DTPH: बॉलिवूडची सुपरहिट फिल्म ‘दिल तो पागल है’ करिश्मा कपूर आणि माधुरी दीक्षित यांच्या करिअरमधील एक मैलाचा दगड मानली जाते. या चित्रपटासाठी करिश्मा कपूरला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. पण एक वेळ अशी होती की करिश्मा हिनेच हा चित्रपट नाकारला होता. फक्त तीच नाही, तर इतरही अभिनेत्री माधुरीसोबत काम करण्यास तयार नव्हत्या. करिश्माने 2024 मध्ये झालेल्या एका कार्यक्रमात हा खुलासा केला. तिने सांगितलं की सुरुवातीला तिला ‘दिल तो पागल है’ची ऑफर मिळाली तेव्हा तिने लगेच नकार दिला. कारण, माधुरी दीक्षितसोबत डान्स सीक्वेन्स करायचे धाडस कुणतीही अभिनेत्री दाखवायला तयार नव्हती. करिश्माने सांगितलं, “माधुरी इतकी अप्रतिम डान्सर आहे की तिच्यासमोर कुणीही जुळवून घेऊ शकत नाही. त्यामुळे प्रत्येक अभिनेत्री घाबरत होती, विशेषतः डान्स कॉम्पिटिशन असलेल्या सीनमध्ये.” पण नंतर जेव्हा यश चोप्रा आणि आदित्य चोप्रा यांनी करिश्माला पुन्हा एकदा बोलावलं, तेव्हा त्यांनी विनंती केली की कमीतकमी स्क्रिप्ट एकदा तरी ऐक. स्क्रिप्ट ऐकल्यानंतर करिश्मा लगेच तयार झाली. त्यानंतरही ती थोडी घाबरलेली होती, पण तिची आई बबिता हिने धीर दिला. करिश्माने आव्हान स्वीकारलं आणि इतकी दमदार कामगिरी केली की तिला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. या चित्रपटासाठी सुरुवातीला श्रीदेवी यांना माधुरीच्या भूमिकेसाठी ऑफर दिली होती. पण त्यांनी ती नाकारली, कारण त्यांना वाटलं की हा रोल ‘लम्हे’सारखा ताकदीचा नाही. त्यानंतर माधुरीला साइन करण्यात आलं. करिश्माचा रोल मात्र आधी मनीषा कोईराला, काजोल, जूही चावला आणि रवीना टंडन यांना ऑफर केला होता, पण सगळ्यांनी तो नाकारला. शेवटी करिश्माने तो रोल केला आणि तिच्या करिअरमधील एक सर्वात मोठा टप्पा ठरला.