पुणे जिल्हा | परतीच्या पावसामुळे पिके झाली भुईसपाट

सोरतापवाडी, (वार्ताहर) – कोसळत असलेल्या परतीच्या पावसामुळे पूर्व हवेलीतील लोणी काळभोर, कुंजीरवाडी, सोरतापवाडी, थेऊर, नायगाव, पेठ, तरडे, आळंदी म्हातोबाची, कोरेगाव मूळ, उरुळी कांचन, शिंदवणे, वळती, टिळेकरवाडी, भवरापूर या गावातील शेतकर्यांचे अतोनात नुकसान झाले. जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेती पाण्याखाली गेल्यामुळे पिके भुईसपाट झाली आहे.
परतीच्या पावसामुळे सर्व पिकांचे मोठे नुकसान झाले असून ऊसासह मका, कांदे, बाजरी भाजीपाला, डांळीब या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. काढणी केलेली बाजरी मातीमोल ठरली आहे. पुर्व हवेलीत शेतीचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान शेतकर्याला सहन करावे लागणार आहे.
परतीचा पाऊस कोसळत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. नायगाव येथील शेतकरी किरण गुळुंजकर यांचा पालक, संतोष हगवणे यांची कोथिंबीर, शिवाजी चौधरी यांची कांदा पातीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
तर पेठ गावातील येथील काही शेतकर्यांची शेती पिकासहीत माती वाहून गेल्यामुळे खुपच नुकसान झाले आहे. अनिकेत चौधरी यांच्या शेतातील पिकासहित माती वाहून गेल्यामुळे शेतीचे खूपच नुकसान झाले आहे.
नंदकुमार चौधरी यांचा ऊस भुईसपाट झाला. दत्तात्रय चौधरी यांची कोथिंबीर, बापू चौधरी व सौरभ चौधरी यांच्या पालक भाजीचे अतोनात नुकसान झाले आहे. टिळेकर वाडी येथील सागर टिळेकर विकास टिळेकर व इतर अनेक शेतकर्यांचे डाळिंब पिकाचे प्रचंड नुकसान झाले. ऊसाचे पण खूपच नुकसान झाले आहे. परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे शेतकर्यांचे काढणीला आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
तर आता काढणीला आलेली पिके पावसात भिजत असून बाजरीही मातीत गेल्याने हक्काचे पीकही शेतकर्यांच्या हातातून गेले आहे. शेतातील ऊस पिकात पावसाने पाणी साचल्याने उसाच्या सर्या पूर्णतः भरलेल्या आहेत
त्यामुळे नुकतीच लागवड झालेला ऊस कुजलेल्या स्वरूपात दिसत असल्याचे शेतकर्यांनी सांगितले. तोडणीला आलेली फुले सुद्धा शेतातच काळी पडुन कुजली आहेत. त्यामुळे दिवाळीच्या वेळी शेतकर्यांचा फुलांचा हंगाम वाया जाण्याची भिती शेतकर्यांना मध्ये आहे.
त्यामुळे शेतकरी पुरता हैराण झाला असून रब्बीवरही पावसाचे सावट असल्याने जगायचे तरी कसे, असा प्रश्न शेतकर्यांच्या पुढे निर्माण झाला आहे. हातातोंडाशी आलेली पीके पावसामुळे वाहून गेली तर काही ठिकाणी शेतात साठलेल्या पाण्याने भाजीपाल्याचा चिखल झाला आहे.
अती पावसामुळे टोमॅटो, प्लाँवर, कोबी, पालक, मेथी, शापू कोथिंबीर, काकडी, दुधी भोपळा या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून कांदा रोपांचे अधिक नुकसान झाले आहे.
ऐन सणाच्या तोंडावर आलेल्या या अस्मानी संकटामुळे शेतकरी पूर्ण उद्ध्वस्त झाला असून आता सरकारी मदतीची वाट पाहण्याची वेळ आली आहे. अशा आसमानी संकटामुळे शेतकरी पूर्णत: हतबल झाला आहे.
याबाबत प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे करून शेतकर्यांची विसकटलेली आर्थिक घडी बसवून उद्ध्वस्त झालेल्या शेतकर्यांना सावरावे अशी मागणी परिसरातील शेतकरर्यांनी केली आहे.
नर्सरीचे उद्योगाचे कोट्यवधींचे नुकसान
सोरतापवाडी, कोरेगाव मूळ, म्हातोबाची आळंदी, कुंजीरवाडी व उरुळी कांचन येथील नर्सरीचे उद्योगाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले.
असून बरीचशी रोपे पावसाच्या पाण्याने खराब झाली आहेत तर काही नर्सरीत पाणी साठल्यामुळे रोपे कुजून गेली आहेत. त्यामुळे नर्सरी उद्योगाला शासनाने हातभार लावावा अशी मागणी नर्सरी व्यवसायिकांनी केली आहे.
परतीच्या पावसामुळे पूर्व हवेलीतील शेतकरी, नर्सरी उद्योग व दुकानदारांचे आतोनात नुकसान झाले असून शासनाने त्वरित पंचनामे करून या सर्वांना हातभार लावावा. गणेश चौधरी, आदर्श सरपंच नायगाव





