Pimpri News | बीएसएनएल कार्यालयासमोर कामगारांचे आंदोलन

प्रभात वृत्तसेवा
पिंपरी – स्वातंत्र्यदिनी निगडी प्राधिकरण येथे बीएसएनएलच्या ऑप्टिकल फायबरचे काम करणाऱ्या तीन कामगारांचा मृत्यू झाला. याबाबत संबंधितांवर गुन्हा दाखल व्हावा व मृत कामगारांच्या कुटुंबीयांना दहा लाखांचे अर्थसहाय्य द्यावे, अशी मागणी करत कष्टकरी संघर्ष महासंघाच्या तर्फे कामगार नेते काशिनाथ नखाते यांच्या नेतृत्वात कामगार आक्रोश आंदोलन करण्यात आले.
बीएसएनएल कार्यालय चिंचवड येथे झालेल्या आंदोलनात राज्य संघटक अनिल बारवकर, कार्याध्यक्ष राजू बिराजदार, उपाध्यक्ष राजेश माने, महिलाअध्यक्षा माधुरी जलमूलवार, मनपा सदस्य सलीम डांगे, किसन भोसले, आयोजक संभाजी वाघमारे, लाला राठोड, रज्जाक शेख, नंदा जाधव, मनोज यादव, नंदू आहेर, सहदेव होनमने, सुनंदा लोंढे, रुक्मिणी जाधव, मनीषा हाके, बाबा मारणे, सय्यद अली, अशोक पगारे, मुमताज शेख, सुनिता पोतदार, सलीम हवालदार, शरद कोळी, अंबालाल सुखावल यांचे सह पुणे जिल्ह्यातील विविध कामगारांनी सहभाग नोंदवला.
नखाते म्हणाले की, स्वातंत्र्यदिनानिमित्त सुट्टी असतानाही कामगारांना चुकीच्या ठिकाणी, चुकीच्या वेळी निगडी प्राधिकरण येथे कामास लावण्यात आले व त्यांना सुरक्षिततेची साधने न देता मदत कक्ष अथवा आपत्कालीन परिस्थितीत मदत करणारी व्यवस्था सोबत न घेता त्यांचे जीव धोक्यात घातले.
बिराजदार म्हणाले की, सर्व घडले आहे दोषी ठेकेदार व अधिकारी, यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा तसेच इतर कडक गुन्हे दाखल करणे गरजेचे आहे. बारवकर म्हणाले की, दोषीवर गुन्हे दाखल करून कडक शासन करावे तसेच मृतांच्या वारसांना प्रत्येकी १० लाख रुपये अर्थसहाय्य करावे.
आंदोलन स्थळी येऊन बीएसएनएलचे अधिकारी डी पी शिंदे, डेप्युटी जनरल मॅनेजर, बीएसएनएल चिंचवड यांचे सह इतर अधिकारी यांनी येऊन निवेदन स्वीकारले. यावेळी यावर योग्य ती कारवाई करू तसेच वरिष्ठांना याबाबत अहवाल पाठवू असे त्यांनी आश्वासित केले.





