BSNL: महागड्या मोबाईल रिचार्जपासून मिळणार सुटका; मोदी सरकारने 98000 ठिकाणी BSNL टॉवर बसवण्याची केली घोषणा

नवी दिल्ली – देशभरात सुमारे 98 हजार ठिकाणी बीएसएनएल4- जी यंत्रणा बसवण्याची घोषणा केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी माध्यमांसमोर केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्याच उद्घाटन करतील. ही यंत्रणा नंतर 5- जी मध्ये रुपांतरित केली जाईल असंही त्यांनी सांगितले.
देशातल्या प्रत्येक भागात ही यंत्रणा बसवली जाईल. डिजिटल भारत निधीद्वारे देशात 100 टक्के 4- जी सॅच्युरेशन नेटवर्कचं अनावरण देखील शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं. या नेटवर्कच्या माध्यमातून 30 हजार गावं जोडली गेली आहेत.
ब्रॉडबँड सुविधेची व्यापक उपलब्धता आणि भविष्याच्या अनुषंगाने मोबाईल सेवेच्या वेगाने विस्तारत असलेल्या जाळ्यामुळे संपूर्ण भारतात एक परिवर्तन घडून येत आहे. भारतनेट हा प्रकल्प या परिवर्तनाच्या केंद्रस्थानी आहे. या प्रकल्पाअंतर्गत, सुमारे 7 लाख किलोमीटर ऑप्टिकल फायबर केबलच्या माध्यमातून, 2.18 लाख पेक्षा जास्त ग्रामपंचायतींपर्यंतचा एक डिजिटल महामार्ग रचला गेला आहे.
यामुळे अत्यंत दुर्गम ठिकाणी ई-प्रशासन, शिक्षण आणि लघु-उद्योगांसाठी संधींची दारं खुली होऊ लागली आहेत. कधीकाळी गावांमध्ये शहरांपेक्षा जास्त इंटरनेट वापरकर्ते असण्याची कल्पनाही करता येत नव्हती पण आज हीच बाब प्रत्यक्षात उतरली आहे. भारतानं जगातील सर्वात परवडणार्या दरात मोबाईल डेटा उपलब्ध करून देणार्या देशांमध्ये आपलं स्थान निर्माण केले आहे. 2014 च्या तुलनेत इंटरनेट डेटाच्या किमतीत जवळजवळ 97 टक्क्याची घट झाली आहे.
या बदलांसोबतच 5-जी तंत्रज्ञानात झालेली क्रांतीनं नागरिकांसाठी आरोग्य विषयक सल्लामसलत सुविधा, शेतकर्यांसाठी पीक सल्ला आणि आता आजवर वंचित राहावं लागलेल्या बाजारपेठांपर्यंत वेगाने पोहता येण्यासारख्या सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. भारतात घडून येत असलेली ही इंटरनेट क्रांती संधी, सन्मान आणि भविष्याची आशा असलेल्या डिजिटल भारताला घरोघरी पोहचवत आहे.





