Nagar | रिचार्जवाढीमुळे मोबाईलधारकांची बीएसएनएलकडे भिस्त!

नेवासा (प्रतिनिधी)- अन्य खासगी नेटवर्क कंपन्यांच्या रिचार्ज दरामध्ये प्रचंड वाढ झाल्यामुळे ग्राहक वर्गातून एकीकडे नाराजी व्यक्त केली जात असताना अशातच बीएसएनएलकडून ग्राहकांची मोठी अपेक्षा आहेत. मात्र, सुविधांच्या अवमेळामुळे ग्राहकवर्ग वैतागल्याचे चित्र दिसून येत आहे.
नेवासा फाटा येथे असलेल्या मोबाईलधारकांचे दिवसातून अनेकदा नेटवर्क गायब होत असल्यामुळे मोबाईलधारक वैतागलेले असून, अचानक नेटवर्क गुल होत असल्यामुळे ग्राहकवर्ग संतापलेला आहे.
आजच्या काळात मोबाईल अत्यंत आवश्यक बाब बनली असून, मोबाईलमुळे बँकिंग,ऑनलाईन पेमेंट्स,मनोरंजन, प्रवास तिकीट बुकिंग, शिक्षण आणि ऑनलाइन शॉपिंग अशी अनेक महत्त्वाची विविध कामे मोबाईल फोनद्वारे केली जात आहे.
या कामांसाठी मजबूत आणि स्थिर नेटवर्क कनेक्शन असणे ही आवश्यक बाब बनलेली आहे. मात्र, भारतीय दूरसंचार निगमच्या मोबाईलधारकांना नेवासा तालुक्यात वेळोवेळी नेटवर्क समस्याच्या अडचणी निर्माण होत असल्यामुळे स्पर्धेच्या धावत्या युगात बीएसएनएल मोबाईलधारकांना प्रचंड अडचणीला सामोरे जावे लागत आहे. या कारभारात तत्काळ सुधारणा करण्याची मागणी केली जात आहे.





