Pune District : जमिनीला वापसा; पेरणीपूर्व मशागतीला वेग

वाल्हे : मागील आठवड्यात मान्सूनपूर्व पावसाने वाल्हे (ता.पुरंदर) परिसरात दमदार हजेरी लावल्याने शेतकरीवर्गामध्ये समाधाचे वातावरण आहे. यातच, मागील काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने जमिनीला वापसा येत असल्याने खरीप हंगामातील पेरणीपूर्व मशागतीच्या कामास सुरूवात करण्यात आली आहे.
मागील काही दिवसांपासून रखडलेली पेरणीपूर्व मशागतीची कामे करण्यात बळीराजा गुंतला आहे. ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेतजमिनीची नांगरणी, कुळवणी आणि ढेकळे फोडण्याची कामे सुरू झाली आहेत.बैलांच्या मदतीने शेती करणारे काही पारंपरिक शेतकरीही कामाला लागले आहेत. पावसामुळे मशागत करणे सोपे जात आहे.यावर्षी चांगला पाऊस झाल्यास खरीप हंगामातील पिकांची वाढ चांगली होईल,अशी शेतकर्यांना आशा आहे. खरीप हंगामात बाजरी, भुईमूग, सोयाबीन, मूग, चवळी, हुलगा, घेवडा, वाटाणा आदींसह अन्य कडधान्यांच्या पेरणीसाठी शेतकरी सज्ज झाले आहेत. शेतकर्यांनी बी-बियाणे, खतांची जुळवाजुळव करण्यास सुरुवात केली आहे.
मागील पंधरा दिवसांपुर्वी वाल्हे व परिसरात संततधार पाऊस पडला होता.या पावसाने शेतातील नाले,चरी, विहिरी,ओढे ओसंडून वाहत होते. दरम्यान, अनेक भागात पावसाचे पाणी साचून राहिल्याने काही पिके नष्ट झाली आहेत. तसेच अनेक पिकांचेही मोठे नुकसान झाले होते. मात्र, यानंतर पावसाने उघडीप दिल्याने तसेच उन्हाचा चटका वाढत असल्याने जिरायती भागात जमिनीला वापसा येत असल्याने अनेक शेतकरीवर्गाने पेरणीपूर्व मशागतीस सुरूवात केलेली आढळून येत आहे.
या कामांना सुरुवात
पालापाचोळा वेचणे, बांध बंदिस्त करणे, जमिनीची नांगरट, खुरपणी करणे, रोटर मारणे, नैसर्गिक खतांचा मात्रा देणे आदी कामे उरकून घेतली जात आहेत. खरीप हंगामासाठी कृषी कर्जाचे वितरण लवकर करावे,बी-बियाणे व खते वाजवी दरात उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणीही शेतकरी वर्गातून होत आहे. गतवर्षी पावसाविना खरीप हंगाम वाया गेला होता. तर रब्बी हंगाम हा अवकाळी पावसामुळे कसाबसा तरला होता.त्यामुळे बळीराजा अद्यापही अडचणी आला आहे.यावर्षी तरी खरीप हंगामात निसर्ग साथ देईल व खरीप हंगामातील पीक हाती येईल, या आशेवर बळीराजाने शेती मशागतीस सुरुवात केली आहे.
बैलजोडीने अनेक शेतकरी आपल्या शेताची मशागत करतात. मात्र, ज्यांच्याकडे बैलच नाहीत, त्यांना बैलजोडीचा शोध घ्यावा लागत आहे. यापेक्षा ट्रॅक्टरद्वारे मशागतीकडेच कल वाढलेला दिसत आहे.
– संतोष पवार,शेतकरी सुकलवाडी.





