पित्याच्या स्मृतीत मुलाकडून नवरात्रीत ४०० महिलांसाठी मोफत देवी दर्शन यात्रा

नेवासा – नेवासा बुद्रुक येथे पित्याच्या स्मृतीप्रित्यर्थ मुलाकडून नवरात्रीच्या निमित्ताने ४०० महिलांसाठी देवी दर्शन यात्रेचा उपक्रम राबविण्यात आला. यात्रेसाठी निघालेल्या बसेसचे पूजन महिला बचत गटाच्या मार्गदर्शक सुनीता गडाख यांच्या हस्ते करण्यात आले.
दिवंगत शरदतात्या मारकळी यांच्या स्मृतीत त्यांचे पुत्र, नितीन उर्फ बाळासाहेब मारकळी यांनी हा उपक्रम आयोजित केला. मोफत दर्शन यात्रेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी सुनीता गडाख यांनी महिलांशी संवाद साधून त्यांना शुभेच्छा दिल्या. बाळासाहेब मारकळी यांनी मोहटादेवी दर्शन यात्रेची संधी महिलांना दिल्याबद्दल आनंद व्यक्त केला.
“आमदार गडाख साहेबांनी तालुक्यात भरपूर विकासकामे केली आहेत. नेवासा तालुक्याच्या उत्कर्षासाठी आणि आपल्या विकासासाठी आमदार गडाख साहेबांना पाठबळ द्या, त्यांच्या मागे खंबीरपणे उभे रहा,” असे आवाहन सुनीता गडाख यांनी यावेळी केले.
या प्रसंगी श्री विश्वेश्वर नाथबाबा, मराठा क्रांती, दक्षिणमुखी मारुती, जिजामाता, नारदमुनी, जोगेश्वरी, हनुमान, बालाजी, तिळेश्वर, शंभूराजे, श्री दत्त या मित्र मंडळांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मोहटादेवी दर्शन यात्रेसाठी सुमारे ४०० महिलांनी सहभाग घेतला. चार ते पाच बसेस, सर्वांसाठी सकाळ व दुपारच्या सत्रात फराळ, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असे चोख नियोजन करण्यात आले होते. संजूबाबा गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले, तर यात्रा सोहळ्याचे संयोजक नितीन उर्फ बाळासाहेब मारकळी यांनी उपस्थितांचे आभार मानले.





