पुणे जिल्हा | पावसाअभावी बाजरी कोमजली

वाल्हे, (वार्ताहर) – पुरंदर तालुक्यातील दौंडज परिसरात खरीप हंगामातील बाजरीचे पीक चांगले आले आहे. मात्र, ऐन फुलो-यात असलेल्या बाजरीच्या कणसांना पावसाची नितांत गरज भासत असताना पाऊस मात्र पडत नसल्याने शेतक-यांच्या हाता-तोंडाशी आलेल्या बाजरी पिकाचा घास, हातातून जातोय की काय ? या विचाराने शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झाला आहे.
यावर्षी खरीप पिकांच्या हंगामाच्या आगोदर मान्सूनपूर्व व मान्सून पाऊस अत्यल्प प्रमाणात झाला होता. या ओलीवर शेतकर्यांनी बाजरीची पेरणी केली.
तसेच, भुईमूग, सूर्यफूल, सोयाबीन आदी तेलबियांची या वर्षांत विशेष लागवड केली. तसेच तूर, मूग, उडीद अशा विविध प्रकारच्या पिकांच्या पेरण्या पूर्ण झाल्या होत्या.
पावसाची संततधार सुरूवातीला पेरणी झाल्यापासून थोडे दिवस सुरू होती, त्यामुळे यंदा समाधानकारक उतारा मिळेल असा अंदाज शेतकर्यांनी वर्तविला होता.
जुलै महिन्यात 22 ते 28 जुलै दरम्यान दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर अतिवृष्टी झाली. तर 21 ते 23 जुलै दरम्यान पुणे, सातारा, कोल्हापूरचा घाटमाथा आणि धरण क्षेत्रात विक्रमी पावसाची नोंद झाली होती.
मात्र वाल्हे, दौंडज परिसरातील शेतकरीवर्ग जोरदार पावसाच्या प्रतिक्षेतच आहे. वाल्हे, नीरा परिसरात ऑगस्ट महिन्यात अद्यापपर्यंत पाऊस पडला नसल्याने परिसरातील पिके ऐन पावसाळ्यात कोमेजू लागली असून खरीप हंगामातील पिके पावसाअभावी धोक्यात आली आहेत.
सध्या शेती पिकांना पाण्याची अत्यंत गरज आहे. पाऊस लवकर पडला नाही तर, बाजरी पिकासह अन्य पिकांना याचा फटका बसणार आहे.
दौंडज परिसरात बाजरी पीक फुलो-यात आले आहे; मात्र पावसाने दडी मारल्यामुळे पीक धोक्यात येत आहे. त्यामुळे बाजरीला पाण्याची गरज निर्माण झाली असून आठवडाभरात पाऊस झाला तरच, ऐन फुलो-यात आलेले बाजरीचे पिक तरेल. – रमेश घोगरे, शेतकरी, दौंडज





