमेदवाराला आघाडी मिळू शकली नाही.
जिल्हा भाजपच्या उमेदवार यादीवर विखेंचा प्रभाव दिसला नाही. त्याचा परीणाम निकालावर झाल्याचे स्पष्टपणे दिसते आहे. राहुरीचा आमदार, स्थानिक आमदार, हक्काचे पाण्यासाठी आमदार, सुशिक्षित, निष्कलंक आमदार असा जो प्रचार प्राजक्त तनपुरे यांनी केला त्याला नेते, कार्यकर्ते व जनता यांची साथ मिळाली. मागील निवडणुकीत शिवसेनेच्या डॉ.उषाताई तनपुरे यांना राहुरी तालुक्यातील गावातून फक्त दहा हजार मताधिक्क मिळालेले होते.
तर कर्डिलेंच्या प्रभाव क्षेत्रात खूपच कमी मते मिळाली होती. यावर्षी निवडणुकीत एकूण राहुरी तालुक्यात झालेल्या मतदानाच्या 65 टक्के अर्थात 80 हजार 776 मध्ये प्राजक्त तनपुरे यांनी मिळवली तब्बल 39 हजार मतांची आघाडी त्यांना राहुरी तालुक्यात मिळाली. तसेच पाथर्डी व नगर या भागातील मतदानात ही प्राजक्त तनपुरे यांनी चांगली मते मिळवली. गत निवडणुकीत एकूण मतांच्या 47 टक्केमते मिळवणारे कर्डिलेंना यावेळी 43 टक्क्यांवरच समाधान मानावे लागले. एकूण मतदानाच्या 54.81 टक्के मते मिळवत तनपुरेंनी आस्तित्वाची ही लढाई जिंकली आहे. या सर्व व्यूहरचनेमुळे गत तीन निवडणुकीत झालेली चूका भरून निघाल्या आणि चुरशीची वाटणारी निवडणूक ही तशी प्रत्यक्षात तशी झालीच नाही.
तालुक्याचे एसटीबस डेपो, ग्रामीण रुग्णालय, एमआयडीसी, शेतीच्या पाण्याचे प्रश्न वांबोरी चारी, बेरोजगारी असे अनेक प्रश्न सुटू शकले नाहीत. त्यावर तनपुरेंनी प्रचारात भर दिला. पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे सभेनंतर बदलाचे वातावरणास वेग मिळाला आणि या सर्वाचा एकत्रित परिणाम होऊन ही वन डे मॅच जिंकण्यात तनपुरे यांना यश आले. वाढता जनसंपर्क व गावोगाव केलेली विकास कामे ही कर्डिलेंची जमेचीबाजू समजली जात होती. पण त्यांच्या उणिवा सांगण्यात तनपुरे प्रभावी ठरले.





